एकेकाळी ८ हजार पगारावर करायचा काम, पण आता हजारो कोटींमध्ये खेळतो; Zerodha च्या मालकाचा रंजक प्रवास
जो जिद्दीने स्वप्नांच्या दिशेने झेप घेतो, त्याला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. आपल्यापुढे अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांनी खडतर प्रवास, कठोर परिश्रम करून अगदी काही वर्षांतच आपलं भलंमोठं साम्राज्य उभं केलं आहे. यामध्ये झेरोधा स्टॉक ब्रोकिंग स्टार्टअपचाही समावेश आहे. झेरोधा हे स्टार्टअप नितीन कामथ आणि निखिल कामथ या दोन भावांनी सुरू केलं आहे.
यशाचे शिखर गाठणाऱ्या या स्टार्टअपचे सहसंस्थापक नितीन कामथ यांनी सोमवारी (दि. २६ फेब्रुवारी) धक्कादायक खुलासा केला. त्यांनी सांगितले की, सहा आठवड्यांपूर्वी त्यांना स्ट्रोकचा सामना करावा लागला होता. कामथ यांनी ही माहिती त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून दिली. चला तर, नितीन कामथ यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.
झेरोधा (Zerodha) या स्टार्टअपने ही भारतात ऑनलाईन ट्रेडिंगला लोकप्रिय बनवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. नितीन कामथ यांनी त्यांचा भाऊ निखिलला सोबतीला घेत झेरोधाची स्थापना केली होती. नितीन लाखो युवा उद्योजकांचे प्रेरणास्थान आहेत.
किती वर्षांचे आहेत झेरोधाचे संस्थापक?
नितीन कामथ (Nithin Kamat) यांचा जन्म ५ ऑक्टोबर, १९७९ रोजी कर्नाटकाच्या शिमोगा येथे झाला. ४५ वर्षीय नितीन यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये बीईची पदवी घेतली आहे. २००८ मध्ये त्यांनी सीमा पाटील यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. विशेष म्हणजे, सीमा या झेरोधामध्ये क्वालिटी चीफ आहेत. या दाम्पत्याला एक मुलगाही आहे. त्यांची संपत्ती ही जवळपास २.७ अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार, 22,526 कोटी रुपये आहे. क्रिकेट आणि फुटबॉलची प्रचंड आवड असलेले नितीन हे Rainmatter नावाच्या एका व्हेंचर कॅपिटल फर्मचेही सह-संस्थापक आहेत.
काय म्हणाले नितीन?
ट्विटरचा वापर कोण करत नाही? अर्थातच सर्वजण करतात. नितीनही एक सक्रिय ट्विटर युजर आहेत. ते नेहमी आपले विचार आणि अनुभव लोकांसोबत शेअर करत असतात. विशेष म्हणजे, जेव्हा त्यांना स्ट्रोक आला, तेव्हा त्यांनी याची माहिती देण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला होता. त्यांनी ट्वीट करत म्हटले होते की, “जवळपास सहा आठवड्यांपूर्वी मला अचानक हलका स्ट्रोक आला होता. यामागील कारण, वडिलांचे निधन, व्यवस्थित झोप पूर्ण न होणे, थकवा, शरीरातील पाण्याची कमतरता आणि जास्त काम करणे, यापैकी काहीही असू शकते.”
कशी झाली सुरुवात?
नितीन यांनी २०००च्या दशकाच्या सुरुवातीला एक ट्रेडर म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. एक वेळ अशी होती जेव्हा नितीन यांना कॉल सेंटरमध्ये ८ हजार रुपयांच्या मासिक वेतनावर काम करावे लागत होते. त्यावेळी नितीन फक्त १७ वर्षांचे होते. ही त्यांची पहिलीच नोकरी होती. नितीन यांनी त्यांच्या याच पगारासह स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू केली होती. सुरुवातीला एक वर्ष त्यांनी स्टॉक मार्केटला गांभीर्याने घेतले नव्हते. मात्र, नंतर त्यांना कळून चुकले की, यामधून चांगला नफा मिळवला जाऊ शकतो.
नितीन यांनी २००१ ते २००५ पर्यंत कॉल सेंटरमध्ये काम केले. सन २००५मध्ये त्यांनी आपला एक सल्लागार व्यवसाय सुरू केला. काही वेळानंतर जेव्हा NSEने मोफत ट्रेडिंग प्लॅटफॉर्म लाँच केला, तेव्हा नितीन यांना झेरोधा सुरू करण्याची कल्पना सुचली. कामथ बंधूंनी कोणत्याही फंडिंगशिवाय स्वत:च्या जोरावर २०१० साली बंगळुरूत झेरोधाची सुरुवात केली होती. २०१६ पर्यंत कंपनीच्या ग्राहकांची संख्या ७० हजार एवढी होती. मात्र, डिसेंबर २०१५मध्ये कंपनीने झिरो ब्रोकरेज इक्विटी इन्व्हेस्टिंग सुरुवात केली. त्यानंतर कंपनीच्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली.
मागील वर्षी मिळाली कोट्यवधींची भरपाई
नितीन आणि निखिल यांना मागील वर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये १९५.४ कोटी रुपयांची भरपाई मिळाली होती. यादरम्यान दोन्ही भावांना प्रत्येकी ७२ कोटी रुपयांचा वार्षिक पगार मिळाला. म्हणजेच दोन्ही भावांना दर महिन्याला ६ कोटी रुपये पगार मिळाला.
कंपनीचा फायदा
झेरोधा या कंपनीच्या मागील आर्थिक वर्षातील उत्पन्न हे ३८.५ टक्क्यांच्या वाढीसह ६८७५ कोटी रुपये राहिले होते. हेच उत्पन्न २०२२च्या आर्थिक वर्षात ४,९६४ कोटी रुपये होते. यादरम्यान कंपनीचा नेट प्रॉफिटही ३९% वाढून २९०७ कोटी रुपयांवर पोहोचला. आर्थिक वर्ष २०२२मध्ये हे उत्पन्न २०९४ कोटी रुपये होते. कंपनीचे मूल्य पाहायचे झाले, तर तब्बल ३०००० कोटी रुपये आहे. हा नफा वार्षिक नफ्यापेक्षा जवळपास १० पटींनी जास्त आहे. स्टार्टअप कंपन्यांमध्ये कामथ बंधूंची संपत्ती ही सर्वाधिक आहे.
झेरोधाची गणना देशातील सर्वात मोठ्या डिस्काऊंट ब्रोकर्समध्ये होते. यामुळे कंपनीचे १ कोटींपेक्षा जास्त सक्रिय सबस्क्रायबर्स आहेत. कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ही १५०० पेक्षा जास्त आहे.
आणखी वाचा
- सुरुवात किराणा मालाच्या दुकानापासून ते जगातील सर्वात मोठ्या मोबाईल कंपनीपर्यंत
- ‘LinkedIn’ ची सुरुवात कशी झाली?
- THE IKEA Effect – एकदा आत गेलेला माणूस इथून लवकर बाहेर पडत नाही