२. कल ओळखण्याची कला
प्रत्येक माणूस जन्माला येतानाच काहीतरी उपजत कौशल्य तसेच आपले स्वतःचे एक वैशिष्ट्य घेऊनच जन्माला येत असतो. निसर्गाने म्हणा की विधात्याने म्हणा त्याला त्याची इतरांहून वेगळी ओळख बनवण्यासाठी दिलेली ती एक देणगी असते. या भूतलावर जन्माला आलेला प्रत्येक माणूस इतराहून काहीतरी नक्कीच वेगळा आहे.
त्याला मिळालेल्या काही पायाभूत बाबी समान आहेत. त्याच्या शरीराची रचना व ठेवण एकसारखीच असते. म्हणजेच काय? तर प्रत्येकाच्या धडाच्या वर डोके आहे. डोक्यात मेंदू आहे, पंच ज्ञानेंद्रिये आहेत, हृदय, यकृत, फुफ्फुसे, हात, पाय अशी अंतर्बाह्य इंद्रिये आहेत. त्यांची जागा ठरलेली आहे. प्रत्येकाचा चेहरा सारखा दिसत नाही, प्रत्येकाच्या अंगात वेगवेगळ्या कला दडलेल्या आहेत, प्रत्येकाच्या डोक्यात वेगळी प्रतिभा आहे. हे असे आहे हेच उत्तम आहे.
एवढ्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येकाला हवी ती गोष्ट प्राप्त करुन घेण्यासाठी लागणारी अमर्याद ऊर्जा प्रत्येकात दडलेली आहे. आपण काहीही करु शकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या क्षमतांना आव्हान द्यावे लागते, मानसिकता बनवावी लागते, सराव व प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. या गोष्टी वारंवार सिध्द करणारी उदाहरणे आपण आपल्या रोजच्या जीवनात अनुभवत असतो. ज्याला शिक्षक व्हायचे आहे त्याने ठरवून प्रयत्न केले तर तो शिक्षक होतो, ज्याला डॉक्टर व्हायचे आहे तो डॉक्टर होतो. प्रत्येकालाच बिल गेट्स आणि वॉरन बफेट सारखे बनायचे नाही, बिल गेट्स हा बिल गेट्स आहे आणि तुम्ही तुम्ही आहात. दोघांची आपापली वैशिष्टे आहेत.
आता आपल्याला असे वाटू शकते की आपल्याला हवे ते आपण बनू शकतो मग आपला कल ओळखण्याची व त्याप्रमाणे काम करण्याची गरज काय आहे? प्रत्येक गोष्ट आपल्याला शक्य आहेच, मात्र काही गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला जास्त प्रयत्न करावे लागतात, तर काही गोष्टी आपल्याला सहज जमतात. याउलट ज्या गोष्टींसाठी आपल्याला अथक परिश्रम करावे लागतात त्या गोष्टी काहीजण लिलया करुन दाखवतात, तर ज्या गोष्टी आपल्याला अगदी सोप्या वाटतात, त्यात काहीजणांचा कस लागतो. हे असे का होत असावे बरे? तर त्याचे उत्तर आहे की, आपल्याला सर्व गोष्टी साध्य करता येतात, त्यातील काही गोष्टी साध्य करण्यासाठी लागणारे उपजत गुण आपल्यात असतात. काहीजणांचा आवाज जन्मताच चांगला असतो, काहीजणांची शरीरयष्टी उत्तम असते, तर काहीजणांची स्मरणशक्ती अफलातून असते, काहीजण सुंदर व रुपवान असतात, तर काहीजण धाडसी असतात. ज्याचा आवाज चांगला आहे त्याने गायनात, ज्याची शरीरयष्टी चांगली आहे त्याने खेळात, जे सुंदर आहेत त्यांनी मॉडेलिंगमध्ये, तर जे धाडसी आहेत त्यांनी धाडस दाखवता येणाऱ्या क्षेत्रात कामगिरी केल्यास लवकर यश मिळणे स्वाभाविक आहे.
आपल्या क्षमतांवर मात करण्याची ताकद आपल्या निसर्गाने दिली आहे. त्याचा वापर करुन अधिक प्रयत्न करुन आपल्याला आपल्या उपजत गुणांवर मात करुन सुध्दा बऱ्याच गोष्टी साध्य करता येतात. याला जग चमत्कार म्हणते. स्टीफन हॉकिंग जागेवरुन स्वतःहून हलू शकत नाही मात्र त्याने जग हलवणारे संशोधन विकसित केले, मुहम्मद अली त्याच्या लहानपणी अगदीच किडकिडत (कृश) होता त्याने स्वतःच्या क्षमतांना आव्हान दिले आणि सात वेळा बॉक्सिंगचा विश्वविजेता बनला, विल्मा रुडॉल्फला जन्मतःच पोलिओ झाला होता ती स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नव्हती. मात्र प्रयत्नांच्या जोरावर तिने ऑलिम्पिक मध्ये धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली.
अल्बर्ट आईनस्टाईनला शिक्षणात फार गती नव्हती त्याने पुढे जाऊन जगाला परिवर्तनाचा वेगळा आयाम देणारा सापेक्षतावादाचा सिध्दांत दिला या सारखी कित्येक उदाहरणे आहेत. मात्र यासाठी अथक परिश्रम करावे लागतात. त्याउलट सचिनमध्ये उपजतच क्रिकेट होते त्याने क्रिकेट मध्ये करिअर केले तो यशस्वी झाला. विश्वनाथन आनंद बुध्दिबळाचा निर्विवाद बादशहा झाला. हे त्यांच्या योग्य वयात झाले. केएफसीच्या मालकाला त्याच्यातील उद्योजकता माहिती व्हायला वयाची साठ वर्षे उलटून गेली होती. त्यानंतर प्रयत्न करुन त्याने केएफसी नावाचा जगप्रसिध्द ब्रँड बनवला.
काहीजणांचे आयुष्य संपून गेले तरी त्यांना त्यांच्या उपजत प्रतिभेचा शोध लागला नाही, आयुष्यात अनेक ठोकरा खात मरुन गेलेल्या लोकांना त्यांची उपजत प्रतिभा समजली असती तर…? या प्रतिभा ओळखण्याची गरज शिक्षणातून पूर्ण झाली पाहिजे. त्याबद्दल पुढील लेखात जाणून घेऊया. धन्यवाद.