गाड्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या 2WD, 4WD, AWD आणि RWD या नावांचा अर्थ माहितीये का?
सध्याच्या काळात एसयूव्ही कार्सला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. ग्राहक सेडान कार सोडून एसयूव्ही कार्स कडे आकर्षित होताना दिसत आहेत. खरं तर, एसयूव्ही म्हणजेच स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल होय.
कुठल्याही कठीण रस्त्यावर सहजरीत्या चालू शकतील, अशा या कार असतात. मात्र, कठीण रस्त्यांना सोपे करण्यासाठी कार्समध्ये अनेक प्रकारचे फिचर्स दिलेले असतात. यापैकीच एक फिचर म्हणजे 4×4 होय. परंतु, अलीकडच्या काळात तुम्ही गाड्यांसाठी 2WD (2 व्हील ड्राईव्ह), 4WD (4 व्हील ड्राईव्ह), AWD (ऑल व्हील ड्राईव्ह), RWD (रियर व्हील ड्राईव्ह) आणि अशी बरीच नावे वापरताना ऐकली असतील. अशात, अनेकांचा गोंधळ उडतो की, या सर्वांमध्ये नेमकं अंतर आहे तरी काय. हेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
गाड्यांमध्ये जी पॉवर आहे ती इंजिनद्वारे तयार होते, हे तर आपल्याला माहितीच आहे. ही पॉवर ट्रान्समिशनला पाठवली जाते, जी गियर्सचा वापर करून एका ड्राईव्ह शाफ्टच्या मदतीने चाकांना पॉवर पाठवतात. FWD (फ्रंट व्हील ड्राईव्ह) गाड्यांमध्ये ही पॉवर पुढच्या टायर्सला जाते, तर मागील टायर्स हे फ्रीमध्ये (कोणत्याही पॉवरशिवाय) फिरतात. दुसरीकडे, RWD (रियर व्हील ड्राईव्ह)मध्ये ही पॉवर मागील चाकांना जाते आणि पुढचे चाकही फ्रीमध्ये फिरतात. तुम्ही अशाप्रकारे हे समजू शकता की, FWD मध्ये गाडीला समोरून ओढले जाते आणि RWD मध्ये गाडीला मागून धक्का देऊन ढकलले जाते.
याव्यतिरिक्त AWD गाड्यांमध्ये पॉवर चारही चाकांना जाते आणि एक कॉम्प्युटर ठरवतो की, केव्हा कोणत्या चाकाला किती पॉवर मिळते. 4×4 म्हणजेच फोर व्हील ड्राईव्ह कारमध्ये प्राथमिकरीत्या पॉवर मागील चाकांना जाते. मात्र, तुम्ही एका मेकॅनिकल लॉकच्या मदतीने तुम्ही 4×4ला एंगेज करू शकता, ज्यामुळे पुढील चाकांनाही पॉवर जाते. म्हणजेच, चारही चाकांना पॉवर मिळते.
गाड्या वेगवेगळ्या ट्रेन्सवर चालतात. अधिकतर रस्त्यांवर, पण बर्फावर, टेकड्यांवर, चिखलात आणि एवढंच काय तर चंद्रावरही. अशात, प्रत्येक जागेच्या हिशोबाने एक ड्राईव्ह ट्रेन असतो, जो सर्वोत्तम असतो. जर त्या कंडिशनमध्ये तुमच्याकडे तो ड्राईव्ह ट्रेन नसला, तर तुम्ही अडचणीत सापडू शकता. चला तर, हेच आपण जाणून घेऊयात.
FWD (फ्रंट व्हील ड्राईव्ह)
FWD (फ्रंट व्हील ड्राईव्ह) ही सिस्टीम सर्वाधिक फायदेशीर आहे. कारण, अधिकतर गाड्यांमध्ये इंजिन आणि ट्रान्समिशन पुढेच असते. त्यामुळे तिथून पुढच्या चाकांना पॉवर देणे सर्वात सोपे आहे. अशाप्रकारे पॅकेजिंग, वजन आणि किंमतीनुसार, या गाड्या सर्वात सोयीस्कर आहेत. मात्र, इथे तुम्हाला एक तोटा असाही पाहायला मिळेल की, या गाड्यांमध्ये ग्रिप कमी असते. त्यामुळे खराब रस्त्यांवर जसे की, माती किंवा चिखलात या गाड्या योग्य नसल्याचे दिसते. खरं तर, समोरच्या चाकांचं काम हे गाडीला वळण घेण्यासाठी मदत करणे असते. त्यामुळे पॉवर आणि वळण याच चाकांना देत असल्याने गाडीला ग्रिप कमी मिळते. तुम्हाला दररोजच्या जीवनात ही समस्या उद्भवणार नाही, पण जेव्हा तुम्ही रेसिंग करत असाल, गाडीला स्पोर्ट कारप्रमाणे चालवत असाल किंवा कमी ग्रिप असलेल्या ठिकाणी चालवत असाल, तर तेव्हा तुम्हाला हा त्रास सहन करावा लागेल.
RWD (रियर व्हील ड्राईव्ह)
RWD (रियर व्हील ड्राईव्ह) गाड्या शौकिन लोकांच्या पसंतीच्या असतात. यामध्ये पॉवर इंजिन-ट्रान्समिशन-ड्राईव्ह शाफ्ट असा प्रवास करत मागील चाकांना जाते. त्यामुळेच हा ड्राईव्ह शाफ्ट खूप लांब असतो. हा सेटअप तुम्हाला अधिकतर स्पोर्ट्स कार्समध्ये पाहायला मिळेल. कारण जेव्हा गाडी एक्सलेरेट करते, तेव्हा वजन मागील बाजूस जाते. याने मागील चाकांवरील भार वाढेल आणि तुम्हाला ग्रिपही जास्त मिळेल. यावेळी पुढील चाक जे असतील, ते गाडीला दिशा देण्यासाठी फ्री असतील आणि तुम्हाला गाडी चालवतानाही चांगले वाटेल. भारतात या प्रकारात येणाऱ्या सामान्य गाड्यांमध्ये मारुती ओमनी, मारुती इको, महिंद्रा बोलेरो आणि आता महिंद्रा बोलेरो नियो यांचा समावेश आहे.
4×4 (4 व्हील ड्राईव्ह)
4×4 म्हणजेच 4 व्हील ड्राईव्ह. या गाड्यांमध्ये पॉवर सर्वाधिक मागील चाकांना जाते. मात्र, जेव्हा रस्ता खराब होतो आणि तुम्हाला गाडी चालवण्यात अडचण येते, तेव्हा तुमच्याकडे 4×4 निवडून पुढील चाकांनाही पॉवर पाठवण्याचा पर्याय असतो. अधिकतर गाड्यांमध्ये पॉवरची विभागणी 50-50 टक्के असते. ही लिंकिंग प्रक्रिया मेकॅनिकल असल्यामुळे, तुम्ही कोणत्या चाकाला किती पॉवर मिळतेय, याचे नियंत्रण करू शकत नाहीत. तसेच, वेगात गाडी चालवायची असेल आणि लांब रस्त्यांसाठीही तुम्ही 4×4 पर्याय वापरू शकत नाहीत. हा पर्याय फक्त तेव्हाच वापरला जाऊ शकतो, जिथे रस्ते खूपच खराब आहेत किंवा रस्तेच नाहीयेत. जसे की, टेकड्या, जंगल किंवा ऑफरोड रेसिंगमध्ये. तुम्ही अशा रस्त्यांवर चालवत असाल, तेव्हा चारही चाकांना पॉवर मिळत असल्यामुळे तुमची गाडी फसण्याची शक्यता खूपच कमी असते. ही सिस्टीम तुम्हाला महिंद्रा थार आणि फोर्स गुरखा यांसारख्या कार्समध्ये पाहायला मिळते.
AWD (ऑल व्हील ड्राईव्ह)
AWD आणि 4×4 गाड्यांमध्ये फक्त एकच फरक आहे, तो म्हणजेच कम्प्युटर चीपचा. जिथे 4×4 गाड्यांमध्ये ड्रायव्हरला स्वत: 4×4 सिस्टीम एंगेज करावी लागते, तर ऑल व्हील ड्राईव्ह गाड्यांमध्ये हा निर्णय कम्प्युटर घेतो. हा निर्णय एक कम्प्युटर घेत असल्यामुळे हे खूपच जलद असते. तसेच, कोणत्या चाकाला किती पॉवर मिळत आहे, ते मॅनेज केले जाऊ शकते. सामान्य शहरी कंडिशनमध्ये AWD गाड्या या FWD सिस्टीमने म्हणजेच पुढच्या चाकांवर चालतात. मात्र, जेव्हाही ग्रिप कमी मिळू लागते, जसे की, पाऊस, बर्फ किंवा माती आली, तर ट्रॅक्शन नियंत्रित करण्यासाठी चाकांना वेगवेगळ्या प्रकारे पॉवर दिली जाऊ शकते. त्यामुळे गाडीची स्टेबिलिटी आणि मोमेंटम चांगल्याप्रकारे हाताळली जाऊ शकते. ही सिस्टीम तुम्हाला महागड्या गाड्यांमध्ये पाहायला मिळेल. जसे की, जीप कंपस, स्कॉडा कोडियाक किंवा मग लँड रोव्हर एसयूव्हीज. या गाड्यांना बर्फात, मातीत किंवा चिखलाच्या रस्त्यावर या सिस्टीमचा फायदा मिळतो.