लेखमालिकाव्यवसायाच्या वाटेवर चालताना

व्यवसायासाठी किती भांडवल लागेल?

हुशार व कल्पक उद्योजक अगदी कमी भांडवलात उत्तम प्रतीच्या सेवा व उत्तम प्रकारची गुणवत्ता असणारी उत्पादने बाजारात आणत असतो किंवा काही उद्योजक अगदी मुबलक प्रमाणात भांडवल उद्योगात गुंतवतात. ग्राहकांकडून ते हक्काने मागून घेतात व ग्राहकही स्वखुशीने त्या उत्पादनांची किंमत त्या उद्योजकाला देत असतात. उदाहरण द्यायचे झाल्यास मॅकडोनाल्ड ही कंपनी १०-१२ रुपयाला मिळणारा वडापाव (बर्गर) २७ रुपायांना विकते. त्याची उत्पादन किंमत अगदी २-३ रुपये इतकी कमी आहे, तरीही ग्राहक ती किंमत स्वखुशीने देतात.

आपल्या व्यवसायाचे एक कार्यालय मुख्य शहरात असावे. एकापेक्षा अधिक शहरात व्यवसाय करु इच्छिणाऱ्या उद्योजकांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या शहरात एक एक कार्यालय चालू करावे. म्हणजे ६ उद्योजक एकत्र आले व त्या सहाही उद्योगांना नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे व मुंबई या ६ ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी प्रत्येकी ६-६ कार्यालये चालू करणे आवश्यक आहे. येथे ३६ कार्यालये सुरु करण्याऐवजी फक्त सहाच कार्यालये सुरु करावीत. प्रत्येकाने एक-एक कार्यालय सांभाळावे, म्हणजे प्रत्येकाच्या सहा शाखा होतील; मात्र खर्च एकाच कार्यालयाच्या खर्चाएवढा असेल.

को-वर्किंग स्पेस हा एक खूप चांगला प्रकार आहे. Innov8, WeWork, 91Springboard, Awfis, Smartworks, Kafnu, myHQ अशा अनेक कंपन्या ही सुविधा पुरवतात. यामध्ये एका मोठ्या जागेत अनेक छोटे छोटे डेस्क बनवलेले असतात. इथे चहा-कॉफी, वायफाय, ऑफिस चेअर, डेस्क अशा सर्व सुविधा मिळतात. नाममात्र शुल्क देऊन यापैकी एक डेस्क तुम्ही घेऊ शकता आणि तिथून काम सुरु करू शकता. एखादी मिटिंग करायची असेल तर त्यासाठी वेगळी मिटिंग रूम असते. अनेक नवउद्योजक एकाच ठिकाणी त्यांच्या आयडियाजवर काम करत असतात त्याचा सुद्धा नेटवर्किंगसाठी फायदा होतो.

Virtual Office (व्हर्च्युअल ऑफिस) ही संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. हे एक अशा प्रकारचे ऑफिस असते ज्यामध्ये जगभरातल्या सर्व मुख्य शहरात तुम्ही तुमचे कार्यालय अगदी कमी खर्चात सुरु करु शकता. उदा. मुंबईत नरीमन पॉईंट किंवा बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स सारख्या महागड्या ठिकाणी एक ऑफिस भाड्याने घ्यायचे झाल्यास दरमहा ६० हजार रुपये ते २ लाख रुपये भाडे लागते. त्याऐवजी virtual office चे भाडे हे केवळ ६-१० हजार एवढेच असते. Virtual office मध्ये असिस्टंटचा पगार देण्याची गरज नाही, फोनबिल व वीजबिल भरण्याची गरज नाही; तरीही या पत्यावर आलेली पत्रे व डॉक्युमेंट तुम्हाला मिळतात. तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर मिळतो. तो उचलण्यासाठी व फोन वर झालेल्या चर्चेच्या नोंदी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक यंत्रणा काम करत असते. ६-१० हजारात हे सर्व मिळत असते. इतर कोणतीही छुपी किंमत द्यावी लागत नाही. याचा फायदा नवीन ऑर्डर मिळवण्यासाठी होतो, समोरच्या व्यक्तीवर तुमचा चांगला प्रभाव पडतो.

अशा कितीतरी गोष्टी आपल्याला ‘जुगाड’ या तत्त्वाचा वापर करुन कमी भांडवलात निर्माण करता येतात. आपली विचार करण्याची पध्दत थोडीशी बदलून फार काही साधता येते. अर्थात हे सर्व सुरुवातीच्या टप्प्यात करायचे आहे, त्यानंतर जसजसा व्यवसाय वाढत जाईल, तसतशा ह्या जुगाड केलेल्या गोष्टी बदलून गुणवत्ता असलेल्या (Standard) स्वरुपात स्थापित करणे चांगले. यामध्ये कुणालाही फसवण्याचा उद्देश नसावा. समोरुन जर विचारणा करण्यात आली, तर स्पष्ट शब्दात आपण केलेली तजवीज त्यांना सांगणे हितावह असते. विश्वास टिकवण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जर विचारले नाही तर आपणहून सांगणे गरजेचे नाही.

जयहिंद!!!

  • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button