बिझनेस प्लॅन जरुरी आहे का?
जगातील सर्व देशांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की, काही देश प्रगत, काही देश विकसनशील तर काही देश मागास आहेत. त्यांच्या एकूण परिस्थितीचा आढावा घेतला असता काही अनुमान काढण्यात आले ते असे होते. प्रगत देशामध्ये वयाची ४० वर्षे ओलांडलेले नागरिक हे देशातील नवयुवकांना व्यवसायासाठी मदत करतात, तर विकसनशील देशात चाळिशी ओलांडलेले लोक काहीही न करता नवयुवकांना नुसतेच फुकटचे सल्ले देत असतात.
विकसनशील देशातील युवक हे व्यवसायासाठी मदत शोधण्यात आपली युवावस्था संपवून टाकतात, पण त्यांना अशा प्रकारची मदत मिळत नाही. मागास देशात युवकांकडे किंवा ४० वर्षे ओलांडलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या माणसांकडे पैसे व व्यवसाय करण्याची इच्छा नसते.
तारुण्याच्या उंबरठ्यावर माणसाचे रक्त गरम असते. काहीतरी करुन दाखवण्याची इच्छा त्याला गप्प बसू देत नसते. त्याच्या डोक्यात सतत नवनवीन संकल्पनाचा जन्म होत असतो. त्या कल्पना साकारण्याची त्याची तयारी असते. त्यासाठी लागेल ती जोखीम पत्करण्यासाठी तो तयार असतो. या तारुण्यातील उर्जेला आपण ‘पतंगा’ची ऊर्जा म्हणू या. कारण दिव्याभोवती रात्रीच्या अंधारात पतंग फिरत असतात. त्या पतंगांना दिव्याच्या ज्योतीकडे झेप घेण्याची इच्छा अनावर होत असते. ते स्वतःला रोखू शकत नाहीत किंवा रोधू शकत नाहीत. त्यांना माहित असते की आपण दिव्याच्या ज्योतीवर झेप घेतल्यास आपले पंख जळून आपण मरणार आहोत.
प्रसंगी हे पतंग त्या ज्योतीकडे झेपावतात व आपले पंख जाळून मरुन जातात. मृत्यूची भीती त्यांना शिवत नाही. त्याचप्रमाणे नव्या उमेदीचा तरुण ह्या पतंगासारखा संकटावर झेपावण्यासाठी आतुर झालेला असतो, आसुसलेला असतो. अशावेळी त्याच्या कल्पनेला साकार करण्यासाठी लागणारे भांडवल व बाकी गोष्टी मिळाल्या तर तो यशाच्या शिखरावर फार वेगाने आरुढ होतो.
वयाची ४०-४५-५० वर्षे पार केलेली माणसे गाठीशी चांगला पैसा बांधून असतात. त्यांची उमेद कमी झालेली असते, जोखीम पत्करण्याची वृत्ती संपत आलेली असते. त्यांनी हे पैसे जर तरुण वर्गाला भांडवल म्हणून दिले, तर त्यांनाही त्याचा भरघोस फायदा होतो व नवे व्यवसाय वेगाने वाढतात. ज्यांच्याकडे (टाटा, अंबानी सारखे मोठे उद्योजक, सचिन सारखे खेळाडू व अमिताभ सारखे कलाकार) भरपूर पैसे असतात अशा लोकांना चांगल्या तरुणांची गरज असते. ते आपले पैसे नवीन व्यवसायात गुंतवण्यास उत्सुक असतात. मात्र त्यांच्याकडे फार कमी वेळ असतो. अशा लोकांना अगदी ५-७ मिनिटांत संपूर्ण व्यवसाय (गुंतवणूक, ग्राहक, नफा इ.) प्रभावीपणे समजावून सांगणारा तरुण बाजी मारुन जातो. त्याला भरपूर पैसे मिळतात. असे पैसे प्राप्त करण्यासाठी प्रभावी बिझनेस प्लॅन बनवणे अत्यंत महत्त्वाचे असते.
प्रगत देशात (अमेरिका, इंग्लड, जर्मनी, फ्रान्स व जपान) युवक आपल्याकडे असलेल्या कल्पनेत उतरवण्यासाठी भांडवलाच्या शोधात असताना ते वर्तमानपत्रात त्यांच्या डोक्यात असलेल्या संकल्पनेबाबत जाहिरात देतात व ज्यांच्याकडे पैसा आहे अशा व्यक्तींनी ती संकल्पना विकत घ्यावी म्हणून लिलाव करतात किंवा त्या संकल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी लागणारे भांडवल मागण्यासाठी प्रस्ताव ठेवतात. त्यातून नवी भागीदारी व गुंतवणूक करवून घेतात.
प्रभावी बिझनेस प्लॅन बनवण्यासाठी लागणारे काही नियम पाहू या. बिझनेस प्लॅन हा उद्योजकांनी स्वतः बनवावा, कारण त्या उद्योजकाइतका चांगला त्याचा व्यवसाय इतर कोणालाही माहित नसतो. बनवलेला बिझनेस प्लॅन मग मुख्य आर्थिक सल्लागाराकडून पडताळून त्यात करावे लागणारे बदलही स्वतःच करावेत. बिझनेस प्लॅन हा मुद्देसुद व दिसायला आकर्षक असावा. बिझनेस प्लॅन मधील मुख्य घटकांची यादी येथे देत आहोत. प्रत्येक घटकांचे दोन-तीन मुद्द्यात वर्णन करावे.
१. व्यवसायाचे नाव, घोषवाक्य (tagline), संकेतचिन्ह (logo) याचा समावेश व व्यवसायाला साजेसे असे एक चित्र असावे.
२. समस्या
३. उपाय
४. अपेक्षित ग्राहकवर्ग
५. स्पर्धक
६. स्पर्धकाच्या तुलनेत असणारी तुमची वैशिष्टे (USP)
७. लागणारे भांडवल व त्याचा उपयोग
८. विक्री व जाहिरात माध्यमे
९. उलाढाल, खर्च व नफा यांचा आलेख
१०. व्यवसायातील महत्त्वाचे टप्पे व त्याची कालमर्यादा
११. सोबत काम करणारे छोटेमोठे ब्रँड
१२. काम करणारी टीम फोटो व पदासहित
१३. व्यवसायाचा पत्ता, संपर्क, ईमेल व असल्यास वेबसाईट
व्यवसायात बिझनेस प्लॅन हा व्यवसायाचा आत्माच आहे. कारण तुम्ही जो व्यवसाय करता त्याची संपूर्ण माहिती एकत्र ठेवण्याचे साधन म्हणजे बिझनेस प्लॅन होय. बिझनेस प्लॅन हा वेळोवेळी अद्ययावत (update) करणे आवश्यक असते. बिझनेस प्लॅनची तपशीलवार माहिती उद्याच्या लेखात…
- अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती