उद्योजकताबिझनेस महारथी

यांच्यामुळे सामान्य माणसाच्या दारात गाडी उभी राहिली – हेन्री फोर्ड

३० जून १८६३ रोजी अमेरिकेतील मिशिगनमध्ये एका छोट्या शहरात हेन्री फोर्ड यांचा जन्म झाला. एका शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेल्या हेन्रीला ४ भावंडं. घरची परिस्थिती बेताची. शेतातून मिळेल तेवढंच उत्पन्न. अमेरिकेतला तो काळ असा होता जेव्हा शेती ही पूर्णपणे कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने केली जात होती. दिवसभर शेतात काम करणं लहानग्या हेन्रीला पसंत नव्हतं. भावंडांसोबत शाळेत जाणारा हेन्री ८ व्या ग्रेड पर्यंत शिकला. शालेय शिक्षणात जास्त रस नसणाऱ्या हेन्रीने माध्यमिक शिक्षण काय केलं नाही. बुक किपींगचा एक कोर्स करायला त्यानं ऍडमिशन घेतलं.

portrait young henry ford
Young Henry Ford

१२ वर्षाच्या हेन्रीला त्याच्या वडिलांनी हातात घालायचं घड्याळ भेट दिलं… हेन्रीने ते घड्याळ खोललं आणि परत जोडलं. जगातली पहिली आधुनिक कार तयार करण्याची हीच होती पहिली पायरी… जिथं त्याच्या वयाची मुलं मैदानात खेळ खेळायची तिथं हेन्री आसपासच्या घरातली बिघडलेली घड्याळ दुरुस्त करायचा.

त्या काळात वाहतुकीसाठी घोडागाडीच वापरली जायची. मग ती सामानाची असो किंवा माणसांची.  शेतात वडिलांना मदत करत असताना हेन्रीने पहिल्यांदा एक असं मशीन पाहिलं, जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चक्क घोड्याशिवाय जात होतं. पाण्याच्या वाफेवर चालणारं, शेतात वापरलं जाणारं हे मशीन म्हणजे हेन्रीसाठी आश्चर्य होतं. समोर दिसणारं हे मशीन म्हणजे हेन्रीचा हेन्री फोर्ड होण्यासाठी एक निमित्त आहे हे बहुतेक काळ ओळखून होता. मशीनवर प्रेम कणाऱ्या हेन्रीने तेव्हाच ठरवलं कि आपण देखील अशी गाडी बनवायची जी घोड्यांशिवाय चालेल.

वयाच्या १६ व्या वर्षी हेन्री यांच्या आईच निधन झालं. आईवर अतिशय प्रेम करणारे हेन्री आतून तुटले होते. आईच्या निधनानंतर वडिलांनी त्यांना सांगितलं कि तू आता शेतात कामाला सुरवात कर, पण शेतीच्या कामात अजिबात रस नसणाऱ्या हेन्रीने सरळ घर सोडून पळून जाण्याचा मार्ग स्वीकारला.

पुढं १८९६ मध्ये हेन्री फोर्ड यांची भेट थॉमस एडिसन यांच्या सोबत झाली. हेन्री यांनी केलेलं काम त्यांना खूप आवडलं. त्यांच्या या संशोधनावर एडिसन खुश झाले. यातुन प्रेरणा घेऊन हेन्री फोर्ड यांनी आपल्या नोकरीचा राजीमाना दिला आणि त्यांनी १८९९ मध्ये स्वतःची Detroit Automobile Company स्थापन केली. पण यातून तयार होणाऱ्या गाड्या कमी  दर्जाच्या आणि जास्त महाग होत्या. त्यामुळं १९०१ मध्ये हेन्रीनी ती कंपनी बंद केली.

Thomas Edison & Henry Ford

पुढे डेट्रॉईट ऑटोमोबाईल कंपनीतील त्याचे सहकारी मर्फी आणि इतर भागीदारांसोबत 30 नोव्हेंबर 1901 रोजी हेन्री फोर्ड कंपनीची स्थापना केली. पण तिथं देखील इतर सहकाऱ्यांसोबत मतभेद झाल्याने आपलं नाव असणारी ती कंपनी त्यांनी सोडून दिली.

सलग २ वेळा आलेलं अपयश, जवळची संपत चालली बचत अशा परिस्थितीत हार न मानता फोर्ड यांनी गुंतवणूकदार असणारे माल्कन यांच्या सोबत १६ जून १९०३ रोजी फोर्ड मोटार कंपनी चालू केली.

henry ford motor company highland park plant

कंपनी तर चालू झाली पण ती लोकांपर्यंत पोहचणार कशी? यासाठी फोर्ड यांनी अमेरिकेत भरल्या जाणाऱ्या कार रेसिंग स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी मॉडेल ९९९ हे कार रेसिंग मॉडेल तयार केलं. ही रेस जिंकून त्याचं हे मॉडेल तर हिट ठरलंच सोबत कंपनीचं नावसुद्धा झालं.

त्या काळच्या चारचाकी गाड्या इतक्या महाग होत्या की श्रीमंत सुद्धा त्या घेताना विचार करत होते. अश्या या काळात हेन्री फोर्ड यांनी  सर्वसामान्यांना परवडेल अशी चारचाकी गाडी बनवण्याचे प्रयत्न काही त्रुटी असल्यामुळे फेल गेले. पण १९०८ मध्ये त्यांनी बनवलेल्या मॉडेल-T ने मात्र जगाला वेड लावलं. फक्त काळ्या आणि डार्क ब्लु रंगात येणारी गाडी हळू हळू फक्त काळ्या रंगात मिळू लागली. या गाडय़ांचे स्टिरिंग व्हील डावीकडे होते. गाडी चालवायला सोपी होती आणि दुरुस्त सुद्धा लवकर होत असे.

Henry Ford Model-T

पहिल्या वर्षी कंपनीने १७०८ गाड्या विकल्या. गाडीची किंमत होती ९०० डॉलर. १९१४ मध्ये या गाडीच्या सेलने २,५०,००० चा टप्पा ओलांडला. पुढे गाडीची किंमत ३६० डॉलर्स वर आल्यावर तर गाडीचा सेल ४,७०,००० पर्यंत गेला. खऱ्या अर्थानं हेन्री फोर्ड यांची ही मॉडेल T गाडी म्हणजे विसाव्या शतकातली सगळ्यात सेन्सेशनल गाडी ठरली. एक वेळ तर अशी आली कि जिथं नजर जाईल तिथं फक्त हीच काळी गाडी दिसायची.

सर्वोत्तम ज्ञान असणारे कर्मचारी आपल्या कंपनीत असले पाहिजेत म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी  दिवसाला ५ डॉलर पगार घोषित केला. जिथं दिवसाला २ डॉलर पगार मिळायचा तिथं इतका पगार म्हणजे कर्मचारांसाठी सोनंच होत. कामाचे दिवस आठवड्याचे ५ च करून त्यांनी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कशी वाढेल याकड लक्ष दिलं.

सतत येणाऱ्या अपयशाला नमवत प्रत्येक समस्येतून नवीन संधी निर्माण करणारे हेन्री फोर्ड खऱ्या अर्थाने आधुनिक गाड्यांचे जनक आहेत. १०८ वर्षाची फोर्ड मोटार कंपनी ही अनेक चढ उतारानंतर आज ऑटोमोबाइल क्षेत्रातील एक नामवंत कंपनी आहे.

आपल्या आईवर अतिशय प्रेम करणाऱ्या हेन्री फोर्ड याना तितकीच प्रेमळ आणि त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणारी पत्नी त्यांना लाभली… तीच नाव होत क्लारा. आधुनिक युगातील चारचाकी गाड्यांमध्ये क्रांती करणाऱ्या या अवलियाने ७ एप्रिल १९४७ रोजी आपल्या पत्नीच्या खांद्यावर जीव सोडला.

चारचाकी गाडी हा श्रीमंती थाट न राहता सामान्य माणसाच्या आवाक्यातील व्हावे यासाठी फोर्ड यांनी अथक प्रयत्न केले. तुम्ही कोणत्या परिस्थितीत जन्माला आलात हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगता आणि परिस्थिती कशी बदलता हे महत्वाचं असतं. शेतकऱ्याच्या या मुलानं ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती घडवून याच ज्वलंत उदाहरण आपल्यापुढं ठेवलं आहे.

हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी


आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button