अगोदर भरपूर पाय पसरा, नंतर अंथरूण गोळा करा
मित्रहो आपल्या मराठी भाषेत असे अनेक जुनाट विचार व म्हणी आहेत, ज्या आज भंगारात काढण्याची गरज आहे. उदा. अंथरूण पाहून पाय पसरावे, कर्ज काढू नये, समुद्र पार करणे पाप आहे असे अनेक बुरसटलेले विचार व म्हणी आहेत. अशा विचारांचा पगडा गेली कित्येक वर्षे समाजावर आहे.
कायतर म्हणे; पैसे व्याजाने लावू नये, नाहीतर कुटुंबाचे बरेवाईट होते मग इतक्या मोठ्या बँकांना का शाप लागत नाहीत. त्यातल्या त्यात अंथरूण पाहून पाय पसरावे सारख्या म्हणी आपली विचारसरणी व दृष्टिकोण संकुचित करतात. म्हणजे तुम्हाला १० हजार पगार आहे, तर तेवढ्यात काय येईल ते घ्या व जगत रहा, आपली २ एकर जमीन आहे, तर २ म्हशी पाळू व त्यात किती उत्पन्न येईल तेवढ्यातच जगत राहू अशी अनेक उदाहरणे मिळतील.
आम्ही अनेक उद्योजकांबरोबर काम करतो. खूप संकुचित व लहान विचार करून एखादा व्यवसाय, प्रोडक्ट किंवा कंपनी स्थापन केल्यास ती सुरूही होत नाही व झालीच तर ती खूप मोठी होत नाही. एकाच गावातील दोन शेतकऱ्यांची उदाहरणे सांगते म्हणजे तुम्हाला समजेल. तुकाराम; लहान विचारसरणीचा २ एकर बागायत जमिनीचा मालक. आपल्या ऐपतीनुसार एक जर्सी गाय विकत घेतो, त्याला लागणारा चारा काही जागेत पिकवतो. गाय रोज १५ ते २० लीटर रोज दूध देते, त्याचे त्याला रोज ४०० रुपये मिळतात. चारा, खाद्य, औषधोपचार याचा रोजचा खर्च २०० रुपये, त्याला शिल्लक राहतात केवळ २०० रुपये, म्हणजे दरमहा ६००० रुपये. तसं बघायला गेलं तर ह्यात फायदा काहीच नाही. तुकारामाने आपल्या श्रमाचा मोबदला जर पकडला, तर ६००० रुपयाचे काहीच शिल्लक राहणार नाहीत. म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरणारा तुकाराम हा तोट्यात व्यवसाय करतो आहे.
सखाराम, हा त्याच गावातील दुसरा शेतकरी, धाडसी व उद्योगी विचारसरणीचा. त्याच्याकडेही २ एकर बागायत शेती. त्याने या शेतीचा व सरकारी योजनेचा फायदा घेतला व पंधरा जर्सी गायींना पुरेल एवढा गोठा बांधला. योजनेवर त्याला काही अनुदान मिळाले, तसेच गावातील डेअरीबरोबर दूध पुरवठ्याचा करार करून १५ गायी खरेदी करण्यासाठी ८०% रक्कम मिळवली. म्हणजे हातात केवळ २ ते ३ लाख रुपयाचे भांडवल असताना त्याने ५ लाखांचा गोठा उभारला, ८ लाख रुपये किंमतीच्या १५ गायी विकत घेतल्या व इतर साधनसामुग्रीही घेतली.
सर्व काम हे यांत्रिक व शास्त्रशुध्द पध्दतीने होत असल्यामुळे कमी मजुरीत व कमी खर्चात काम होते व गायीही जास्त दूध देतात. जास्त दूध असल्याने त्याला १ रुपया जास्त दर मिळतो व खाद्य खरेदी जास्त असल्याने त्याला ५% कमी दराने खाद्य मिळते. एका गायीपासून रोज ५०० रुपयाचे दूध मिळते. १५ गायींचे रोज रुपये ७५००. खाद्य, औषधपाणी, ३ मजूर मिळून रोज ४५०० खर्च होतो. रोज निव्वळ नफा ३००० हजार रुपये. महिना १० ते १२ गाड्या शेणखत निघते. ते रुपये ४ हजार प्रती गाडी याप्रमाणे खपते, त्याचे महिना ३० ते ४० हजार मिळतात. एकूण महिना फायदा रुपये १२,५००० पर्यंत मिळतो.
आता मला सांगा, तुम्हाला कोणती म्हण मान्य आहे, “अंथरूण पाहून पाय पसरावे” की “आधी भरपूर पाय पसरा, मग अंथरूण गोळा करा?” तेव्हा जुने बुरसटलेले विचार भंगारात घाला, आधुनिक विचारसरणीचा स्वीकार करा.
तुम्हालाही अशा काही म्हणी माहित असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या गोष्टींतून उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेलला आताच सब्स्क्राइब करा.
आणखी वाचा
- यश मिळवण्यासाठी कल्पकता व शांत डोक पाहिजे
- दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल
- सगळं संपलं असं कधीच होत नसतं
- अती विचाराच्या रोगापासून दूर राहा
- फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता