व्यवहाराला नेकी व पत काय ठेवावी?
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासून शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विस्डम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजचा विषय आहे; व्यवहाराला नेकी व पत काय ठेवावी? करायची सुरुवात?
शिवचरित्रातील एक गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मोहिमेवर जाण्यासाठी खजिना कमी होता. छत्रपती असूनसुद्धा ते स्वतः सावकाराकडे गेले व म्हणाले मला २ लाख होनांचे कर्ज हवे आहे.
सावकार म्हणाला, “कर्जदार म्हणून आलात की महाराज म्हणून?” महाराज म्हणाले, “कर्जदार छत्रपती म्हणून आलोय.”
सावकाराने प्रश्न केला, “तारण काय ठेवणार? कर्ज द्यायचे म्हणजे तारण काहीतरी ठेवले पाहिजे.”
त्यावर छत्रपती म्हणाले, “हे स्वराज्य तर रयतेचे आहे, मी काय तारण ठेवणार?”
सावकार म्हणाला, “तारण तर ठेवावेच लागेल.”
शिवाजी महाराजांनी शेजारी पडलेली गवताची काडी उचलली त्या सावकाराच्या हातात दिली आणि सांगितलं, “ही माझ्या स्वराज्यातील गवताची काडी आहे. ही तारण म्हणून घे आणि मला दोन लाख होनांचं कर्ज दे.”
सावकाराने दोन लाख होनांचं कर्ज दिलं आणि ती गवताची काडी तारण म्हणून ठेवून घेतली.
मोहिमेवरून परत आल्यावर महाराज सावकाराकडे आले. व्याजासहित २ लाख ५० हजार होन सावकाराच्या हवाली केले व कर्ज परत फिटल्याची लेखी ग्वाही घेतली. थोडा वेळ झाला, तरी महाराज येथून जाईनात. तेव्हा सावकार म्हणाला, “महाराज, अजून काही काम आहे का?”
तेव्हा महाराज म्हणाले, “आम्ही गवताची काडी गहाण ठेवली होती, ती परत करा.”
सावकाराने तिजोरीत ठेवलेली गवताची काडी बाहेर काढली आणि महाराजांच्या हातावर दिली आणि म्हणाला, “ही घ्या तुमची गवताची काडी”.
त्यावेळी शेजारी उभा असलेला कोंडाजी महाराजांना म्हणाला, “महाराज, गवताची काडी ती, तीची किंमत काय! घेतली काय आणि न घेतली ती काय.” त्यावर महाराज म्हणाले, “कोंडाजी, ह्या स्वराज्यातील गवताची काडीसुध्दा कुणाकडे गहाण पडता कामा नये.”
छत्रपतींच्या त्या गोष्टीवरुन व्यवहारातील सचोटीपण व ‘गवताची काडीसुध्दा परत घेतली’ हा पराकोटीचा स्वाभिमान आजच्या मराठी माणसाला शिकण्यासारखा आहे. कर्ज काढणे हा व्यवहाराचा भाग आहे, पण ते वेळेत फेडून आपली पत व स्वाभिमान ठेवणे तितकेच महत्त्वाचे, परंतु भ्रष्ट सहकार सम्राटांनी व उद्योगपतींनी जनतेचे व बँकांचेही पैसे बुडवून स्वतःबरोबर इतरांनासुद्धा व्यावसायिक क्षेत्रात बदनाम केले आहे. आपण मात्र सचोटीने आणि प्रामाणिकपणाने व्यवहार करून आपली पत कायम ठेवावी.
काय, पटतंय का? कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती आवडल्यास व्हिडीओ लाईक आणि शेअर करा. असेच नवनवीन व्हिडीओज पाहण्यासाठी नवी अर्थक्रांती चॅनेल आत्ताच सब्स्क्राइबसुद्धा करा