सरकार विकतंय स्वस्तात सोनं | Gold Investment Options in India
तुम्हाला सोनं खरेदी करायला आवडतं का? आत्ता नुकतीच अक्षय्य तृतीया देखील झाली. या दिवशी तुम्ही काहीतरी सुवर्ण खरेदी केलीच असेल, पण आजकाल सोन्याच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की विचारायची सोय नाही, पण मी आज तुम्हाला अशा एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहे, ज्यातून आपण स्वस्तात सोनं खरेदी करू शकतो (Gold Investment.)
तुम्हाला माहिती आहे का की, भारत जगातील सर्वांत मोठी सोन्याची बाजारपेठ आहे. भारतातच सर्वांत जास्त दागिने विकले जातात. आपण जन्माला आल्यापासून आपल्या अंगावर सोन्याचा एखादा तरी दागिना असतोच. सोनं भौतिक स्वरूपात म्हणजे दागिने, बिस्किट किंवा नाणी या स्वरूपात ठेवायला आपल्याला आवडतं, नाही का? पण बदलत्या काळानुसार सोने खरेदी आणि सोन्यातील गुंतवणूक करण्याची पद्धत सुद्धा आता बदलली आहेत. सध्या सोन्यातील गुंतवणुकीचा सुरक्षित आणि चांगला परतावा मिळविण्यासाठी सार्वभौम सुवर्ण रोखे किंवा गोल्ड इटीएफ आणि असे अनेक चांगले पर्याय आहेत.
2013 मध्ये सोन्याचा दर 28,000 दरम्यान होता, तोच दर आत्ताच्या घडीला ६१८०० रुपये इतका वाढला आहे. आणखी काही वर्षांनी हाच दर लाखांच्या घरात देखील जाऊ शकतो. त्यामुळे सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक वाया जाणार नाही. तर आता बघुयात सोन्यामध्ये गुंतवणुकीचे (Gold Investment) कोणते आधुनिक पर्याय उपलब्ध आहेत ते….
पहिला पर्याय म्हणजे
गोल्ड कॉईन :
आपण दागिने खरेदी करताना त्यावर मेकिंग चार्ज लागतो, पण गोल्ड कॉईन खरेदीवर मेकिंग चार्ज कमी असतो. त्यामुळे दागिन्यांच्या तुलनेत सोन्याची नाणी स्वस्त पडतात. तसेच सोन्याची नाणी दागिन्यांप्रमाणे कालांतराने काळी पडत नाहीत. तसेच गोल्ड कॉइन खरेदीमध्ये भेसळीची शक्यता कमी असते. साधारणत: 0.5 ग्रॅम ते 50 ग्रॅम पर्यंत गोल्ड कॉईन बाजारात उपलब्ध असतात. ही नाणी तुम्ही बँक, सराफा दुकानदार किंवा मुथूट सारख्या वित्तीय कंपनीकडुन खरेदी करू शकता. मात्र बँकेकडून सोन्याची नाणी खरेदी करणे टाळले पाहिजे. कारण तुम्ही ही नाणी बँकेला परत विकू शकत नाही.
गोल्ड ETF
गोल्ड ETF म्हणजे Gold Exchange Traded Fund. याला कागदी सोनं किंवा पेपर गोल्डसुद्धा म्हणू शकतो. ही गुंतवणूक शेअर मार्केटशी मिळतीजुळती असते. जसे आपण शेअर खरेदी करतो तसे इथे DMAT अकाऊंट काढून तुम्ही गोल्ड खरेदी करू शकता. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किंमतीप्रमाणे या फंडची किंमत बदलत असते. यामध्ये प्रत्यक्ष सोने खरेदी आणि देखभाल करण्याची गरज उरत नाही तसेच दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास चांगला परतावाही मिळतो. गोल्ड ईटीएफचा वापर कर्ज घेण्यासाठी सुरक्षा म्हणूनही केला जाऊ शकतो. यामध्ये प्रत्यक्ष सोन्याच्या तुलनेत खरेदी शुल्क कमी आहे, तर १०० टक्के शुद्धतेची हमी दिली जाते.
गोल्ड म्युच्युअल फंड:
गोल्ड म्युच्युअल फंड हे सोन्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या गुंतवणूक करतात. ते अशा कंपन्यांच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात ज्या खाणीतून सोने खणणे, त्यावर प्रक्रिया करणे, घडवणे आणि वितरण करणे अशी कामे करतात. याची सुरुवात तुम्ही कमीतकमी 500 रुपयांपासून करू शकता. बाजारातील चढ उतारानुसार तुम्हाला यातून परतावा मिळू शकतो.
सोवेरन गोल्ड बॉन्ड:
केंद्र सरकारने नोव्हेंबर, 2015 साली सोवेरन गोल्ड बॉन्ड या योजनेची सुरुवात केली. यामध्ये तुम्हाला प्रत्यक्षरित्या सोनं मिळतं नाही तर बॉन्ड स्वरूपात सोनं मिळतं. या बॉन्डची एक ठरलेली किंमत असते. यावेळी याची किंमत 5,611 प्रतिग्रॅम इतकी ठरवण्यात आलेली आहे. हे बॉन्ड आठ वर्षांत मॅच्युअर होतात. म्हणजेच त्यानुसार आठ वर्षांनंतर बाँड परत केल्यानंतर तेव्हा सोन्याचा जो भाव असतो, तेवढी रक्कम परत मिळते. दरवर्षी 2.5 टक्के व्याजही तुम्हाला मिळत जातं. हे व्याज दोन भागात सहा-सहा वर्षांच्या फरकाने मिळत जाते. हे बॉण्ड्स तुम्ही बँक, HSCIL ऑफिस, पोस्ट ऑफिस आणि एजंट्सकडून फॉर्म घेऊन विकत घेऊ शकता किंवा RBI ची वेबसाईट आणि बँकांतून ऑनलाईन अर्ज भरून तुम्ही फॉर्म विकत घेऊ शकता.
या योजनेअंतर्गत तुम्ही वैयक्तिक एका वर्षात एक ग्रॅमपासून ते जास्तीत जास्त चार किलो सोन्यात गुंतवणूक करू शकता. संस्था किंवा कंपन्या 20 किलोपर्यंत गुंतवणूक करू शकतात.