उद्योजकताबिझनेस स्टोरीझ

६ हजार कोटी दान  करणारा अवलिया : कोण आहेत आर. त्यागराजन?

आम्ही बोलत आहोत श्रीराम फायनान्स ग्रुपचे संस्थापक आर. त्यागराजन यांच्याबद्दल. आपल्या जीवनाबद्दल अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या आर. त्यागराजन यांची ही कथा यासाठी विशेष आहे की, जगातील अनेक मोठे उद्योगपती आपल्या संपत्तीच्या जोरावर अब्जावधींचे  इमले बांधत असताना, त्यागराजन यांनी जवळपास ६ हजार कोटींची संपत्ती आपल्या कर्मचाऱ्यांना दान करून जगाला एक नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या जीवनप्रवासावर एक नजर फिरवूया.

कोण आहेत आर. त्यागराजन?

त्यागराजन यांचा जन्म २५ ऑगस्ट १९३७ मध्ये  चेन्नईमधील (तत्कालीन मद्रास) एका समृद्ध शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी कोलकत्ता येथून भारतीय सांख्यिकी संस्थेतून गणितात पदव्युत्तर पदवी आणि गणितीय सांख्यिकीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. 1961 साली त्यांनी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड या सामान्य विमा कंपनीत प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आयुष्याची जवळ जवळ वीस वर्षं त्यांनी वेगवेगळ्या संस्थामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले. 

1974 मध्ये,वयाच्या ३७ व्या वर्षी त्यांनी आपल्या काही मित्रांसह सुरुवातीला श्रीराम चिट्स या व्यावसायिक वित्तपुरवठा व्यवसायाची स्थापना केली, पण नंतर त्यांनी कर्ज आणि विम्याच्या दिशेने प्रवास सुरु केला. त्यागराजन यांनी कधीच धाडस आणि नवकल्पना यांची साथ सोडली नाही. त्यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम ग्रुपने आर्थिक सेवा क्षेत्रात नवीन संधी ओळखून गुंतवणुकीचे नवीन मार्ग शोधले. यामुळे कंपनीच्या व्यवसायात सातत्याने वृद्धी होत राहिली. श्रीराम समूहात आजच्या घडीला 30 हून अधिक कंपन्या आहेत. त्यातील काहींनी शेअर बाजारात मोठा पल्ला गाठला. आजमितीला श्रीराम फायनान्स लिमिटेडचे बाजारातील भांडवल 8.5 अब्ज डॉलर आहे.

खराब क्रेडीट स्कोर असलेल्यांना दिले कर्ज

मुख्यतः बॅंका अशा लोकांना कर्ज देण्यास मनाई करतात ज्यांचा क्रेडिट इतिहास खराब असतो किंवा नियमित उत्पन्न  नसतं. पण त्यागराजन यांनी कुठलाही CIBIL (Credit Information Bureau India Limited) चेक न करता या विशिष्ट लोकांना कर्ज प्रदान केलं, एका मुलाखतीत जेव्हा  त्यांना त्यांच्या या धोरणावर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा  त्यांनी एक महत्वपूर्ण दृष्टिकोन व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट केले की, खराब क्रेडिट इतिहास किंवा नियमित उत्पन्न नसलेल्या व्यक्तींना कर्ज देणे जितके धोक्याचे मानले जाते, तितके ते धोकादायक नाही. या मुद्द्याचा सखोल अभ्यास करून त्यांनी फायनान्स क्षेत्रात प्रवेश केला आणि अशा लोकांना कर्ज देणे सामान्य बाब आहे, असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं.

त्यांच्या करिअरची सुरुवात एका सामान्य कर्मचाऱ्याच्या भूमिकेत झाली होती आणि  फायनान्स  क्षेत्रात  त्यांच्या दीर्घकालीन अनुभवाने आणि शिक्षणाने त्यांना कर्ज देण्याच्या धोरणावर एक नवा दृष्टिकोन त्यांनी फायनान्स क्षेत्राला  प्रदान केला, ज्यामुळे नंतर या व्यवसायातील  धोरण अधिक सुसंगत व प्रभावी बनण्यास मदत झाली. त्यांचे नेतृत्व हे कर्मचार्‍यांसाठी प्रेरणादायी होते. त्यांनी आपल्या टीमला सदैव प्रोत्साहन दिले. ‘सामान्य माणूस असामान्य गोष्टी करू शकतो’ हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.

कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये ६ हजार कोटी रुपये केले दान

त्यागराजन यांनी आपली संपूर्ण संपत्ती कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये समान प्रमाणात वाटून दिली आहे. ६२१० कोटी रुपयांची एकूण संपत्ती कर्मचाऱ्यांमध्ये वाटून देत, त्यांनी फक्त स्वतःजवळ ५ हजार डॉलर्स, घर आणि कार ठेवली होती. त्यांच्या या निर्णयामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये अत्यंत आनंद आणि प्रेरणा निर्माण झाली.

आर त्यागराजन यांना २०१३ मध्ये भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मभूषण प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या कामामुळे, भारतातील गरिबांना ट्रॅक्टर आणि इतर वाहने खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणारे श्रीराम फायनान्स एक प्रमुख नाव बनले आहे. 

व्यक्तिगत जीवन

हजारो कोटींची संपत्ती असलेले आर. त्यागराजन हे अत्यंत साधे जीवन जगतात. ते स्वतःकडे मोबाईल फोन ही  ठेवत नाहीत, कारण त्यांना लोकांशी प्रत्यक्ष कनेक्ट राहायला आवडते. मोबाईल हा अनावश्यक वेळ खातो असं ते म्हणत असतात. “या उद्योजकाचा साधेपणा आणि जमिनीशी असलेली नाळ त्यांच्याशी संवाद साधताच लक्षात येते. त्यांनी आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कंपनीच्या व्यवस्थापन किंवा नेतृत्वाच्या पदावर स्थान दिले नाही. त्यांचा मोठा मुलगा टी. शिवरामन हा एक यशस्वी इंजिनिअर आहे, तर धाकटा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट असून, श्रीराम ग्रुपमध्ये एक सामान्य कर्मचारी म्हणून काम करतो. कुटुंबाचा व्यवसायात हस्तक्षेप नको म्हणून त्यांनी आपली मुल्ये  ठामपणे पाळली आहेत.

आर. त्यागराजन हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात जी विनम्रता आणि साधेपणा आहे, ती आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे.

आणखी वाचा :

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button