काय आहे ‘जागतिक बचत दिन’ आणि भारतात तो एक दिवस आधी का साजरा केला जातो?
‘वॉरेन बफे’ म्हणतात की, ‘खर्च करून उरलेल्या रकमेत बचत करण्यापेक्षा, बचत करून उरलेल्या रकमेत खर्च करा.’ अमेरिकन बँकेचे डीन जे. पी. मोर्गन एका दलालास सल्ला देताना म्हणाले, “तुमचा रोजचा वायफळ खर्च बचतीच्या रुपात साठवला, तर आयुष्यात पुढे होणारी धावपळ टाळली जाऊ शकते.” विल रॉजर म्हणतात, “कर्ज काढून उद्याच्या पगारावर जगणाऱ्या अभिनेत्याच्या संगती पेक्षा, कालच्या बचतीवर भागवणाऱ्या द्वारपालची संगत मी पसंत करेन.”
बचत ही सर्वश्रेष्ठ सवय आहे, ज्याला ही सवय लागेल त्याची प्रगती होते. अडचणीच्या काळात आपण केलेल्या बचतीचा आपल्याला खूप फायदा होतो. बचत करणे हे प्रत्येकाच्या नियोजनात असायलाच हवे. वाढती महागाई आणि भविष्यातील अगणित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बचत ही काळाची गरज बनली आहे. घरखर्चाचे आर्थिक नियोजन असो किंवा एखाद्या देशाची अर्थव्यवस्था प्रत्येक ठिकाणी बचतीची गरज पडतेच. जर बचत केली नाही, तर उत्पन्न ढासळू शकते आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊन नुकसान होऊ शकते. बचत करण्याची गरज आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ओळखली गेली आणि तिथूनच ‘जागतिक बचत दिवसा’ची सुरुवात झाली. वर्षभर कसले ना कसले दिवस साजरे करून आपण आपला खर्च वाढवतच असतो. या जागतिक बचत दिवसाला आपण ही काही उपाय करून बचत करण्याचा प्रयत्न करणं जमतंय का ते पाहूयात.
कधी आणि कुणी केली ‘जागतिक बचत दिवसा’ ची सुरुवात ?
या दिवसाची सुरुवात 31 ऑक्टोबर 1942 रोजी झाली. इटली मधील मिलान इथे प्रा. फिलिपो फिलिपो रविझा यांनी पहिल्या आंतरराष्ट्रीय कॉंग्रेस बचत बँकेच्या परिषदेत या दिवसाची सुरुवात केली. तेव्हापासून हा दिवस जगभर साजरा केला जाऊ लागला. 1925 मध्ये पहिला जागतिक बचत दिवस साजरा केला गेला. त्यानंतर 1929 मध्ये स्पेन आणि अमेरिकेत प्रथम राष्ट्रीय बचत दिन साजरा केला गेला.
भारतात जागतिक बचत दिवस एक दिवस आधी साजरा का केला जातो ?
जागतिक बचत आणि रिटेल बँकिंग संस्था WSBI नुसार, जागतिक बचत दिवस 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. 31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. तेव्हापासून भारतात ३० ऑक्टोबर रोजी जागतिक बचत दिवस साजरा केला जातो.
या जागतिक बचत दिवसाला पुढील उपाय वापरून करू शकता स्वत:ची बचत
प्रत्येक महिन्याला खर्चाचे नियोजन करावे
दर महिन्याला खर्चाचे नियोजन करून त्यानुसार पैसे खर्च करणे आवश्यक आहे. खर्चाचे नियोजन करून त्यानुसार आपला खर्च नियंत्रित ठेवावा .
गरज पहावी आवड नाही
खर्च करताना नेहमी गरजेला प्राधान्य द्यावे. वायफळ खर्च टाळता आला, तरच बचत करणे शक्य होईल. ज्या वस्तू गरजेच्या आहेत त्याच खरेदी कराव्यात.
पैसा घरी ठेवू नये
आवश्यक तो पैसा घरी ठेवून बाकीची रक्कम बँकेत ठेवणे कधीही फायदेशीर आहे. आपला पैसा शेअर बाजार, म्युच्युअल फंड, जीवन विमा किंवा आरोग्य विम्यामध्ये गुंतवल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.
जर तुम्हाला बँकांमध्ये पैसा गुंतवायचा नसेल, त्यांच्या धोरणानुसार खाते उघडणे तुम्हाला शक्य होत नसेल, तर भारतीय पोस्ट खाते आणि सेव्हिंग्स हा तुमच्यासाठी उत्तम आणि फायदेशीर पर्याय आहे.
तुम्हाला आजचा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा
आणखी वाचा
- कशी करावी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक?
- सरकार विकतंय स्वस्तात सोनं | Gold Investment Options in India
- मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या योजनांमध्ये करा गुंतवणुक
- पैशाचे नियोजन (Financial Planning) : 7 महत्वाचे टप्पे