उद्योजकतादिनविशेषसोप्या भाषेत... बिझनेस

जागतिक उद्योजक दिन – प्रवास उद्योजक बनण्याचा 

मग या सगळ्यासाठी काय करता येईल, कसं उत्तर शोधता येईल. तर मित्रांनो उद्योजक होता येईल, व्यवसायाच्या वाटेवर स्वतःचा एक वेगळा प्रवास सुरू करता येईल. परंतु उद्योजकता ही केवळ ठरवून करायची गोष्ट मुळीच नाही. आज जागतिक उद्योजक दिनाचे औचित्य साधून आपण या दिवसाच्या महत्त्वावर प्रकाश टाकणार आहोत.

खरंतर आजही अनेक ठिकाणी लोकांची अशीच मानसिकता आहे की, चांगलं शिक्षण घ्यायचं, चांगली नोकरी मिळवायची आणि आयुष्यात स्थिर व्हायचं. सहसा मला फक्त व्यवसाय करायचा आहे, मला उद्योजक व्हायचं आहे असे बोलणारे खूप अपवाद आहेत. गर्दीचा बऱ्यापैकी ओढा हा फक्त नोकरीच्या मागेच आहे, अनेक जण अपघाताने, अनावधानाने व्यवसायात पडतात आणि मग शिकत शिकत, अनुभव घेत, त्यांना त्यात यश मिळतं; पण फक्त मला व्यवसायच करायचा आहे, हा दृष्टिकोन मनात घेऊन व्यावसायिक होणारे उद्योजक हे फार तुरळक. खरंतर या मागची कारणं देखील अनेक आहेत. त्यात प्रामुख्याने सांगायचं झालं तर,

1. व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ नसणं. 

2. कुटुंबाचा पाठिंबा नसणं.

3. नक्की कोणता व्यवसाय करायचा आहे याची स्पष्टता नसणं.

4. Risk घेण्याचं धाडस नसणं.

5. अनिश्चितता आणि अनुभवाचा अभाव 

6. सामाजिक दबाव 

या सगळ्या गोष्टींना समस्या समजून धाडस न करणारी संख्या मोठीच आहे ; परंतु याच्या विरुद्ध याच मुद्द्यांवर उत्तर शोधून व्यवसायाच्या वाटेवर चालणारे अपवाद हे कायम विलक्षणच ठरतात. जगातील यशस्वी संस्थापकांनी, लहान-मोठ्या उद्योजकांनी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी, स्वत:ची प्रतिभा जगापुढे आणताना काय बरं विचार केला असेल? मुळातच एक गोष्ट स्पष्ट आहे की, आव्हाने स्वीकारण्याची स्वेच्छा असणे आणि उद्योजक होणे या दोन गोष्टींतील सीमारेषा ही अत्यंत पुसट आणि कमी आहे. ही स्वेच्छाच तुमच्या मनातील सर्व भय नष्ट करते आणि त्याच वेळी आपण आकस्मिक संकटांना, अचानक येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी पूर्वतयारी करू शकतो, त्यांना भिडू शकतो. 

असं म्हणतात की नोकरी हा आठ तासांचा व्यवसाय आहे आणि व्यवसाय ही २४ तासाची नोकरी आहे आणि हे खरंच आहे. परंतु नोकरी आणि व्यवसाय या दोन्हीमधून मिळून सरतेशेवटी मिळणारं समाधान यात कमालीचा फरक आहे हे मात्र विसरता कामा नये. नोकरी करून आपण आपल्या कंपनीच्या मालकाला मोठं करतो, तर तेच स्वतःचा व्यवसाय करून आपण स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या पुढच्या पिढीला अप्रत्यक्षरित्या मोठं करत असतो. फरक जरी एका वाक्यात असला तरी त्यातील गांभीर्य हे फार मोठं आहे. आज भविष्याचा विचार केला तर ८०% परंपरागत नोकरीच्या संधी ह्या एआय (artificial intelligence) व रोबोटमुळे संपणार आहेत. डॉक्टरच्या ऐवजी रोबोट सर्जरी करतील, तर मग कामगार वर्गाचे काय होईल ह्याचा विचार आपण न केलेलाच बरा.

बऱ्याच जणांचं असंही म्हणणं असतं की माझं वय कमी आहे किंवा आता वय निघून गेलं. अशा तक्रारी करणाऱ्यांना एकच सांगायचं आहे की, शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. संभाजी राजांनी वयाच्या 20व्या वर्षी औरंगजेबाला पाणी पाजलं होतं. बिल गेट्स वयाच्या ३०व्या वर्षी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. तर दुसरीकडे, आर. के. दमाणींनी ४८व्या वर्षी D-Martची, जॉन पेंबरटन यांनी ५५व्या वर्षी कोका-कोलाची सुरुवात केली, तर कर्नल सँडर्स यांनी ६२व्या वर्षी KFCची सुरुवात केली. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या समोर आहेत. उद्योजक बनण्याच्या या प्रवासात वय हा मुद्दा खूप दुय्यम आहे. करण्याची इच्छा असेल, मानसिक तयारी असेल, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जायची तयारी असेल. Roadmap तयार असेल, तर इतर समस्यांना आपण नक्कीच तोंड देऊ शकतो.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button