दिनविशेष

शिक्षक दिन 5 सप्टेंबरला का साजरा करतात? | Why Teachers Day Celebrated On 5th September

प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाची भूमिका ही अनन्यसाधारण महत्त्वाची असते. एखादी व्यक्ती जेव्हा यशस्वी होते, तेव्हा तिच्या मागे नेहमी कोणत्या-न-कोणत्या मार्गदर्शकाचा हात असतो, भूमिका असते. हा मार्गदर्शक म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्याला वळण देणारा, चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायला शिकवणारा शिक्षक.

 भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. हा स्मरणोत्सव आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती (दुसरे राष्ट्रपती), भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. देशाच्या शिक्षणाला आकार देण्यात त्यांनी कायम मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या योगदानामुळे अनेकांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली आणि म्हणूनच ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन सबंध देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. 

खरंतर चांगल्या शिक्षकाचा सन्मान हा त्या संस्कृतीचा आणि त्यांच्याकडे असलेल्या अगाध ज्ञानाचा सन्मान असतो. कोणत्याही समाजाचा विकास होण्यासाठी शिक्षकाची भूमिका देवदूतासारखी असते. एक चांगला शिक्षक हजारो चांगले विद्यार्थी घडवू शकतो. हेच चांगले विद्यार्थी पुढे देशाचे सुजान नागरिक बनतात आणि प्रतिनिधित्व करतात. एक चांगला माणूस घडण्यासाठी त्यामागे एक चांगला शिक्षक कायम उभा असतो. 

शिक्षकांचा सन्मान करण्याची शिक्षक दिनाची ही परंपरा तशी जुनीच. 

शिक्षक म्हणजे काय? 

शि म्हणजे शील 
क्ष म्हणजे क्षमा
क म्हणजे कला

ज्याच्याकडे शील, क्षमा आणि कला यांचा त्रिवेणी संगम आहे तो म्हणजे शिक्षक. शिक्षक हे एका अर्थाने भावी पिढीला घडविणारे शिल्पकारच आहेत. आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने जीवनातील अंधार दूर करणारे मार्गदर्शकच. चुकल्यावर रागावणारेही शिक्षकच आणि पाठीवर कौतुकाची थाप मारणारेदेखील तेच. आपल्यापेक्षाही जास्त आपल्याला ओळखणारे आपले शिक्षक. आपल्यातील चांगल्या गुणांची पारख करून आपल्याला योग्य दिशा दाखविणारे आणि आपल्या जीवनाला ज्ञानाच्या प्रकाशाने तेजोमय करणारे हे आपले शिक्षक. 

तुम्हाला अजून कोणत्या विषयाची माहिती वाचायला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button