१५ जानेवारी, भारतीय लष्कर दिन (आर्मी डे) निमित्त देश सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांना सलाम !!!
आजच्याच दिवशी १९४९ साली पहिले भारतीय लष्करप्रमुख म्हणून जनरल के. एम. करिअप्पा यांनी सूत्रं हाती घेतली होती.
भारतीय लष्कराच्या सार्मथ्याचा दिवस म्हणजे लष्कर दिन. त्या दिवशी आपली तिन्ही दले त्यांचे शक्तिसार्मथ्य दाखवतात. त्याचप्रमाणे युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करतात. भारताच्या सर्व सीमा सुरक्षित ठेवणार्या लष्कराचा हा दिवस दर वर्षी १५ जानेवारी रोजी साजरा केला जातो..
एक ऐतिहासिक दिवस म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ – स्वातंत्र्यलढय़ात यशस्वी होऊन भारत स्वतंत्र झाला. भारत सरकारच्या विनंतीवरून ब्रिटिश लष्करातील काही उच्च अधिकारी आपल्या लष्करात काही वर्षे आणखी राहण्यास तयार झाले. फिल्डमार्शल क्लोड औकीनलेक यांची सर्वोच्च सेनापती म्हणून नियुक्ती झाली; तर जनरल सर रोब लोकहार्ट कमांडर इन चीफ बनले. १ जानेवारी १९४८ रोजी जनरल सर रॉबर्ट रॉय बुचर यांनी कमांडर इन चीफ म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांचा कार्यकाल एका वर्षानंतर समाप्त व्हायची वेळ जेव्हा आली, तेव्हा भारत सरकारने हा निर्णय घेतला, की आता भारतीय सेनेचा मुख्य – कमांडर इन चीफ भारतीयच असेल..
लष्कर दिन म्हणजे आपला देश आणि त्यातील लोकांच्या रक्षणार्थ आपले जीवन सर्मपित करणार्या वीर सैनिकांना एक खर्या अर्थाने वाहिलेली श्रद्धांजली आहे. नवी दिल्ली येथील इंडिया गेटवरील अमर जवान ज्योतीजवळ शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहून समारंभास सुरुवात होते. लष्कराची तांत्रिक प्रगती आणि भारतीय लष्कराकडे उपलब्ध असलेली शस्त्रसामग्री, वाहने – हत्यारे, हेलिकॉप्टरची कर्तबगारी आणि शत्रूवर हल्ल्याची प्रात्यक्षिक दृश्ये, तसेच सैनिकी कवायत दर वर्षी दिल्ली छावणी येथील आर्मी परेड मैदानावर आयोजित केली जाते. प्रजासत्ताक दिनी होत असलेल्या सैन्याच्या कवायतीची ही रंगीत तालीमच मानली जाते..
जानेवारीच्या कडक थंडीमध्येसुद्धा जवानांचा आणि प्रेक्षकांचा उत्साह वाखाणण्यासारखा असतो. सेना पदके, शौर्य पुरस्कार आणि विविध गटांना त्यांच्या कार्याकरिता प्रशस्तिपत्रके सेनाप्रमुखांकडून दिली जातात. प्रशस्तिपत्रके आणि शौर्य पदके मिळवणार्या सैनिकांकरिता हा दिवस खास असतो. कारण, प्रत्यक्ष सेनाप्रमुखांकडून त्यांचा गौरव केला जातो. लष्कराच्या ज्या तुकड्या यात भाग घेतात, त्यांना महिनाभराच्या कठोर मेहनतीनंतर हा गौरव प्राप्त होतो..
फौजी बँडच्या तालावर सैनिकांच्या तुकड्या शिस्तशीरपणे आगेकूच करीत जातात, ते दृश्य पाहण्यासारखे असते. जमीन आणि आकाशात आपल्या दुर्दम्य साहसाचा परिचय करून देणारा भारतीय लष्कराचा शो प्रत्यक्ष पाहणे हासुद्धा एक रोमांचकारी अनुभव असतो. जय हिंदच्या जयघोषाने आसमंत निनादून टाकत कार्यक्रमाची सांगता होते. देशात अन्यत्रही लष्कराच्या प्रमुख ठिकाणी १५ जानेवारीला लष्करी कवायतीचे आयोजन केले जाते. आपल्या देशातील जनतेला सेनेची तयारी आणि उत्साह पाहण्याची चांगली संधी यामुळे मिळते. तसेच युवकांना यामुळे देशाकरिता काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते..
भारतीय लष्कर जगातील सशक्त आणि मजबूत सैन्यापैकी एक आहे. भारतीय लष्कर आपल्या निडर आणि साहसी वृत्तीसाठी प्रसिद्ध आहे. इतिहासात भारतीय सेना म्हणजे एक गौरवास्पद शौर्यगाथाच आहे. सेना राजकारणापासून दूर असते आणि फक्त अंतर्गत व बाह्य धोक्यांपासून आपले रक्षण करते. भारतीय सेनेचा प्रत्येक भारतीयाला गर्व वाटतो. जेव्हा जेव्हा भारतीय सीमेवर आक्रमणे झाली, तेव्हा तेव्हा भारतीय सेनेने अतिशय उत्साही प्रतिकार करून देशाला यशस्वी केले आहे. खरं तर या प्रकारच्या सर्मपित आणि शिस्तशीर सैनिकांचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे आणि अशा लष्कराचा एक भाग बनून देशाची सेवा करायला मिळाली, तर तो आमचा सर्वोच्च सन्मान ठरला पाहिजे.
तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर लाइक आणि subscribe जरूर करा आणि हो अजून कोणत्या विषयाची माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.