३.१ शिकण्याच्या पध्दती
कालची गोष्ट पुढे चालू ठेऊ या. जंगलातील पशुपक्ष्यांच्या शाळेत सर्वांना एकसारखे विषय होते. त्यात पास होणे गरजेचे सुध्दा होते. ही शाळा चालू राहिली. बदकाला चांगले पोहता येत होते मात्र जमिनीवरुन धावताना त्याची चांगलीच दमछाक व्हायची. माशाची अवस्था तर अजून बिकट झाली. पाण्याबाहेर पडल्यावर त्याला श्वास घेणे शक्य होईना. पाण्याबाहेरच्या विषयात तर तो पूर्णपणे नापास झाला. कुत्र्याला व खारीला वेगाने धावता येत होते. मात्र उडणे व पोहणे त्यांच्या आवाक्यात नव्हते. कोकिळेला चांगले गाता येत होते. पोपटाला गाणे जमत नव्हते.
सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्या शिक्षकांना प्रत्येक विषयाची सक्ती नको असे सांगितले. आम्ही आम्हाला ज्या विषयात गती आहे त्या विषयात चांगला अभ्यास करु अशी विनवणी केली. मात्र शिक्षकांनी त्यांना तुम्ही नापास व्हाल असे सांगितले. तेव्हा सर्वांचा नाईलाज झाला. त्यांनी इतर विषयाचा अभ्यास चालू ठेवला.
त्याचा परिणाम असा झाला की, त्यांना ज्या विषयात चांगली गती होती. तो विषय सोडून इतर विषयांचा अभ्यास करताना त्यांच्या पहिल्या विषयाची सुध्दा हालत बेकार झाली. बदकाला उत्तम पोहता येत होते. मात्र वर्षाअखेरीस जेव्हा निकाल लागला तेव्हा बदक ना चालू शकत होते, ना पोहू शकत होते. जमिनीवर धावण्याच्या विषयात पास होण्यासाठी त्याने पोहण्याची क्षमता पण कमी करुन टाकली. कोकिळा पाण्यात पोहू शकली नाही. वर्षाअखेरीस सगळेजण नापास झाले. गरुडाला कावळा आणि कावळ्याला पोपट करण्याच्या या परिक्षा पध्दतीचे आपल्याला नक्कीच हसू आले असेल. ही गोष्ट आपल्या बाबतीत सुध्दा फारशी वेगळी नाही. आपल्या क्षमता आपल्या पालकांना व शिक्षकांना माहिती नसल्याने त्यांनी आपल्याला सरसकट सर्व विषयांचा अभ्यास करायला लावला. परिणामी आपण आपल्या विषयावरची पकड सुध्दा हरवून बसलो.
शाळेत घातल्यावर लिहणे, वाचणे, पाठांतर करणे, बोलणे, ऐकणे अशा सर्व कृती आपल्या कडून करुन घेतल्या जातात. त्यातील एक कोणतीतरी कला आपल्यात उत्तम असते. केवळ त्याच क्षमतेवर आपण काम केल्यास आपल्याला वेगाने शिकता येते. आपल्या जीवनात त्याच गोष्टीचा वापर सुध्दा चांगला होतो. सगळ्या गोष्टी करुन घेण्यामागची प्रेरणा ही असते की, या विद्यार्थ्यांपैकी ज्याच्याकडे जी क्षमता आहे ती त्याला सापडेल. मात्र ज्याला एका भाकरीची गरज आहे त्याला जबरदस्तीने अजून चार भाकरी खायला लावल्यास त्याच्या शरीराला त्याचा उपयोग होण्याऐवजी अपाय होण्याची शक्यता वाढेल.
मी शाळेत असताना मला लिहायला व पाठांतर करायला कधीच आवडले नाही. मी कोणत्याही शिक्षकाचे लिहण्याच्या व पाठांतराच्या बाबतीत कधीही ऐकले नाही. प्रसंगी कित्येक वेळा मार खाल्ला. लिहण्याचा सराव नसल्याने परिक्षेत माझे कितीतरी गुणांचे प्रश्न उत्तरे माहित असूनही लिहायचे राहून जायचे. मला परिक्षेत मार्क कमी पडले असतील. मात्र त्या गोष्टी मला येतच नव्हत्या असे नाही. त्याउलट मला वाचनाची, गणिते व शब्दकोडी सोडवण्याची, भाषणे करण्याची प्रचंड आवड होती. त्यात मी रोखूनही कुणाला थांबत नव्हतो. आता मला माझ्या शाळेतील शिक्षक भेटले की, माझे कौतुक करतात. ज्या विद्यार्थ्याचा कल ज्या क्षेत्रात आहे त्याला त्यातच अभ्यास करु दिला पाहिजे. इंग्रजी ही महत्त्वाची भाषा असली तरी मातृभाषेतून लवकर व चांगले शिकता येते. या गोष्टींचा विचार करुन शिकत गेल्यास माणूस लवकर यशस्वी होण्याच्या शक्यता कैकपटीने वाढतात. या सगळ्या गोष्टी मान्य केल्या तर एक प्रश्न आपल्या समोर ‘आ’ वासून उभा राहतो. तो म्हणजे, आपल्याला कोणत्या गोष्टीत गती आहे? ते ओळखायचे कसे? हे एकदा ओळखता आले की, मग त्याच तंत्राचा वापर आपल्या प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी करुन घेता येईल.
आपल्यामध्ये जन्मतः असलेल्या नैसर्गिक शिकण्याच्या पध्दती ओळखून त्याच पध्दतीने शिकण्याच्या प्रक्रियेबाबत उद्यापासून माहिती घेऊ या. गरुडाला गरुड बनवण्याच्या प्रक्रियेसाठी शुभेच्छा. लिहणे, वाचणे, बोलणे, पाठांतर की ऐकणे? या प्रश्नाचे उत्तर पुढील तीन चार दिवसात मिळेल. धन्यवाद.