उद्योगात स्थिर होण्यासाठी लागतात १ हजार दिवस
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विस्डम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजचा विषय आहे; उद्योगात स्थिर होण्यासाठी लागतात १ हजार दिवस… करायची सुरवात?
सर्वसाधारण नोकरी करण्याचीच ज्या कुटुंबात प्रथा आहे, त्या कुटुंबातील कोणीही व्यवसायात आला तर लोकांना वाटते की, आता लगेच पैसा मिळायला हवा. पण नोकरी म्हणजे, बे एके बे. पगाराचा कालावधी एक महिन्याचा असतो. महिना झाल्यावरच ठराविक रक्कम हातात येते. तर उद्योग म्हणजे; बे दुणे चार, चार दुणे आठ… पण व्यवसायाचा कालावधी हा किमान १ हजार दिवसांचा असतो. अर्थात व्यक्तिपरत्वे, व्यवसायपरत्वे हा कालावधी कमी अधिक होऊ शकतो.
जसे स्त्री एका मुलाला जन्म देण्यासाठी नऊ महिने घेते, पण नऊ स्त्रिया मिळून एका महिन्यात एका मुलाला जन्म देऊ शकत नाहीत. तसेच एखाद्या माणसाला, नवउद्योजकाला उद्योग समजण्यासाठी, मार्केटमधील सर्व प्रक्रिया, तेजी मंदी, खरेदी, विक्री, जाहिरात, मॅनेजमेंट इत्यादी व्यवसायाच्या सर्व खाचाखोचा समजून त्याला व्यवसायात तरबेज होण्यासाठी किमान ३ वर्षे लागतात, मग तुमच्याकडे कितीही भांडवल असू द्या.
बियांतून अंकुर येण्यासाठी ३ दिवस, अंड्यातून पिल्लू येण्यासाठी २० दिवस, मूल जन्माला येण्यासाठी ९ महिने लागतात, त्याचप्रमाणे एखाद्या मार्केटमध्ये एखाद्या व्यक्तीला व्यवसायात स्थिर होण्यासाठी ३ वर्षे लागतात. एकदा का तो तीन वर्षे यशस्वीपणे टिकला, की समजायचे तो व्यवसाय आयुष्यभर चालत राहणार. व्यवसाय करायचा म्हणजे संयम पाहिजे, बऱ्यावाईट प्रसंगांना तोंड देण्याची तयारी पाहिजे. झालेल्या चुका दुरुस्त करून पुढे जात राहिले पाहिजे, पण बरेच व्यवसाय इथेच मार खातात आणि आपला गाशा गुंडाळतात.
तुमच्याकडे जरी २० लाखांचे भांडवल असले तर ते टप्याटप्प्याने गुंतवत जा. सर्व भांडवल एकदम गुंतवले, तर अनुभवाविना नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. प्रथम ५ लाख गुंतवा. पहिले सहा महिने व्यवसाय करा व शिका. नंतर पुढचे पाच लाख गुंतवा. असे हळूहळू भांडवल वाढवत जा व व्यवसायात तीन वर्षात चांगल्या प्रकारे जम बसवा. नाहीतर एकदम गुंतवाल अन उत्पन्न नाही आल्यावर स्वतःचा खर्च, बँकेचे हप्ते याचे टेन्शन यायला लागेल व व्यवसाय सोडून पैशाच्या जुळवाजुळवीत वेळ जाऊन फ्लॉप शो होईल. परंतु तुम्ही टप्पाटप्प्याने २० लाख गुंतवले तर तुम्हाला अनुभव येईल, मार्केटचा अंदाज येईल, बऱ्याच नवीन गोष्टी शिकता येईल. त्यामुळे रिस्क कमी होईल. तीन वर्षात तुमची चांगली बॅलन्सशीट तयार होऊन कोणतीही बँक २५ ते ३० लाख नवीन भांडवलही देईल. तेव्हा व्यावसायिक बंधूनी १००० दिवस हा कालावधी लक्षात ठेवावा व त्यानुसार मार्गक्रमण करावे. नाहीतर आरंभशूर खूप असतात व ते दोन तीन महिन्यात यशाची अपेक्षा करतात आणि अपयशी झाल्यावर स्वतःच्या अपयशाचे खापर व्यवसायावर आणि इंडस्ट्रीवर फोडतात. त्यामुळे समाजात व्यवसायाविषयी नकारात्मक वातावरण तयार होते व नवीन व्यावसायिक तयार होत नाहीत. तुम्ही असे करू नका.
तुम्ही व्यवसाय सुरु केला आहे का? केला असेल, तर किती दिवसांपासून करत आहात. आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही माहिती आवडल्यास लेख लाईक आणि शेअर करा. नवी अर्थक्रांती चॅनेल अजून सब्स्क्राइब केला नसेल तर आत्ताच सब्स्क्राइबसुद्धा करा.