वॉरेन बफेट यांची कथा
वॉरेन बफेट गुंतवणूक क्षेत्रातील जगातील सर्वात मोठंच नाही तर धनवान मंडळींच्या मांदियाळीतीलही अग्रेसर नाव. त्यांनी सर्व संपत्ती ही स्वतः कमावलेली आहे. स्वतःजवळचे २१.५ अब्ज डॉलर्स दान देऊन सुद्धा ८७.५ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. तर त्यांची सुरुवात कशी झाली होती हे जाणून घेऊया.
वयाच्या २० व्या वर्षी वॉरेन यांनी कोलंबिया बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश घेतला. जिथे श्री. बेंजामिन ग्रॅहम शिकवत होते. मूल्य गुंतवणूक सिद्धांतासाठी त्यांना ओळखले जाते. जगातील सर्वात महान गुरुकडून आपल्याला शिकायला मिळावे ही वॉरेनची इच्छा होती.
वॉरेन बेंजामिन यांची सर्व कामे कोणत्याही मोबदल्याशिवाय करू लागले. त्यांचा प्रामाणिकपणा बघून श्री. बेंजामिन प्रभावित झाले. सुट्टीच्या दिवशी ते वॉरेनला त्यांची गुंतवणुकीची कामे करायला सांगत. १९५१ साली बेंजामिन यांनी GEICO या वाहन विमा कंपनीत अभ्यास करण्यासाठी पाठवले. स्वतः बेंजामिन त्या कंपनीच्या प्रतिनिधी मंडळावर होते. तो शनिवारचा दिवस होता. कार्यालयाच्या दरवाज्यावर ते बराच वेळ थापा मारत राहिले. शेवटी द्वारपालाने दरवाजा उघडला आणि त्यांना थेट कंपनीचे प्रमुख लोरीमोर डेव्हिडसन यांच्याकडे पाठवले. त्या दिवशी ते एकटेच कार्यालयात आलेले होते.
त्या दिवशी या दोघांच्यात पाच तास चर्चा झाली. बफेट यांच्यावर त्यांचा फार प्रभाव पडला. वॉरेननी जवळच्या कमाईतून कंपनीचे नऊ हजार डॉलर्सचे शेअर विकत घेण्याची तयारी दर्शवली. या गोष्टीने प्रभावित झालेल्या बेंजामिन यांनी GEICO कंपनीचे ५० टक्के शेअर ७.२० लाख डॉलर्स देऊन विकत घेतले.
बफेट पुढची सहा वर्षं १९५७ पर्यंत बेंजामिन यांच्याकडेच शिकत होते. स्वतःची वेगळी गुंतवणूक कंपनी काढण्याइतपत ज्ञान त्यांना मिळाले होते. बेंजामिन यांच्या एका डॉक्टर गुंतवणूकदाराला त्यांच्या नव्या कंपनीसाठी भागीदारीत १० हजार डॉलर्स गुंतवू शकणारे १० डॉक्टर्स शोधण्यास सांगितले. या प्रस्तावास अकरा डॉक्टर्सनी होकार दिला.
पुढची पाच वर्षं बफेट आपल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या मित्रमंडळींना कंपनीची शिफारस करायला सांगत होते. १९६२ मध्ये १.०५ लाख डॉलर्सच्या भागीदारीतून सुरु झालेला हा व्यवसाय ७० लाख डॉलर्सवर पोहोचला. बफेट यांनी स्वतःजवळचे १० लाख डॉलर्स डेम्पस्टर मिल या कंपनीत गुंतवले. ज्यामुळे कंपनीच्या कारभारात सुधारणा झाली आणि फक्त दोन वर्षात कंपनीने २३ लाख डॉलर्सची कमाई केली.
१९६२ मध्येच बफेट यांना अशीच अजून एक लॉटरी लागली. एका घोटाळ्यामुळे अमेरिकन एक्स्प्रेसचे शेअर्स ६५ डॉलर वरून ३५ डॉलर पर्यंत घसरले होते. बाकीचे सर्व लोक मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत शेअर विकत होते. त्यावेळी बफेट यांनी स्वतःच्या संपत्तीचा ४० टक्के हिस्सा १३ लाख डॉलर्स अमेरिकन एक्स्प्रेसमध्ये गुंतवले. पुढच्या दोन वर्षात त्या शेअर्सची किंमत तिपटीने वाढली आणि भागीदारांनी २० लाख डॉलर्स कमावले.
त्यानंतर चार वर्षांनी मरणासन्न अवस्थेतील एक कापड कंपनी, ‘बर्कशायर हाथवे’ त्यांनी विकत घेतली. त्यावेळची आठवण सांगताना बफेट म्हणतात, “आम्ही एका भयानक बिझनेस मध्ये हात घातला होता. मी त्याला ‘वापरलेल्या सिगारेटचा थोटका’ म्हणतो. तुम्हाला तो खाली पडलेला दिसतो. तो खराब झालेला दिसतो, पण त्यात अजून थोडासा भाग शिल्लक राहिलेला असतो आणि तो तुम्हाला फुकटात मिळतो म्हणून तुम्ही तो उचलता. बर्कशायर विकत घेताना हाच विचार माझ्या मनात होता. ती तिच्या एकूण भांडवलापेक्षा खूप कमी किमतीत विकली जात होती म्हणून मी घेतली. पण ती खूपच वाईट चूक होती”
ही कंपनी विकत घेतल्यावर बफेट यांनी तिच्या कारभारात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे सगळे प्रयत्न फोल गेले. मग त्यांनी त्यांच्या या ‘चुकीचा’ वापर त्यांचे सर्व गुंतवणूक व्यवहार सांभाळण्यासाठी सुरु केला. कंपनी शेअर बाजारात नोंदणीकृत असल्याने ते आता शेअर बाजारातून पैसे उभे करू शकत होते. GEICO बरोबरचा अनुभव गाठीशी असल्याने विमा कंपन्यांचे महत्त्व ते जाणून होते.
१९६७ मध्ये त्यांनी ८६ लाख डॉलर्स देऊन दोन विमा कंपन्या विकत घेतल्या. ज्यांचा एकत्रित पोर्टफोलिओ होता ३.२ कोटी डॉलर्स. पुढील दोन वर्षात त्यात वाढ होऊन तो ४.२ कोटी डॉलर्स वर पोहोचला. बफेट यांनी आपले हे धोरण तसेच सुरु ठेवले. २००४ पर्यंत बर्कशायर हाथवेने ३८ विमा कंपन्या विकत घेतल्या होत्या.
१९७९ पर्यंत बफेट यांची एकूण संपत्ती १४ कोटी डॉलर्सवर पोहोचली होती, पण त्यांनी आपल्या पगारात वाढ केली नाही. पूर्वीचाच ५० हजार डॉलर एवढाच पगार घेत राहिले. अजूनही ते आपल्या जुन्या घरातच राहतात, जे त्यांनी १९५८ मध्ये ३१ हजार ५०० डॉलर्सला विकत घेतले होते. पुढे ४० वर्षं बर्कशायर हाथवेचे शेअर चक्रवाढ पद्धतीने जवळपास २२.२ टक्के या दराने वाढतच राहिले आणि आज बफेट यांची संपत्ती ८७.५ अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड आहे.
काही वर्षांपूर्वीच त्यांनी लोवातील (अमेरिकेतील एक राज्य) जगातील सर्वात मोठ्या पवनऊर्जा प्रकल्पात ३.५ अब्ज डॉलर्स गुंतवण्याची घोषणा केली होती. तसेच त्यांनी आपल्या आपल्या संपत्तीचा ९९ टक्के हिस्सा दान करण्याची प्रतिज्ञा केली आहे. याआधीच २००६ पासून आजपर्यंत त्यांनी जवळपास २१.५ अब्ज डॉलर्सचा निधी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनला दान स्वरुपात दिला आहे.
वॉरेन यांनी गुंतवणूक करताना नेहमी दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य दिले. ते नेहमी म्हणतात, “तुम्हाला प्रतिष्ठा कमवायला २० वर्षे लागतात आणि गमवायला फक्त ५ मिनिटे पुरेशी आहेत. तुम्ही जर ही गोष्ट लक्षात ठेवली तर तुम्ही प्रत्येक गोष्ट वेगळ्या प्रकारे कराल”
जगातील सर्वात श्रीमंत लोकांकडून तुम्ही कोणते धडे शिकू शकता?
पैसा कमावण्याआधी तो कसा कमवायचा हे शिकण्यात तुमचा वेळ गुंतवायला तुम्हाला आवडते का? ‘निर्गमन धोरण (Exit Strategy) ऐवजी यशस्वी धोरण (Success Strategy) वर तुम्ही कसे लक्ष केंद्रित करू शकता? ज्यामुळे तुम्हाला कधीही व्यवसाय बंद करण्याची वेळ येणार नाही.
वॉरेन बफेट एकदा विद्यार्थ्यांशी बोलताना म्हणाले होते, “माझ्याकडे तुमच्यापेक्षा कदाचित जास्त पैसे आहेत, पण त्याने काहीही फरक पडत नाही. तुमच्यात आणि माझ्यात एकमात्र फरक आहे; तो म्हणजे, मी रोज सकाळी उठल्यावर मला जे करायला आवडतं, ते सगळं काही करू शकतो. तुम्हाला माझ्याकडून काही संदेश हवा असेल, तर तो हाच असेल”