दोन अपयशांनंतर उभा केलेला भारतातील सर्वात वेगाने वाढणारा होम-सोल्यूशन्स ब्रँड: Wakefit

Wakefit बद्दल जाणून घ्या.
भारतामध्ये स्टार्टअप्सची मोठी लाट आली तेव्हा काही उद्योजकांनी प्रचंड यश मिळवलं, तर काहींची स्वप्नं अपयशामुळे कोलमडली. पण अपयशाचा स्वीकार करून पुन्हा उभं राहणं, स्वतःचा उद्योग उभारणं आणि लाखो ग्राहकांचा विश्वास मिळवणं,ही गोष्ट प्रत्येकाला जमत नाही. अशा मोजक्याच धैर्यवान उद्योजकांपैकी एक नाव म्हणजे चैतन्य रामलिंगेगौडा. मध्यमवर्गीय घरात वाढलेला हा तरुण, शिक्षण पूर्ण करून मोठ्या करिअरच्या संधींच्या उंबरठ्यावर असताना काहीतरी वेगळं करण्याच्या स्वप्नाने प्रेरित झाला. पण त्याचे सुरुवातीचे दोन स्टार्टअप्स अपयशी ठरले आणि त्याला पुन्हा नव्याने विचार करावा लागला.
याच टप्प्यावर चैतन्य यांनी हार न मानता, स्वतःच्या चुका समजून घेतल्या आणि लोकांच्या खऱ्या गरजा ओळखण्यावर लक्ष केंद्रित केलं. चिकाटी, सातत्य, ग्राहकांचा सखोल अभ्यास आणि अखंड मेहनत यांच्या बळावर त्यांनी Wakefit ला करोडोंची कंपनी बनवलं. आजच्या या लेखात आपण अपयशातून शिकत यशाकडे वाटचाल कशी केली, याचा त्यांच्या प्रेरणादायी प्रवासावर एक नजर टाकूया.
कर्नाटकातील मध्यमवर्गीय घरातून ISB पर्यंतचा प्रवास
चैतन्य रामलिंगेगौडा यांचा जन्म कर्नाटकमधील एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मेहनत, शिक्षण आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या संस्कारात वाढलेल्या चैतन्य यांनी लहानपणापासूनच अभ्यासात सातत्य राखलं. त्यामुळेच त्यांनी VTU मधून कॉम्प्युटर सायन्स हे शिक्षण घेतलं आणि नंतर भारतातील प्रतिष्ठित संस्थेत मानल्या जाणाऱ्या ISB हैदराबादमधून MBA पूर्ण करून कुटुंबाचा अभिमान वाढवला. त्यांच्या शैक्षणिक प्रवासात बुद्धिमत्ता, मेहनत आणि स्वतःला सिद्ध करण्याची ओढ स्पष्ट दिसत होती.
पण अभ्यासात यश मिळूनही खऱ्या आयुष्याचा प्रवास इथेच थांबला नाही. उच्च शिक्षणानंतर चैतन्य यांच्या आयुष्यात अनेक बदल घडवणाऱ्या घटनांची सुरुवात झाली. मोठ्या नोकरीच्या संधी उपलब्ध असूनही, त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न मनात जपलं. आयुष्यात जोखीम घेण्याचा निर्णय घेत त्यांनी उद्योजकतेची दिशा पकडली.
पहिले दोन स्टार्टअप्स अपयशी
चैतन्य रामलिंगेगौडा यांनी उद्योजकतेत पहिले पाऊल टाकलं ते TwolyMadlyDeeply या डेटिंग मीटअप ॲपद्वारे. ॲपची कल्पना नाविन्यपूर्ण होती आणि उत्पादन देखील चांगलं होतं. पण व्यवसाय वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असणारा मॉनेटायझेशनचा मार्ग त्यांना सापडला नाही. वापरकर्त्यांची संख्या वाढत असतानाही आर्थिक स्थैर्य मिळू शकत नव्हतं, आणि शेवटी हा उपक्रम बंद करण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला. यानंतर त्यांनी मीडिया क्षेत्रात दुसऱ्या स्टार्टअपची सुरुवात केली, पण इथेही अपेक्षित प्रोडक्ट-मार्केट फिट साधता आलं नाही. लोकांना नक्की काय हवं आहे आणि ते कशासाठी पैसे मोजायला तयार आहेत हे समजून घेणं त्यांच्या दृष्टीने अजूनही एक महत्त्वाचं आव्हान होतं.
सलग दोन अपयश कोणालाही खचवू शकतात, अनेक जण या टप्प्यावर धैर्य सोडून परत नोकरीच्या मार्गावर वळले असते. पण चैतन्य यांची वृत्ती वेगळी होती. त्यांनी अपयशाकडे अडथळा म्हणून पाहिलं नाही, तर शिकण्याची संधी म्हणून घेतलं. कुठे चूक झाली?, ग्राहकांच्या खऱ्या समस्या काय आहेत?, लोक काय शोधत आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्यांनी अधिक अभ्यास केला.
समस्या शोधली – Wakefit ची सुरुवात

Wakefit ची सुरुवात एका रोजच्या पण महत्त्वाच्या समस्येपासून झाली. एकदा चैतन्य यांचा मित्र अंकित सतत पाठीच्या दुखण्याची तक्रार करत होता. उपाय शोधताना दोघांना लक्षात आलं की बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक गाद्या महाग आहेत, त्यांचा दर्जा समाधानकारक नाही आणि ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. महागड्या गाद्या घेतल्या तरी आराम मिळत नाही, हमी फक्त कागदोपत्री असते आणि ग्राहक कोणावरही विश्वास ठेवू शकत नाहीत,हीच खरी समस्या होती. तेव्हा चैतन्य आणि अंकित यांनी ठरवलं की मॅट्रेस उद्योगच बदलायचा. फक्त बोलून न थांबता, त्यांनी स्वतःची १३ लाखांची बचत जमा करून Hosur–Mysore औद्योगिक पट्ट्यात एक छोटंसं फोम कटिंग आणि मॅट्रेस असेंब्ली युनिट सुरू केलं. आणि याच ठिकाणी मार्च २०१६ मध्ये Wakefit चा जन्म झाला.
सुरुवातीचे दिवस अतिशय कठीण होते. वर्कफोर्स जवळजवळ नसल्यामुळे दोघांनाच सर्व कामं हाताळावी लागत होती. चैतन्य दिवसभर फोमची गुणवत्ता, डेन्सिटी आणि मटेरियल तपासत, तर रात्री ते स्वतःच ग्राहकांच्या घरी गाद्या पोहोचवत. ग्राहकांचा विश्वास मिळवणं सर्वात महत्त्वाचं असल्याचं जाणून त्यांनी भारतात पहिल्यांदाच १००-night free trial सुरू केलं,ग्राहकांनी गादी १०० रात्री वापरून पाहावी, न पसंत पडली तर परत करावी, कोणताही प्रश्न नाही. तक्रारी असोत, विलंब असो किंवा फोन कॉल्स,सगळं चैतन्य स्वतः सांभाळत होते. हळूहळू ही पारदर्शकता, मेहनत आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन लोकांच्या मनाला भिडला. आणि इथूनच Wakefit च्या उल्लेखनीय यशाची खरी सुरुवात झाली.
माऊथ मार्केटिंग मुळे व्यवसायात प्रचंड वाढ
Wakefit च्या वेगवान वाढीमागील मुख्य कारण म्हणजे त्यांचं डायरेक्ट-टू-कन्स्युमर (D2C) मॉडेल. या मॉडेलमध्ये उत्पादक आणि ग्राहक यांच्यामध्ये कोणतेही दलाल किंवा दुकानदार नसतात. त्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला आणि ग्राहकांना बाजारातील इतर ब्रँड्सपेक्षा ४० % स्वस्त आणि दर्जेदार उत्पादने मिळू लागली. समाधानी ग्राहकांनी Wakefit बद्दल इतरांनाही सांगितल्याने माऊथ मार्केटिंग वाढत गेलं. परिणामी, २०१८ मध्ये Wakefit चा महसूल तब्बल ८० कोटींवर पोहोचला. ही वाढ इतकी उल्लेखनीय होती की Sleepwell आणि Kurlon सारखे मोठे ब्रँडदेखील या नव्या स्पर्धकाकडे लक्ष देऊ लागले.
याच वर्षात Wakefit ला मोठा टप्पा गाठता आला, कारण Sequoia Surge या प्रतिष्ठित गुंतवणूकदाराने कंपनीत ६५ कोटींची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीच्या जोरावर Wakefit ने सोनीपत आणि होसूर येथे मोठी आणि आधुनिक उत्पादन केंद्रे उभारली. उत्पादन क्षमता वाढली, सेवा अधिक वेगवान झाली आणि ग्राहकांचा विश्वास आणखी मजबूत झाला. २०१९ पर्यंत कंपनीचा महसूल जवळजवळ १९७ कोटींवर पोहोचला आणि Wakefit देशातील सर्वात जलद वाढणाऱ्या ब्रँड्सपैकी एक बनला.
यशाच्या शिखरावर
Wakefit ने फक्त गाद्यांपुरतं मर्यादित न राहता सोफा, बेड, वॉर्डरोब, स्टडी टेबल अशा घरासाठी आवश्यक असलेल्या अनेक प्रॉडक्ट्सची निर्मिती सुरू केली. दर्जेदार आणि परवडणारी उत्पादने दिल्यामुळे कंपनीचा महसूल ४०० कोटींच्या पुढे गेला. त्यांनी भारतातील पहिला Sleep Research Lab सुरू केला आणि त्यांच्या मार्केटिंग मोहिमा देशभरात वायरल झाल्या.

Wakefit ची ताकद म्हणजे गुणवत्ता आणि सततचा नवोन्मेष. दररोज ५०० पेक्षा जास्त गाद्या तयार होतात आणि महिन्याला जवळपास ९,००० गाद्या ग्राहकांकडे पोहोचतात. त्यांच्या फोमला आंतरराष्ट्रीय Certi-PUR आणि Greenguard प्रमाणपत्रे आहेत. भारतातील मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या पाठीच्या वेदना आणि झोपेच्या समस्यांवर उपाय म्हणून त्यांनी वैज्ञानिक तंत्रज्ञान वापरून अधिक आरामदायी आणि आरोग्यदायी मॅट्रेस तयार केल्या.
२०२१ ते २०२४ या कालावधीत Wakefit ने झपाट्याने प्रगती केली. २०२१ मध्ये कंपनीचं मूल्यांकन ३८० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचलं. २०२२ मध्ये महसूल ८२० कोटींवर गेला आणि Investcorp कडून २०० कोटींची गुंतवणूक मिळाली. २०२४ मध्ये Wakefit ने १००० कोटी महसूल, ६५ कोटी नफा आणि २ मिलियनहून अधिक ग्राहकांची नवी उंची गाठली. आज Wakefit देशभर ५ उत्पादन केंद्रे आणि ९८ स्टोअर्ससह भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ब्रँड्सपैकी एक आहे.
मित्रांनो, चैतन्य आणि अंकित यांनी अपयश आल्यावरही हार मानली नाही. ग्राहकांच्या गरजा समजून घेणं, गुणवत्ता कधीही न घसरू देणं आणि सतत सुधारत राहणं,या तत्त्वांमुळेच Wakefit आज इतक्या मोठ्या उंचीवर पोहोचला आहे. एका साध्या समस्येतून उगम पावलेली कल्पना आज उपाय बनली, उपायातून ब्रँड तयार झाला आणि तोच ब्रँड आता भारतातील १००० कोटींपेक्षा मोठी कंपनी बनला. Wakefit ही फक्त कंपनी नाही, तर तरुण उद्योजकांसाठी जिद्द, सातत्य आणि शिकण्याची प्रेरणा देणारी एक जिवंत उदाहरण आहे की अपयश हा शेवट नसून, मोठ्या यशाची सुरुवात असते.
आणखीन वाचा:
- मुंबईची झोपडपट्टी ते दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय
- ५,००० रुपये उसने घेऊन उभारली १७,००० कोटींची कंपनी: पी. रामचंद्रन यांचा संघर्ष आणि “उजाला” साम्राज्य.
- इडली विक्रेता ते पंचतारांकित हॉटेलांचा मालक- विठ्ठल कामत



