दिनविशेष

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले पहिले मराठी साहित्यिक, अग्रगण्य कादंबरीकार वि. स. खांडेकर

V.S. Khandekar

वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंत:करणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. ललित भाषा रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख आणि तेजस्वी. लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यांचा लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि धेयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात, म्हणूनच तर वि.स.खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात.

कुमार वयापासूनच त्यांच्यावर उत्तम साहित्याचे संस्कार होत होते, ते त्यांच्या मराठीच्या शिक्षकांमुळे आणि बालकवी, राम गणेश गडकरी, अच्युतराव कोल्हटकर यांसारख्या साहित्यिकांशी झालेल्या परिचयामुळे. गडकरींमुळे पाश्र्चात्त्य साहित्य वाचण्याचा छंदही त्यांना तेव्हा लागला होता. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी खांडेकरांना विनोद चांगला साधतो व काव्यात्म प्रकृतीचे लेखनही ते करू शकतात, तेव्हा या दोहोंचे मिश्रण असलेल्या गोष्टी त्यांनी लिहाव्यात असे सुचवले; तेव्हा खांडेकर यांना स्वत:त लपून बसलेला कथाकार सापडला. ते उत्कृष्ट वक्ते म्हणूनही महाराष्ट्रात प्रसिद्ध होते.

एक कादंबरीकार म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच त्यांना महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही अफाट लोकप्रियता मिळाली. १९३० मध्ये ‘हृदयाची हाक’ ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. त्यानंतर एकापाठोपाठ एक कांचनमृग, दोन ध्रुव, हिरवा चाफा, दोन मने, रिकामा देव्हारा, पहिले प्रेम अशा त्यांच्या अनेक कादंबर्‍या प्रकाशित झाल्या. सुमारे ३५ कथासंग्रह, १० लघुनिबंध संग्रह, गोफ आणि गोफण यांसारखे समीक्षालेख संग्रह असे झंझावाती लेखन त्यांनी केले. छाया, ज्वाला, अमृत, देवता, माझं बाळ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या कथाही त्यांनी लिहिल्या. शब्दप्रभुत्व, कोटीबाजपणा, कल्पनावैभव यांचा वारसा त्यांनी कोल्हटकर-गडकरी यांच्याकडून घेतला. मध्यमवर्गीय माणसांच्या आशा-आकांक्षा, सर्वसामान्यांची सुख दु:खे, त्यांचा आदर्शवाद त्यांनी मुख्यत्वे आपल्या कथा-कादंबर्‍यांतून मांडला. त्यांचा नायक हा सामाजिकतेचे भान असलेला, आदर्शाची ओढ असलेला असे.

हळूहळू बदलत चाललेल्या सामाजिक परिस्थितीत या प्रकारचा आदर्शवाद ही मध्यमवर्गीय तरुण पिढीची मानसिक गरज होती. त्यामुळे खांडेकर त्या काळातले सर्वांत लोकप्रिय लेखक ठरले. त्यांची क्रौंचवध ही कादंबरीही लोकप्रिय ठरली. ययाती, अमृतवेल या स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वांत जास्त गाजलेल्या त्यांच्या कादंबर्‍या होत. ‘ययाती’ला १९६० चा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला.

भारत सरकारने १९६८ मध्ये पद्मभूषण सन्मान देऊन त्यांना गौरवले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहला केली. तर भारतीय ज्ञानपीठातर्फे १९७४ मध्ये त्यांना ‘ज्ञानपीठ’ या अत्युच्च मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या कथा-कादंबर्‍यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दुरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय भाषांत व विदेशी भाषांतही अनुवाद झाले.

‘रूपककथा’ ही खांडेकरांनी मराठी कथेला दिलेली देणगी होय. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी त्यांनी या कथांतून केली. वेचलेली फुले या संग्रहात या रूपककथा आहेत. अक्षरश: चकित व्हायला व्हावे एवढे विविध प्रकारचे, विपुल आणि तरीही दर्जेदार असे लेखन करून खांडेकरांनी मातृभाषेची सेवा केली आहे, आणि त्यायोगे मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून त्यांनी मराठी रसिकांत व साहित्यिकांमध्ये चैतन्य आणि आत्मविश्र्वास निर्माण केला.

Source : http://mh-marathi.com/v-s-khandekar/

#VSKhandekar #मराठी #ज्ञानपीठ #ययाती #वि._स._खांडेकर

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button