मित्रांनो कोणतीही मोठी ट्रीप म्हटलं की त्याला महिन्याभराची planning आली. प्रवासात खाण्याच्या पदार्थांपासून ते तिथे गेल्यावर घालायच्या कपड्यांपर्यंत सगळ्या गोष्टींची तयारी करण्यात आपलं बराच वेळ जातो, पण आज तुम्हाला आम्ही जे ठिकाण सांगणार आहे तिथं इतक्या planning ची काहीच गरज नाहीये. हा फक्त tickets booking साठी वगैरे तुम्हाला आधी थोडा वेळ काढावा लागेल, पण नंतर मात्र तुम्हाला छानपैकी निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवता येईल.
हिमाचल प्रदेशामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं रोजच्या गोंगाटापासून आपल्याला शांतीची अनुभूती मिळते. यातल्याच एका ठिकाणाबद्दल “खजियार” बद्दल आपण मागील लेखात पाहिलं होतं. हिमाचल प्रदेशमधील असंच आणखी एक सुंदर आणि शांत ठिकाण म्हणजे तीर्थन व्हॅली. हे एक असं ठिकाण आहे जिथं तुम्ही चार ते पाच दिवसांचा वेळ आनंदात आणि तितकाच शांततेत घालवू शकता. या प्रदेशामध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, पण सगळीकडे फिरत बसण्यापेक्षा एका ठिकाणीच काही दिवस घालवले तर तुम्हाला जास्त आनंद मिळेल.
जिभी
हिमाचल प्रदेशच्या तीर्थन व्हॅलीमधील एक निसर्गरम्य गाव म्हणजे जिभी. इथल्या वॉटरफॉलचं सौंदर्य काही औरच असतं. डोंगरांमधून खळखळत खाली येणारं पाणी मनाला एक वेगळीच शांतता देऊन जातं. सोबतच्या पक्षांचा चिवचिवाटही या आनंदात भर घालतो.
जलोरी पास आणि सिरोलसार लेक
इथल्या आकर्षणामध्ये ही दोन ठिकाणंसुद्धा महत्त्वाची आहेत. फक्त ठिकाणंच नाही तर इथपर्यंत पोहोचण्याचे रस्तेही तितकेच मनमोहक आहेत. रस्त्यावर बर्फाची चादर अंथरलेली असल्याचा भास या ठिकाणी जाताना होतो. मध्यभागी गोठलेला तलाव आणि चारही बाजूंनी बर्फच बर्फ. उंचावर असलेलं मंदिर. इथे एकदा आल्यानंतर तुमचा वेळ कसा जाईल याचा अंदाजही येणार नाही.
चैहणी गाव
तीर्थन व्हॅलीतील आणखी एक छोटसं गाव म्हणजे चैहणी. यालाच चैहणी कोठी सुद्धा म्हणतात. इथे एक कोठी आहे. लाकडांपासून तयार केलेली ही कोठी १५०० वर्ष जुनी आहे. इथे कुल्लूचे राजा राणा ढाढिया राहत होते. १५ मजल्यांची ही इमारत १९०५ मध्ये आलेल्या भूकंपात १० मजलीच शिल्लक राहिली आहे. या कोठीतच शृंगा ऋषींचं भंडारही आहे. या कोठीपासूनच साधारण एक किमीच्या अंतरावर शृंगा ऋषींचं मंदीर आहे.
तीर्थन व्हॅलीला केव्हा जाणार?
तीर्थन व्हॅलीला भेट देण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे मार्च ते जून. यावेळी वातावरण फारच चांगलं असतं. जास्त थंडीही नसते. त्यासोबतच वेगवेगळ्या थरारक खेळांचाही तुम्ही इथे आनंद घेऊ शकता. उन्हाळ्यात जलोरी पास आणि हिमालयन नॅशनल पार्कची ट्रेकिंग सुद्धा करू शकता.
कसे जाल?
तीर्थन व्हॅलीला पोहोचण्यासाठी भुंटर हे येथील सर्वात जवळचं एअरपोर्ट आहे. या एअरपोर्टहून टॅक्सीने तुम्ही तीर्थन व्हॅलीला पोहोचू शकता. तीर्थन व्हॅलीला रेल्वे स्टेशन नसल्याने तुम्हाला शिमलापर्यंत रेल्वेची तिकीट बुक करावी लागेल. तेथून तुम्ही टॅक्सीने जाऊ शकता.
आणखी वाचा
- महा सौंदर्य महाराष्ट्राचं !
- स्वित्झर्लंडची मजा भारतात घ्यायचीये? मग या ठिकाणी जायलाच पाहिजे!
- दांडेली अभयारण्य: कर्नाटकातील नैसर्गिक सौंदर्याचा खजिना