उद्योजकताबिझनेस महारथी

मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, तोच मुलगा जगातील सर्वात मोठा संशोधक बनला

मेहनत करूनही यश मिळत नाही म्हणून प्रयत्न सोडून देणारे जगात अनेकजण आहेत, पण आज आपण ज्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत ते व्यक्तिमत्व इतकं महान आहे, की हजारहून अधिक वेळा आपले प्रयत्न चुकले, तरी त्यात सातत्य ठेवून त्याने अखेरीस विजेच्या बल्बचा शोध लावला. लहानपणी ज्याला मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, पण आज त्याच्या नावावर १०९३ पेटंट आहेत अशा त्या महान व्यक्तिमत्वाचं नाव आहे थॉमस अल्वा एडिसन.

नमस्कार! नवी अर्थक्रांतीमध्ये आपलं स्वागत आहे… स्टार्टअप आणि उद्योग क्षेत्रातील रंजक आणि उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत.

अमेरिकेतील ओहियो राज्यामधील मिलान या गावात सॅम्युअल आणि नॅन्सी नावाचे दाम्पत्य राहात होते. सॅम्युअल दुकानात काम करत, तर नॅन्सी घरी शिकवणी घेऊन संसाराला हातभार लावत असे. ११ फेब्रुवारी १८४७ रोजी या दाम्पत्याच्या पोटी एडिसनचा जन्म झ़ाला. लहानपणापासूनच एडिसनला प्रत्येक गोष्टीच कुतूहल होतं. एडिसनने एकदा आपल्या आईला विचारलं कि, ‘पक्षी हवेत का उडतात?’ यावर तिने सांगितलं कि, ‘ते किडे खातात ना, त्यामुळं हवेत उडतात.’ यावर एडिसन बागेत गेला. त्याने अनेक किडे जमा केले, त्याचा घोळ बनवला आणि आपल्या मित्राला म्हणाला की, ‘हे पिलं कि तू हवेत उडशील.’ त्याचा मित्र ते प्याला. तो हवेत काय उडाला नाही, पण एडिसनला दिवसा तारे मात्र नक्की दिसले. आपल्या कुतुहलामुळं असे अनेक वेडेवाकडे प्रश्न एडिसन विचारायचा. त्यामुळं त्याला सगळे निर्बुद्ध आणि मतिमंद म्हणायचे.

शाळेतून येताना एकदा एडिसन शिक्षकांची एक चिट्ठी घेऊन आला. जी त्याने आपल्या आईला दिली. ती वाचून त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. एडिसनने जेव्हा आपल्या आईला विचारलं की यात काय लिहिलंय, तेव्हा त्याची आई म्हणाली, त्यांनी लिहिलेलं आहे की, ‘तुमचा मुलगा खूप हुशार आहे. तो एक विद्वान आहे आणि आमची शाळा आणि शिक्षक त्याला शिकवण्यात कमी पडत आहेत.’ तेव्हापासून पुढं एडिसनचं घरातच शिक्षण चालू झालं. त्याची आई त्याला अनेक पुस्तक आणून द्यायची आणि एक पुस्तक वाचलं कि त्याला पैसे मिळायचे. एडिसन विज्ञानाची अनेक पुस्तकं वाचू लागला. त्यानं आपल्या घरातच एक लहान प्रयोगशाळा चालू केली. तो तिथं अनेक प्रयोग करू लागला. रसायनं घ्यायला पैसे कमी पडत, म्हणून तो पेपर टाकत असे, रेल्वेमध्ये चॉकलेट गोळ्या विकत असे. घरातील त्याच्या उपद्व्यापामुळे घरचे वैतागले. त्याच्या आईने चिडून त्याची प्रयोगशाळाच बंद केली. नंतर त्यानं रेल्वेच्या एका लहान डब्यात आपले प्रयोग चालू केले. तिथं देखील एक अपघात घडला आणि त्याच्या एका रसायनामुळं डब्याला आग लागली. यावर रेल्वेच्या टिसीने एडिसनच्या इतक्या जोरात कानफटात वाजवली कि, तेव्हापासून एडिसनला कमी ऐकू यायला लागलं. पुढं जेव्हा त्याला यावर प्रश्न विचारला. तेव्हा याकडं देखील सकारात्मक पाहत एडिसन म्हणाले कि, ‘बरं झालं मला कमी ऐकू येतं. त्यामुळे मला वायफळ बडबड ऐकून घ्यावी लागत नाही आणि माझं लक्ष फक्त कामावर असतं.’

हार न मानता लहान एडिसनने त्याचे प्रयोग चालू ठेवले. अशातच एकदा रेल्वेखाली येणाऱ्या एका लहान मुलाचा जीव एडिसनने वाचवला. तो लहान मुलगा स्टेशनमास्तर मॅकेंझीचा होता. याचं बक्षिस म्हणून त्याने एडिसनला टेलिग्राफ ऑपरेटिंग शिकवले. १५ वर्षाचा एडिसन टेलिग्राफ ऑपरेटर म्हणून काम करू लागला आणि सोबतच आपले प्रयोगही. दिवसभर प्रयोगात दंग असल्यामुळे त्याला रात्री झोप येई, म्हणून त्याने टेलिग्राफलाच घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी.

घरची परिस्थिती बिघडत चालली होती वडिलांची नोकरी सुटली, आई आजारी. यामुळं घरची आर्थिक जबाबदारी पेलण्यासाठी एडिसन बोस्टनला आला आणि वेस्टर्न युनियन कंपणीमध्ये नोकरी करू लागला. १८६९ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी तो न्यूयॉर्क मध्ये आला. तिथं त्यानं आपला पहिला यशस्वी प्रयोग केला युनिवर्सल स्टोक प्रिंटर बनवण्याचा. त्याने जेव्हा तो विकायचा ठरवलं तेव्हा त्याची किंमत ४हजार डॉलर्स लावली, पण एडिसनचा तो अविष्कार एक अमेरिकन माणसाने चक्क ४० हजार डॉलर्सला विकत घेतला. आता मात्र एडिसनकडे आपली स्वतःची प्रयोगशाळा उभारण्यासाठी पुरेसे पैसे होते.

या प्रयोगशाळेत त्यांनी अनेक प्रयोग केले. त्यांने ग्रामोफोनचा शोध लावला. त्याकाळी गाणी ऐकण्यासाठी वापरलं जाणारं हे मशीन अल्पावधीतच लोकप्रिय झालं. एडिसनचं पहिलं प्रेम इलेक्ट्रिसिटी होतं. खरंतर इलेक्ट्रिकं बल्बचा शोध वोडवॉर्ड आणि इवान यांनी लावला, पण अपुऱ्या पैशामुळं त्यांना तो पुढं नेता आला नाही. एडिसनने त्यांच्याकडून या साठीचे सगळे हक्क खरेदी केले आणि आपल्या प्रयोगशाळेत तो याचे प्रयोग करू लागला. अखेरीस २१ ऑक्टोबर १८७९ मध्ये दिवसभर म्हणजे जवळपास १३ तास चालणारा बल्ब बनवण्यात एडिसनला यश मिळालं. त्याचा हा अविष्कार पहाण्यासाठी माणसं येऊ लागली.

त्यांनी नंतर एडिसन एलुमनेटिंग कंपनी चालू केली. जिच्यासाठी फोर्ड यांनी मदत केली आणि ती बनली जनरल इलेक्ट्रिक कंपनी बनली. याच हेन्री फोर्ड यांची माहिती मागील व्हिडीओमध्ये आम्ही सांगितली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तो व्हिडीओ नक्की पहा.

एडिसन आपल्या अनेक प्रयोगात यशस्वी होत होते. घरातील कपाट आवरत असताना त्यांना एक पत्र सापडलं. हे ते पत्र होतं, जे त्यांच्या आईला त्यांच्या शिक्षकांनी दिलं होतं. त्यांनी ते उघडलं, तर त्यात लिहिलं होतं की, ‘तुमचा मुलगा मतिमंद आहे, निर्बुद्ध आहे. आम्ही त्याला शिकवू शकत नाही. त्याला शाळेतून काढून टाकण्यात येत आहे.’ हे पत्र वाचून एडिसन रडू लागले. आपल्या आईने आपल्यासाठी काय केलं आहे हे त्यांच्या लक्षात आलं. एडिसन यांनी लिहून ठेवलं आहे कि, ‘एका महान आईनं एका मतिमंद मुलाला अजरामर असा संशोधक बनवलं.’ मित्रहो आजकाल आपण पहातो की, आपल्या मुलाने अमुक एवढे मार्क्स मिळवलेच पाहिजेत म्हणून दबाव टाकणारे अनेक पालक आहेत. अशांसाठी एडिसनची आई बरंच काही शिकवून जाते. 

आपल्याला माहित नसेल, पण मोशन पिक्चर म्हणजेच चलतचित्र, त्याचा शोध लावण्यात देखील एडिसन यांचा खूप मोठा वाटा आहे. फ्लोरोस्कोपी मशीन जे Xरे साठी वापरलं जात,  ट्रान्समीटर, रिचार्जेबल बॅटरी, अनेक प्रकारचे केमिकल्स असे एक ना अनेक शोध एडिसन यांनी लावले आहेत. एडिसन हे संशोधकासोबतच एक गुंतवणूकदारसुद्धा होते. त्यांनी खाणकाम क्षेत्रातही गुंतवणूक केली होती. पहिल्या जागतिक युद्धात देखील अमेरिका सरकारला एडिसन यांची खूप मदत झाली.

जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडं सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला शिकवणाऱ्या या महान संशोधकाचा मृत्यू १८ ऑक्टोबर १९३१ मध्ये झाला. एडिसन यांनी पहिल्या बायकोच्या मृत्यनंतर दुसरं लग्न केलं. त्याना एकूण ६ मुलं आणि विशेष म्हणजे सहाही जण शास्त्रज्ञ होती. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा चार्ल्स  एडिसन याने त्यांच्या कंपनीची घोडदौड सांभाळली.

माणूस सकारात्मक असला की त्याच्या हातून होणाऱ्या गोष्टीसुद्धा सकारात्मक आणि भव्यदिव्य असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे थॉमस अल्वा एडिसन. शाळेतून काढलेल्या मुलाबाबत आजकालचे आईवडील, समाज कदाचित मानसिक खच्चीकरण करेल, पण एडिसनच्या आईच्या विश्वासाने याच मतिमंद समजल्या जाणाऱ्या मुलाला १०९३ पेटंट मिळवणारा संशोधक बनवलं. कमी ऐकू येण्याला जीवनातला अडथळा न मानता, उलट त्यामुळे आपण कामावर जास्त लक्ष केंद्रित करू शकलो, बल्ब बनवण्यात मला १००० वेळा अपयश आलं नाही, तर कोणत्या पद्धतीने बल्ब बनवला, तर तो बनत नाही याचे १००० मार्ग सापडले असा जगावेगळा विचार करणारे एडिसन.


आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button