Yamaha कंपनीची सुरुवात कशी झाली?
‘यशस्वी कथा वाचू नका त्याने केवळ संदेश मिळतो, अपयशाच्या कथा वाचा त्याने यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळते’ असं डॉ. एपीजे अब्दुल कलाम म्हणायचे. आज आपण अशा महारथीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने आयुष्यातील संकटांना घाबरून पळ काढला नाही, तर त्या संकटातून नवीन रस्ता निर्माण केला. १६० हून अधिक देशात लाखो लोकांच्या पसंतीस उतरलेली ‘यामाहा मोटारसायकल.’ चला तर जाणून घेऊया यामाहा कंपनीबद्दल आणि तिच्या निर्मात्याबद्दल.
तोराकुसू यामाहा. २० मे १८५१ साली जपानमधील वाकायामा येथे त्याचा जन्म झाला. त्याचे वडील किशू राजघराण्यातील ज्योतिषी होते. प्रत्येक वडिलांच्या आपल्या मुलाप्रती काही ना काही अपेक्षा या असतातच, आपला मुलगा यशस्वी व्हावा. चार चौघात त्याचं नाव व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. अगदी तुमच्या आमच्या आईवडिलांच्याही आपल्याकडून त्याच अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण होण्यासाठी आपल्या परीने ते पुरेपूर प्रयत्न करत असतात. तोराकुसूच्या वडिलांनाही वाटायचे की, आपल्या मुलाने आपल्याप्रमाणेच ज्योतिषी बनावे. लहानपणापासूनच अभ्यासात हुषार आणि नवीन काहीतरी निर्माण करण्याची इच्छा असलेल्या आपल्या मुलाची बौद्धिक क्षमता ओळखून त्याच्या वडिलांनी त्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. १८६८ साली तो नागसाकीला गेला. तिथे एका इंग्रज अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली घड्याळ दुरुस्तीचे शिक्षण त्याने घेतले. पुढे ओसाका या शहरात जाऊन वैद्यकीय उपकरण दुरुस्ती शिकून घेतली. वयाच्या ३५व्या वर्षी हमामात्सू या शहरात तो व्यवसाय सुरु केला. पण शहर लहान असल्यामुळे म्हणावी तेवढी मिळकत होत नव्हती. त्यामुळे जोडीला घड्याळ रिपेअरिंग आणि रिक्षा ड्रायव्हर म्हणूनसुद्धा त्याने काम केले.
एक दिवस जवळच्या एका शाळेने त्याला बोलावून त्यांचा तुटलेला ‘रीड ऑर्गन’ दुरुस्त करायला संगितले. आलेल्या कामाला नाही म्हणायचं नाही, हा स्वभाव असल्याने त्याने सुद्धा लगेच जाऊन त्यातील समस्या शोधली आणि तो दुरुस्त करून दिला. इथेच यामाहा ब्रांडचा पाया रचला गेला. हे काम आपल्याला जमतंय असं लक्षात आल्यावर दिवसभर कॉलेज आणि रिकाम्या वेळेत संगीतवाद्यं रिपेअर करण्याचे तो काम करत असे. हळूहळू त्या कामात त्याचा हातखंडा बसला. या कामातून त्याला बऱ्यापैकी फायदा होत असल्यामुळे तो स्वतःला update करत गेला.
सगळे आरामात चालू असताना एक दिवस अचानक त्याला पत्र आलं कि, त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण भेदरलेल्या अवस्थेत तो गावी परत आला. अखंड दुःखात बुडालेल्या आपल्या आईला आणि घरच्यांना सावरत त्याने घराची पूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्याने हमामात्सू मध्येच पाश्चिमात्य वाद्यांचे काम चालू केले. जेव्हा त्याच्या लक्षात आले की आपल्याला वाद्यांबद्दलची कामे बऱ्यापैकी जमातायेत, त्यावेळी त्याने स्वतःच्या या छोट्या बिझनेसला मोठे स्वरूप देण्याचे ठरवले आणि १८८७ साली ‘Nippon Gakki’ (नीपॉन गॅकी) नावाने कंपनी उभी केली. कंपनीत त्याने पाश्चिमात्य वाद्यांबरोबरच जपानी वाद्यं बनविण्यास देखील सुरुवात केली.
सुरुवातील त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. प्रथमच बनवलेल्या ऑर्गनमधून सूर नीट येत नसल्यामुळे त्यावर बरीच टीका झाली. त्यातून जपानमध्ये संगीतविद्या मोठ्या प्रमाणात विकसित झाली नव्हती, त्यामुळे पहिल्यांदा तेथील लोकांना संगीताचे महत्त्व पटवून द्यावे लागले. मात्र अल्पावधीतच तिथे संगीत शिक्षण घेणे बंधनकारक करण्यात आले आणि या निर्णयाचा फायदा त्याच्या कंपनीला झाला. आज बऱ्याच जणांना माहित नाही, पण यामाहा कंपनीचे पहिले प्रॉडक्ट ऑर्गन हे वाद्य होते. सुरुवात जरी सावकाश झाली असली, तरी काही दिवसांतच ग्राहक संख्या वाढू लागली. आज यामाहा ही संगीत वाद्यं बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे.
१९०२साली तोराकुसू यांना जपान सरकारचा मेडल ऑफ होनर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. १९११ साली शहर नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 8-ऑगस्ट 1916 रोजी वयाच्या ६५व्या वर्षी तोराकुसू यामाहा यांचे निधन झाले. कंपनीला वेगळ्या उंचीवर पोहोचवण्यासाठी तोराकुसू आयुष्यभर झटत राहिले.
पुढे १९३०-४० च्या दशकात व्यवसाय तेजीत असतानाच दुसऱ्या महायुध्दास प्रारंभ झाला आणि म्युजीकल इन्स्ट्रुमेंट बनवणाऱ्या या कंपनीला आपला व्यवसाय थांबवावा लागला. पण थांबणं यामाहाच्या धोरणांत बसतच नव्हतं. कंपनीने या काळात म्युजीकल इन्स्ट्रुमेंट सोडून शस्त्रास्त्रे बनवायला सुरुवात केली, कारण युद्धामुळे शस्त्रांचा साठा वाढविणे गरजेचे होते. त्यावेळी कंपनीने एअरक्राफ्ट, लढाऊ विमानं, टँक बनवले. कंपनीत त्यावेळेस एकूण तीनशेपेक्षा अधिक कामगार काम करत होते. या कंपनीचे प्रॉडक्ट इतके उत्कृष्ट होते की, विदेशातून देखील मागणी वाढली, अमेरिकेसारखे प्रगत राष्ट्र कंपनीकडून शस्त्रं घेत होते. पुढे युद्ध संपल्यावर शस्त्रात्रांची मागणी कमी होऊ लागली आणि कंपनी पुन्हा तोट्यात गेली. आता कंपनी टिकवून ठेवण्यासाठी काय करावे म्हणून कंपनीने पुन्हा म्युजीकल इन्स्ट्रुमेंट बनविण्यावर भर दिला.
कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष गेनीची हे जर्मन दौऱ्यावर असताना त्यांनी तेथील औद्योगिक प्रणाली जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेथील मोटारसायकलची फॅक्टरी पाहिल्यावर त्यांच्या मनात विचार आला की, आपण देखील मोटरसायकल तयार करू शकतो. जर्मनीहून परतल्यावर बराच वेळ त्यांनी यावर विचार करण्यात घालवला. मोटरसायकल बनविण्याची पद्धत, त्यासाठी लागणारे पार्टस या बाबत त्यांनी माहिती काढली आणि अनेक दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर १९५४ साली जन्मास आली, जगभरात आपल्या दमदार परफॉर्मन्सने धुमाकूळ घालणारी “यामाहा YA-1 मोटरसायकल.” ही बाईक इतकी लोकप्रिय बनली की कंपनीने यामाहा मोटर या नावाने स्वतंत्र कंपनीच सुरु केली. यामाहा पहिली अशी कंपनी आहे, जिला सुरुवातीच्या काळातच एकदम ३० हजार गाड्यांची ऑर्डर मिळाली होती आणि तिथून पुढे कंपनीने आपली वेगळी ओळख निर्माण केली.
“जीवनात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही, परंतु अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावीच लागते.” हे आपल्या कृतीतून दाखवून देणाऱ्या तोराकुसू यामाहा यांना जाऊन जवळजवळ १०६ वर्ष पूर्ण झाली, मात्र तरीही आज यामाहा कंपनी मोठ्या दिमाखात उभी आहे. त्यांच्या मृत्यूनंतरही आजतागायत यामाहा कंपनीने आपले सर्वोच्च स्थान अबाधित ठेवले यातच त्यांचे यश आहे.
आणखी वाचा
- जगातील सर्वात मोठ्या बँकेचे संस्थापक जे पी मोर्गन यांची कहाणी
- या माणसामुळे आपल्या घरापर्यंत वीज पोहचली- निकोला टेस्ला
- फोटोग्राफी क्षेत्रातला पहिला कॅमेरा बनवणारा अवलिया – जॉर्ज इस्टमन
- जगातील पहिली गाडी बनवणारा कार्ल बेंझ
- यांच्यामुळे सामान्य माणसाच्या दारात गाडी उभी राहिले – हेन्री फोर्ड
- सायकलच्या दुकानापासून १० हजार कोटींपर्यंत पहिले मराठी उद्योगपती – लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर
- मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, तोच मुलगा जगातील सर्वात मोठा संशोधक बनला
- इंग्रजांच्या घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या
- अवघ्या भारताच भविष्य बदलणाऱ्या टाटा कंपनीची सुरुवात कशी झाली?