अशोक लेलँड : भारतीय वाहतूक क्षेत्राचा कणा | The Ashok Leyland Story
भारतात व्यावसायिक वाहने म्हटली की, पहिल्यांदा आठवण होते अशोक लेलँडची. मग ते ट्रक असू दे किंवा बस, अशोक लेलँड ही एक अशी कंपनी आहे जी भारतीय वाहतूक क्षेत्राचा कणा बनली आहे. टाटानंतर भारतातील दुसरी सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या अशोक लेलँडने आज केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही आपला ठसा उमटवला आहे. बस आणि ट्रक निर्मितीमध्ये जगातील अव्वल कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या अशोक लेलँडने तिच्या प्रवासात अनेक ऐतिहासिक टप्पे पार केले आहेत.
भारतात स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी विविध उद्योगांची स्थापना करण्यात आली. यामध्ये उद्योग, तंत्रज्ञान आणि परिवहन क्षेत्रात विशेष प्रगती झाली. याच महत्त्वाच्या विकासपर्वात “अशोक लेलँड”ने भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात क्रांती घडवली. 1948 साली आजच्या दिवशी या कंपनीची स्थापना झाली होती. त्याचं अनुषंगाने आज या लेखात आपण अशोक लेलँडच्या आतापर्यंच्या प्रवासाचा आढावा घेऊ.
स्थापना आणि प्रारंभिक काळ
7 सप्टेंबर 1948 रोजी, चेन्नई येथे रघुनंदन सरन यांनी अशोक मोटर्सची स्थापना केली. ‘अशोक’ हे नाव त्यांचा मुलगा अशोक सरन यांच्या नावावरून ठेवण्यात आले, सुरुवातीला या कंपनीत ऑस्टिन मोटर्सच्या गाड्यांचे उत्पादन केले जायचे.
1950 साली अशोक मोटरने ब्रिटिश लेलँड कंपनीशी करार केला, ज्यामुळे कंपनीचे नाव ‘अशोक लेलँड’ झाले. हा करार फक्त नावापुरता नव्हता, तर दोन्ही कंपन्यांच्या तंत्रज्ञानाचा संगम होता. ब्रिटिश तंत्रज्ञान आणि भारतीय बाजारपेठेची गरज यांचा समन्वय अशोक लेलँडने साधला आणि भारतीय व्यावसायिक वाहन क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाला.
स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताला वाहतूक व्यवस्थेची अत्यंत गरज होती, कारण देशाची अर्थव्यवस्था विकासाच्या टप्प्यावर होती आणि औद्योगिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत होती. अशोक लेलँडने या गरजेची जाणीव ठेवून व्यावसायिक वाहतूक साधनांची निर्मिती सुरू केली. सुरुवातीला त्यांनी मालवाहतूक ट्रक्स आणि प्रवासी बस यांचे उत्पादन केले. यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे कंपनीने 6-सिलेंडर इंजिनयुक्त ट्रकची निर्मिती करून भारतीय रस्त्यांवर विश्वासार्हता निर्माण केली. यामुळे अशोक लेलँडने स्वदेशी ऑटोमोबाइल क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण केली.
उत्पादनातील नाविन्य आणि विकासाचा प्रवास
1950 आणि 60 च्या दशकात अशोक लेलँडने आपल्या उत्पादनात नाविन्य आणण्यास सुरुवात केली. 1954 साली अशोक लेलँडने आपल्या एन्नोर प्लांटमध्ये पहिला ट्रक तयार केला. ‘कॉमेट 350’ नावाचा हा ट्रक, मंगळूरच्या एका टाइल फॅक्टरीला विकला गेला होता. या क्षणापासून भारतात व्यावसायिक ट्रक निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यावेळी भारतात फक्त परदेशी कंपन्यांचे ट्रक उपलब्ध होते, पण अशोक लेलँडने स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ट्रक निर्माण करून भारतीय ग्राहकांना एक नवीन पर्याय दिला.
त्यानंतर भारत सरकारने अशोक लेलँडला दरवर्षी 1000 ट्रक तयार करण्याचा परवाना दिला आणि या उत्पादनाने भारतीय बाजारपेठेत कंपनीचे स्थान अधिकच मजबूत केले. कंपनीचे ट्रक केवळ भारतीय बाजारातच नव्हे, तर इतर काही देशांमध्येही निर्यात होऊ लागले. अशोक लेलँडच्या यशस्वी प्रवासात भारतीय सुरक्षादलांसाठी वाहनांची निर्मिती हे महत्त्वाचे योगदान होते. 1960 च्या दशकात BSF (सीमा सुरक्षा बल) आणि इतर सुरक्षा दलांसाठी वाहनं तयार करून कंपनीने देशाच्या संरक्षण यंत्रणेतील आपला वाटा उचलला.
1960 च्या दशकात अशोक लेलँडने भारतीय बस क्षेत्रातही क्रांती घडवून आणली. 1967 साली कंपनीने पहिली ‘डबल डेकर बस‘ बाजारात आणली. यापूर्वी, डबल डेकर बस केवळ युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेतील काही ठराविक शहरांमध्येच पाहायला मिळायच्या. भारतात ही संकल्पना नवीन होती, पण अशोक लेलँडने स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ही बस तयार करून भारताच्या मोठ्या शहरांमध्ये चालू केली.
मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यासारख्या शहरांमध्ये डबल डेकर बसने लोकांची प्रवाशांच्या प्रवासाचे व्यवस्थापन सुलभ झाले. आजही या शहरांमध्ये डबल डेकर बसची सेवा दिसून येते.
तंत्रज्ञानात सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय विस्तार
1969 साली अशोक लेलँडने आपली आणखी एक महत्त्वाची कामगिरी केली. कंपनीने आपल्या ट्रक आणि बसमध्ये ‘पॉवर स्टीअरिंग‘ तंत्रज्ञानाचा वापर केला. त्या काळात हे तंत्रज्ञान खूपच आधुनिक आणि नवीन मानले जायचे. पॉवर स्टीअरिंगमुळे वाहन चालवणे खूप सोपे झाले, विशेषतः जड वाहने चालवताना ड्रायव्हर्सला अधिक आराम मिळाला. या तंत्रज्ञानामुळे अशोक लेलँडने भारतीय व्यावसायिक वाहन निर्मितीच्या तंत्रज्ञानात नवा मापदंड प्रस्थापित केला.
1970 आणि 80 च्या दशकात अशोक लेलँडने तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या. 1980 च्या दशकात त्यांनी BS-II इंधन मानकांनुसार ट्रक्स तयार करण्यास सुरुवात केली. तंत्रज्ञानात सतत सुधारणा करण्याची कंपनीची भूमिकाही या काळात दिसून आली. याच काळात कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश केला आणि मध्य पूर्व, आफ्रिका, आशिया आदी देशांमध्ये आपल्या वाहनांची निर्यात सुरू केली.
1980 साली कंपनीने आपला दुसरा प्लांट होसूर, तमिळनाडूमध्ये सुरू केला. या प्लांटमुळे मोठ्या प्रमाणात वाहने तयार करण्याची क्षमता वाढली. यामुळे कंपनीने मोठ्या आणि जड वाहनांच्या निर्मितीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याचवेळी कंपनीने मल्टी-एक्सेल ट्रक आणि मोठ्या बस तयार करण्यास सुरुवात केली.
कंपनीने तामिळनाडूमधील नामक्कल येथे देशातील पहिल्या व्यावसायिक वाहन ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली. यामुळे व्यावसायिक वाहन चालवणाऱ्या ड्रायव्हर्सना उत्तम प्रशिक्षण मिळाले आणि भारतीय बाजारपेठेत कंपनीची प्रतिष्ठा वाढली.
1990 च्या दशकात भारताच्या उदारीकरणाच्या धोरणामुळे देशातील ऑटोमोबाइल क्षेत्रात स्पर्धा वाढली. परंतु अशोक लेलँडने आपल्या उत्पादनांची गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन कायम ठेवला, ज्यामुळे स्पर्धेचा सामना करण्यास ते सक्षम झाले. याच काळात त्यांनी ‘स्टारलाइन’ बस सादर केली, जी भारतीय बस निर्मिती क्षेत्रातील एक मोठी क्रांती ठरली.
2007 पासून हिंदुजा समूहाची मालकी
2007 मध्ये, हिंदुजा समूहाने अशोक लेलँडमधील इवेकोचा (इंडस्ट्रियल व्हेईकल्स कॉर्पोरेशन) अप्रत्यक्ष हिस्सा विकत घेतला, इवेको ही इटालियन कंपनी आहे जिची स्थापना 1975 मध्ये झाली होती. हिंदुजा समूहाने याच कंपनीचा हिस्सा विका घेतला. आणि त्यांचा हिस्सा 51% वर पोहोचला आणि आज अशोक लेलँड ही हिंदुजा समूहाची एक प्रमुख कंपनी बनली आहे.
भविष्यात अशोक लेलँड उत्तर प्रदेशात इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांचे उत्पादन करणारा एक प्लांट उभारणार आहे. या प्लांटची उत्पादन क्षमता प्रत्येक वर्षी 2,500 वाहने एवढी असेल आणि पुढील दशकात ती 5,000 पर्यंत वाढवण्याची योजना आहे. या प्लांटमध्ये मुख्यतः इलेक्ट्रिक बस चे उत्पादन होईल आणि ते 2025 मध्ये सुरू होईल
आजची स्थिती आणि रोजगार निर्मिती
आज कंपनी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे, ज्यामध्ये ऑटोमोबाईल्स, व्यावसायिक वाहने, इंजिन, सेवा आणि वाहन वित्तपुरवठा यांचा समावेश आहे. २०२४ मध्ये कंपनीने ₹ ४५,९३१ कोटी (US$५.५ अब्ज) महसूल मिळवला. कंपनीच्या एकूण मालमत्तेची किंमत ₹ ६७,६६० कोटी (US$८.१ अब्ज) आहे. २०२० पर्यंत कंपनीत ११,४६३ कर्मचारी कार्यरत होते, आज हा आकडा वाढला आहे.
अशोक लेलँड आज फक्त भारतापुरती मर्यादित नाही. आफ्रिका, युरोप, आशिया आणि मध्य-पूर्वेतही कंपनी आपली उत्पादने निर्यात करत आहे. या देशांमध्ये अशोक लेलँडच्या वाहनांना प्रचंड मागणी आहे.
अशोक लेलँडचा प्रवास म्हणजे भारतीय औद्योगिक प्रगतीचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यानंतर सुरू झालेली एक छोटीशी कंपनी आज जागतिक व्यावसायिक वाहन क्षेत्रात एक महत्त्वाचे नाव बनली आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीपासून ते उत्पादन क्षमतेपर्यंत अशोक लेलँडने भारतीय वाहन निर्मिती क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे.
आणखी वाचा :
- वयाच्या ११ व्या वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये उतरून जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार बनलेले वॉरन बफे
- भारताचा इलोन मस्क: भाविश अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास
- जागतिक उद्योजक दिन – प्रवास उद्योजक बनण्याचा