तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…’
“We become like the average of the five people we spend the most time with.” आपण ज्या लोकांसोबत सर्वाधिक वेळ घालवतो, त्यापैकी सरासरी पाच लोकांप्रमाणेच आपणही बनतो.
एक साधू रस्त्याने चालले असताना त्याना खूप तहान लागली. पुढे एका कुंभाराचं घर लागले. साधूंनी त्या कुंभाराकडे पाणी मागितले. त्यानेही त्या साधूंना आदरपूर्वक नमस्कार करून पाणी दिले. पाणी पीत असताना अचानक त्यांचं लक्ष बाजूस गेलं. एका बाजूला मडक्यांचा ढीग लावला होता, पण एक मडकं वेगळं ठेवलं होतं. त्या साधूंनी त्याला विचारलं, “का रे बाबा, बाकी सगळी मडकी एका बाजूस आणि ते एकच मडकं वेगळं का ठेवलं आहेस?” तेव्हा तो म्हणाला, “महाराज ते मडकं खराब आहे, त्याला गळती लागली आहे आणि कोणी ते घेत नाही. म्हणून वेगळं ठेवलं आहे.”
साधूंनी त्याच्याकडे त्या मडक्याची मागणी केली. तो कुंभार म्हणाला, “महाराज, तुम्हाला हवं असेल, तर चांगलं मडकं घेऊन जा. फुटकं मडकं नेऊन काय फायदा?” ते म्हणाले, “देणार असशील तर हेच दे. नाहीतर चाललो मी!” नाईलाजास्तव त्याने ते मडकं त्यांना देऊन टाकलं. त्या साधूंनी त्या मडक्याला स्वछ धुतल्यानंतर आणून आपल्या मंदिरातील शिवलिंगावर बांधून ठेवलं. परिणामस्वरुप कालपर्यंत कोणा एका कोपऱ्यात खितपत पडलेलं निरुपयोगी ते मडकं आज साधूंच्या सहवासाने, संत समागमाने देवकार्य करू लागलं. देवाच्या सानिध्यात भक्त यायचे तेव्हा त्या शिवशंकरांच्या पिंडीला नमस्कार करताना त्या मडक्यालाही डोकं लावायचे आणि त्यांचं मन प्रसन्न व्हायचं.
जर एक मातीचं मडकं एका साधूच्या सहवासात येऊन त्याच्या जगण्याचा मार्ग बदलत असेल, क्षणात ते कुठच्या कुठे पोचत असेल, तर आपण मनुष्य योनीत आहोत. मग आपण जर गुरूंच्या/चांगल्या माणसांच्या सहवासात राहू, तर काय आपलं जीवन सुंदर घडणार नाही का?
आर्थिक परिस्थिती, काही गोष्टीत कमीपणा, संधीचा अभाव जरी असला तरी तुमच्याकडे जे कौशल्य असेल, त्यानुसार मिळेल ती संधी घेऊन चांगल्या लोकांच्या सहवासात जाण्याचा प्रयत्न करा. जसे परिसाला लोखंड लागले, की त्याचे सोने होते. तसेच तुम्ही ज्यांच्या सहवासात राहता त्यांच्या वागण्याचा, बोलण्याचा तुमच्यावर परिणाम होत असतो. त्यांचे गुण किंवा अवगुण तुमच्यात उतरत असतात. तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत राहिले पाहिजे आणि वाईट लोकांची संगत टाळली पाहिजे.
संगतीचा परिणाम एकदम थोडक्यात सांगायचा म्हणजे;
जर तुम्ही ५ हुशार लोकांच्या संगतीत राहाल, तर ६वे हुशार तुम्ही असाल…
जर तुम्ही ५ यशस्वी लोकांच्या संगतीत राहाल, तर ६वे यशस्वी व्यक्ती तुम्ही असाल…
जर तुम्ही ५ करोडपती लोकांच्या संगतीत राहाल, तर ६वे करोडपती तुम्ही असाल…
आणि जर तुम्ही ५ टवाळ लोकांच्या संगतीत राहाल, तर ६वे टवाळखोर तुम्ही असाल…
तुमची सांगत चांगली आहे ना? तुम्हाला तुमच्या संगतीमुळे चांगले वाईट काय अनुभव आलेत. आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
आणखी वाचा
- यश मिळवण्यासाठी कल्पकता व शांत डोक पाहिजे
- दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल
- सगळं संपलं असं कधीच होत नसतं
- अती विचाराच्या रोगापासून दूर राहा
- फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता