प्रेरणादायी

स्वाभिमानाने जगायचे असेल तर आत्मविश्वास गरजेचा आहे

जीवनात सफलता मिळवायची असेल, तर आपल्याकडे आत्मविश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे. माणसाला जगण्यासाठी जसा ऑक्सीजन लागलो, माशाला जगण्यासाठी जशी पाण्याची गरज लागते. तसेच माणसाला स्वाभिमानाने जगायचे असेल, तर आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. मात्र बऱ्याच जणांकडे हा विश्वास नसतो. तो कसा मिळवायचा ते आजच्या गोष्टीत पाहूयात.

गोदावरीच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याश्या, सुख समृद्धीने भरलेल्या गावात सगळेजण अगदी आनंदाने नांदत होते. त्या गावात एक धनाढ्य सावकार होता. धनाजीराव त्याचं नाव. सावकार म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो गावकऱ्यांकडून पैसे बळकवणारा, त्यांना गुलाम म्हणून वागवणारा, त्यांचा छळ करणारा, मात्र धनाजीराव तसा नव्हता. तो गावकऱ्यांवर खूप प्रेम करायचा आणि गावातील लोक देखील त्याला खूप मानायचे. असेच एकदा गावात मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम होता. गाव अगदी गजबजून गेले होते. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते.

गोदावरीकाठी गावातील काही लहान मुलं पकडापकडीचा खेळ खेळत होती. त्यात त्या सावकाराचा मुलगा देखील होता. खेळ ऐन रंगात आला असतानाच काठाजवळून धावताना अचानक तो नदीत पडला. सगळीकडे एकच गोंधळ सुरू झाला. हा हा म्हणता अख्खा गाव नदीकाठी जमा झाला. धनाजीराव आणि त्याची बायको देखील तिथे आली. तिचा आक्रोश सुरु झाला. धनाजीरावचा ‘माझ्या मुलाला कोणीतरी वाचवा रे!’ म्हणून आरडाओरडा करत होता. त्याची ती अवस्था सर्वांचं काळीज पिळवटून टाकत होती. मात्र कोणीच त्या लहानग्याला वाचवायला पुढे गेलं नाही. सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. काहींना तर पोहता येत असून देखील ते नदीत उतरले नाहीत. त्या गर्दीत एक जलतरणपटू देखील होता. त्याच नाव होतं विकास. मात्र सगळे इतके घाबरले होते, की त्यांच्याकडे बघून विकासचे मन नदीत उतरण्यासाठी धजावत नव्हते.

तितक्यात अचानक कोणीतरी त्याला पाठीमागून नदीत ढकललं. नदीकाठचा गोंधळ अचानक शांत झाला. कोणाला काहीच तर्क लावता येईना. नदीत पडलेला विकास तर पूर्णपणे भांबावून गेला होता, पण काही वेळाने विकास देखील त्या प्रवाहात दिसेनासा झाला. विकास ठीक असेल ना? पाटलाचा पोरगा जिवंत असेल ना? असे असंख्य प्रश्न गावकऱ्यांसमोर होते. आणि काही वेळाने पाण्यात एक हालचाल जाणवली. विकास एका हाताने पाण्याला दूर सारत दुसऱ्या हातात पाटलाच्या मुलाला घेवुन नदीकाठी आला. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. धनाजीरावाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. विकासने मुलाला वाचवलं म्हणून संपूर्ण गाव त्याची शाही मिरवणूक काढत होतं. मात्र त्या तरुणाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हच होतं, त्याला कळत नव्हतं की आपल्याला नदीत कोणी ढकललं.

त्याची नजर शोध घेत होती त्या व्यक्तीचा. मिरवणूक संपली. तो तरुण आपल्या घरी निघाला आणि अचानक रस्त्यात एक 70-80 वर्षाचे आर्मी रिटायर्ड माने आजोबा त्याच्या समोर आले. ते म्हणाले तू सकाळपासून ज्याला शोधतोय तो मीच आहे. त्याला काहीच कळेना. तो माने आजोबांना विचारतो, “तुम्ही मला पाण्यात का ढकललं? त्यावर ते म्हणाले, अरे मला माहीत होतं तुला उत्तम पोहता येतं ते. आणि त्याक्षणी तुझ्या मनात जो गोंधळ चालू होता, तोही मी ओळखला होता. तुझ्यात त्याला वाचवण्याची क्षमता होती मात्र धाडस नव्हतं. मला माहिती होतं जर मी तुला पाण्यात ढकलंल तर 100 टक्के तू स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणार आणि त्याबरोबरच त्या लेकराला देखील वाचवणार. फक्त गरज होती एका हलक्याश्या धक्क्याची. आणि ते मी केलं. पुढे माने आजोबा विकासला म्हणाले: लेकरा तुला आयुष्यात खूप पुढे जायचं असेल, तर असा स्वतःवरचा विश्वास हरवून बसू नकोस. प्रत्येकवेळी तुला कोणीतरी यशाचा रस्ता दाखवेलच असं नाही. तो तुझा तुलाच शोधावा लागेल.   

बऱ्याचदा आपल्याला ही गोष्ट येईल का, आपण ते करू शकतो का असे स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. कधी कधी आपण स्वतःवरचा विश्वासच गमावून बसतो. मात्र आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात जे पावलोपावली आपल्याला प्रोत्साहित करत असतात, मार्गदर्शन करत असतात. मित्रांनो तुम्ही जर बघ्याची भूमिका घेवून आयुष्य जगलात, तर कधीच तुमचं कौतुक होणार नाही, असं काहीतरी करा की ज्यामुळे यशस्वी लोकांच्या यादीत तुमचं नाव येईल. मात्र तिथपर्यंत पोहोचण्यासाठी विचारवंताच्या सहवासात राहिलं पाहिजे, स्वतःचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. आपलं रूप, आपली बुद्धी, आपला रंग या गोष्टी आपण जन्मत:च घेऊन येतो. परंतु आत्मविश्‍वास हा आपल्याला विकसित करावा लागतो आणि प्रत्येकाने तो केलाच पाहिजे.

तुम्हाला आजचा Sunday Motivation चा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि Sunday Motivation साठी नवी अर्थक्रांतीच्या चॅनेलला आताच subscribe करा. 

हा लेख विडीयो मध्ये पहा

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button