भाग १ – शिकण्याचे मुलभूत घटक – शिक्षणाचे महत्त्व
शिकेल तो टिकेल नावाची पुरातन म्हण मराठी भाषेत रुढ आहे. या म्हणीतून जीवनात आपल्याला हव्या त्या क्षेत्रात टिकून राहायचे असेल तर शिकण्याला पर्याय नाही. ‘शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध आहे आणि ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही’ अशा अर्थाचा एक विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे. एकूणच काय? तर एखादा माणूस जितका जास्त शिकला त्यावर त्याच्या यशाची गणिते अवलंबून असतात.
एखाद्या माणसाकडे एकूण किती कौशल्ये आहेत त्यावर त्याचे जीवनशाळेतील शिक्षण ठरते. एकाच व्यक्तीला पोहायला येते, दुचाकी-चारचाकी चालवता येते, उत्तम स्वयंपाक बनवता येतो, चांगले भाषण देता येते, संगणक चालवता येतो, त्याचे आरोग्य उत्तम आहे अशी जेवढी जास्त कौशल्ये प्राप्त असतील तेवढा तो जास्त यशस्वी होण्याच्या शक्यता निर्माण होतात. त्याने मिळवलेली कौशल्ये सध्या काम करत असलेल्या क्षेत्राशी संबंधित असल्यास अत्युत्तम ठरते. आपल्याला ज्या गोष्टी येत नाहीत. त्या गोष्टी साध्य करुन घेण्याची कला हा सुध्दा शिक्षणाचाच एक भाग आहे.
माणसाला चारित्र्य घडवणारे, बुध्दीचा विकास करणारे, स्वतःच्या पायावर उभा करणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. माणसाला माणूस बनवणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. खऱ्या अर्थाने जीवन समृध्द बनवणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. म्हणजे काय? तर जीवनातील आपल्याला आवश्यक त्या सर्व गोष्टी साध्य करण्याची गरज शिक्षणातून पूर्ण झाली पाहिजे. सामाजिक, आर्थिक, आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, समाधान, आनंद, भौतिक गरजा, मनःशांती व नातेसंबंध या सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात प्राप्त करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे.
समजा एखाद्याने खूप सारा पैसा कमावण्यात आयुष्य खर्च केले व त्या नादात आरोग्याची हानी करुन घेतली तसेच कुटुंबातील व्यक्तींसाठी सुध्दा वेळ दिला नाही. तर त्याच्या आयुष्यातील एक बाजू पूर्ण करण्याच्या नादात दुसरी बाजू अपूर्णच राहून गेली किंवा एखाद्याने खूप सगळी माहिती गोळा करण्यात आयुष्य व्यतीत केले त्यावर काम करुन ती माहिती अस्तित्वात आणण्यासाठी त्याच्याकडे वेळ शिल्लक राहिला नाही, तर त्या माणसाची सुध्दा आयुष्याची एक बाजू अपूर्णच राहून गेली. एखाद्या विद्वानाने आयुष्यात खूप काही विद्या प्राप्त केली. त्या नादात त्याने आयुष्यातील इतर गोष्टीकडे दुर्लक्ष केले. कमालीच्या आर्थिक दारिद्र्याचा सामना करत आयुष्य कंठित केले. एखाद्या पैलवानाने आयुष्यात खूपच चांगले आरोग्य कमावले मात्र व्यवहार चातुर्य आत्मसात करण्यात अपयशी ठरला त्याच्या सुध्दा आयुष्यात एक गोष्ट अपूर्णच राहिली. बराक ओबामांनी दोनवेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद भूषविले. राष्ट्राच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी कुटुंबासाठी सुध्दा वेळ दिला.
आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टींची समृध्दी व योग्य मेळ साधण्याची कला म्हणजेच शिक्षण होय. आयुष्य ही एक अनेक कोन असणारी आकृती आहे. उदाहरणासाठी आपण ही आकृती षटकोनी आहे असे मानू या. षटकोनाला सहा बाजू, सहा कोन व सहा शिरोबिंदू असतात. आर्थिक समृध्दी प्राप्त करणे ही या आयुष्यरुपी षटकोनाची एक बाजू आहे. त्याचप्रमाणे आरोग्य, सामाजिक प्रतिष्ठा, आनंद, भौतिक गोष्टी व नातेसंबंध या इतर बाजू आहेत. या सर्व बाजू जोडल्या गेल्या तरच षटकोन पूर्ण होईल. यातील एकही बाजू राहिली तर षटकोन कधीही पूर्ण होणार नाही. आपल्या आयुष्याच्या आकृतीला आकार देऊन साकार करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे.
एका माणसाने आयुष्य भर फार पैसा कमावला व प्रचंड काटकसर करत त्या पैशाचा आनंद न घेताच मरुन गेला. तर दुसऱ्या एका माणसाने आयुष्यभर जेवढा पैसा कमावला तेवढा तो उधळला, नको तसा खर्च केला व म्हातारपणी कर्जबाजारी व आर्थिक हाल करत जगला. त्याउलट एका माणसाने पैसाही कमावला, आवश्यकतेनुसार त्याचा वापर केला, त्याचे नियोजन व बचत सुध्दा केली. त्याचे आयुष्य समाधानात पूर्ण झाले. आयुष्यात सर्व गोष्टीचा सुवर्ममध्य साधण्याचे तारतम्य शिक्षणातून प्राप्त होते.
कोणते शिक्षण घेतले पाहिजे? याचे महत्त्व खऱ्या अर्थाने अगदी सोप्या व कमी शब्दात सांगण्याचे काम अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी केले आहे. त्यांनी हेडमास्तरांना लिहलेल्या पत्रात शिक्षणाचे एकूण महत्त्व विषद केले आहे. हे पत्र प्रत्येक माणसाने आपल्या हृदयावर कोरुन ठेवले पाहिजे इतके महत्त्वाचे आहे. आपण हे पत्र वाचा. पुढील लेखात अब्राहम लिंकनने हेडमास्तरांना पाठवलेले पत्र प्रकाशित करत आहोत.