कंजूषपणामुळे व्यवसायात होतं मोठं नुकसान
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; कंजूषपणामुळे व्यवसायात होतं मोठं नुकसान… करायची सुरुवात?
एका गावात एक जनरल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर होते. गेली ३ ते ४ वर्ष त्यांचा व्यवसाय नीट चालत नव्हता. रोजचे पेशंट ५० ते ६० वरुन फक्त २० ते २५ वर आले होते. त्यांचे वय ५०च्या पुढे होतं. तसं म्हणावं, तर ते मागच्या पिढीचे डॉक्टर. त्यांच्या आजूबाजूला नवीन डॉक्टरांचे दवाखाने सुरू झाले होते, त्यांचे दवाखाने चालायला लागले, पण यांचा धंदा कमी झाला होता. आजूबाजूच्या इतर डॉक्टरांचे क्लिनिक पाहिलं तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येत होती, ती म्हणजे हे महाशय नको तेवढे कंजूष होते. तपासणीचा टेबल, बसण्याचं बाकडं, खुर्च्या त्याच २० ते ३० वर्षापूर्वीच्या. रिसेप्शनिस्टसुध्दा एकदम लो प्रोफाईल. त्यांना धड चांगल्याप्रकारे संवादही साधता येत नव्हता. त्या बऱ्याच वेळी घरच्या कामानिमित्त गैरहजर असत. कमी पगारात काम करते म्हणून त्याच रिसेप्शनिस्टला ठेवलं होतं. क्लिनिकमध्ये पेपर नाही, की पाणी पिण्याची सोय नाही, आरोग्याशी संबंधित माहिती देणारे पोस्टरही नाहीत.
व्यवसायात अप-टू-डेट राहण्यासाठी काही खर्च करावा लागतो याचं जुन्या विचारसरणीमुळे बऱ्याच जणांना भान नसतं. काहींना तो वायफळ खर्च वाटतो, काहींना आपल्या ज्ञानावर भलताच अहंकार असतो; पण जमाना शोबाजीचा आहे, जमाना ब्रॅण्डिंगचा आहे, जमाना जाहिरातबाजीचा आहे हे लोकांना समजत नाही. गावागावात होमिओपॅथी, आयुर्वेदिक डॉक्टरांना पेशंट मिळत नाहीयेत, पण चांगले ब्रॅडिंग करून पतंजली कोट्यावधीचा धंदा करत आहे. तुमचा व्यवसाय कोणताही असो, तो अद्ययावत ठेवण्यासाठी तुम्हाला खर्च करावाच लागतो. तो खर्च नसून ती गुंतवणूक असते हे लक्षात ठेवा.
क्लिनिकमध्ये एखादी एखादी तपासणीची आधुनिक मशीन आणलीत तरी फरक पडतो. साधा ॲप्रन स्वत: व रिसेप्शनिस्टला वापरायला दिला तरी फरक पडतो. औषध ठेवण्याचा चांगला रॅक, बाहेर चांगली पोस्टर्स, चांगले इंटेरिअर करून क्लिनिकला जाणारा डॉक्टर समाजाच्या दृष्टीने हुशार असतो, प्रत्यक्षात कदाचित वेगळंही असू शकतं. पण तो व्यवसायाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे व्यवसायाची जागा अधिक आकर्षक कशी दिसेल याचा विचार करा आणि तसे बदल करा.
तुम्हाला असा काही अनुभव आला आहे का? आला असल्यास आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
हा लेख विडीयो मध्ये पहा