मुलांना यशस्वी व उद्योजक कसे बनवाल?
आज जर पालकांना वाटत असेल की आपला मुलगा बिल गेट्स, अंबानी, बन्सल असा करोडपती मोठा व श्रीमंत उद्योजक व्हावा, तर त्यासाठी आपणास काही संस्कार जाणूनबुजून मुलांवर करावे लागतील. काही टिप्स पुढील प्रमाणे आहेत.
१) गर्भ व बाल संस्कार :
लहानपणीच मुलांना श्रीमंतीच्या व यशस्वी उद्योजकांच्या गोष्टी सांगितल्या व दाखवल्या पाहिजेत, जसे जिजाऊंनी शिवबाला हिंदवी स्वराज्याचे बाळकडू दिले. ज्यू, मारवाडी, गुजराती, पारशी लोक लहानपणापासूनच मुलांवर व्यवसाय करण्याचे संस्कार करतात. यामुळे मुलांना लहानपणापासून व्यवसायाविषयी आवड निर्माण होईल.
२) शिक्षण :
उद्योजकतेस पूरक आवडीनुसार व गरजेपुरतेच शिक्षण द्या. अती खर्चिक, गरज नसणारे शिक्षण घेवून पैसा व वेळ घालवू नका. योग्य तो विचारपूर्वक निर्णय घ्या. अनेक कमी शिकलेले लोक मोठे उद्योजक होतात व जास्त शिकलेले तेथे नोकऱ्या करतात.
३) प्रयोग करा :
हायस्कूल जीवनापासूनच छोट्या मोठ्या व्यवसायाचे प्रयत्न सुरू करा. दिवाळीत फटाके, फराळ, उन्हाळ्यात आंबे, लोणचे यांचे स्टॉल लावणे इत्यादी प्रयोग करीत रहा. मुलांना व्यापार म्हणजे काय असतो ते कळेल.
४) वाचन :
उद्योजकतेविषयी मासिके, पुस्तके, पेपर, लेख इत्यादी वाचण्यासाठी सतत घरात ठेवा. मोकळ्या वेळेत तुम्हीही वाचा व मुलांनाही वाचण्यास सांगा. वाचल्यामुळे विचार करण्याची पातळी वाढेल व त्यांना जग समजेल.
५) भेटा :
सेमिनार, कन्सलटंट, व्याख्याने, उद्योजक इत्यादींना जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मुलांसोबत भेटा. यामुळे मुलांच्यात आत्मविश्वास येईल, उद्योजक व श्रीमंत लोकही आपल्यासारखेच असतात, आपण जर मेहनत केली, तर आपणही उद्योजक होऊ शकतो असा विश्वास त्यांना येईल.
६) पहा :
टीव्ही, सिनेमा, डीव्हीडी, यूट्युबवर अनेक उद्योग व श्रीमंती विषयी कार्यक्रम येत असतात ते न चुकता कुटुंबासमवेत पहा, त्यातून माहिती मिळत जाईल.
७) पैसे दाखवा :
मुलांना पैसा काय असतो तो दाखवा. लपवून ठेवू नका. पगार आल्यावर पैशाचे गठ्ठे मुलांना दाखवा. दाखविल्यास पैसा कळेल व कमवण्याची प्रवृत्ती वाढीस लागेल.
८) जबाबदारी टाका :
अगदी शालेय जीवनापासूनच हळूहळू थोडीथोडी जबाबदारी टाकण्यास सुरू करा. उदा. किराणा माल आणणे, भाजीपाला आणणे, शेतीकडे लक्ष देणे, बँकेचे लहानसहान व्यवहार इत्यादी.
९) उठ-बस:
मुलांना लहान समजू नका. कमी वयातच त्यांची मोठ्या व्यक्तीत उठ-बस जाणीवपूर्वक वाढवा. त्यामुळे मुलं लवकर मॅच्युअर (प्रगल्भ) होतील.
१०) कल्पक :
क्रिएटिव्हिटी हा जीवनाच्या प्रगतीचा पाया आहे. मुलांना कल्पक विचार करायला शिकवा. आयडियाज तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात.
११) करिअर कौन्सेलिंग:
मुलांची आवड, कला, कुवत व पालकांची शिक्षण, करिअरवर खर्च करण्याची तयारी यासर्वांचा विचार करून तज्ज्ञ व्यक्तीकडून करिअर सल्ला घेणे शक्य आहे.
१२) लाज सोडून मेहनत :
मेहनत करण्यासाठी लाज वाटता कामा नये, याची सवय तुम्ही मुलांच्यात लहानपणापासून लावली पाहिजे. पडेल ते काम करायची मुलांना सवय लावा. कुठलंही काम छोटं नसतं हे त्यांच्या मनावर बिंबवा. नाहीतर आज सुशिक्षित बेकार मुलं शेतात काम करायला लाजतात.
१३) पर्सनॅलिटी (व्यक्तिमत्त्व) :
प्रत्येक यशस्वी व्यक्तीची एक आकर्षक पर्सनॅलिटी असते ती तुमच्या मुलांची जाणून विकसित करा.
१४) संवाद कौशल्य :
शिक्षक व व्यवसायिक ठिकाणी प्रत्येक भेटीवेळी, फोनवर व ईमेल वर कसा संवाद साधावा याचे ज्ञान घ्या.
१५) आर्थिक साक्षरता :
मुलांचे बँकेत खाते काढा, पॅनकार्ड, शेअर मार्केट, एफ डी, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, व्याज, चक्रवाढ व्याज, व्हेंचर कॅपिटल इत्यादी अनेक बाबीची माहिती त्यांना करून द्या.
१६) मोठी स्वप्ने जागवा :
मोठा पैसा, बंगला, कार गाड्या, आलिशान ऑफिस अशा मोठ्या गोष्टींची स्वप्ने मुलांच्यात सतत जागवा. तशा प्रकारची पोस्टर्स, वॉलपेपर्स मुलांच्या खोलीत लावा.
१७) सेल्समन बना :
कोणताही यशस्वी उद्योजक व श्रीमंत व्यक्ती हा हाडाचा सेल्समन असतो हे लक्षात ठेवा. आपली वस्तू, सेवा, प्रोजेक्ट, ब्रँड सतत विकता आला पाहिजे. जसे पटेल लोकांबद्दल म्हटलं जातं ना, ‘पटेल्स आर बॉर्न टू सेल’ तेव्हा हाडाचे सेल्समन बना.
१८) स्मार्ट गोल सेट करा :
Specific, Measurable, Achievable, Realistic, Timely (SMART) असा प्रत्येक ५ वर्षांचा गोल सेट करा.
19) संधी ओळखणे :
संधी ओळखणे व ती व्यवहारात आणणे हा श्रीमंत व यशस्वी व्यक्तीचा गुण आहे तेव्हा मुलांच्यात संधी ओळखायला शिकण्याचे कौशल्य विकसित करा.