भारतीय फुटबॉलचा नायक : सुनील छेत्री Real Life Story of Football Legend Sunil Chhetri
फूटबॉलच मैदान,तायवान विरुद्ध सामना भारताने ५-० ने जिंकलाय, मात्र जिंकायचा आनंद कमी आणि राग जास्त आहे. हा राग याचा की, आम्ही देशासाठी खेळतोय आणि कोणी बघायला का येत नाही? याच रागात एक ट्विट होतं आणि ते ट्विट एवढं वायरल होतं की ते २०१८सालचं गोल्डन ट्विट ठरतं.
यानंतर, जेव्हा भारताचा केनिया सोबत सामना होतो, तेव्हा मैदान हजारो प्रेक्षकांनी गच्च भरलेलं असतं आणि ‘इंडिया इंडियाचा’ जयघोष देत असतं.ते ट्विट होतं नुकत्याच निवृत्ती घेतलेल्या भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीचं.
आज आपण याच “कॅप्टन फॅनटेस्टीक” चा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. सुनील छेत्रीचा जन्म ३ ऑगस्ट १९८४ रोजी सिकंदराबाद येथे झाला. लहानपणापासूनच मैदानी खेळांकडे आकर्षण असलेल्या सुनीलने सुरुवातीला स्पोर्ट कोट्यातून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा म्हणून हौसेखातर फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली, परंतु फुटबॉलने त्याच्या हृदयात घर केलं आणि मग पुढे त्यानेही स्वतःला या खेळात झोकून घेतलं.
त्याने आपल्या करिअरची सुरुवात २००२ मध्ये कोलकत्याच्या मोहन बागान क्लबपासून केली आणि पुढे आपल्या मेहनतीच्या बळावर 2005 साली पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारतीय संघात पदार्पण केलं. त्याच्या खेळातील कौशल्यांमध्ये कमालीची स्पष्टता होती. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे लवकरच तो संघातील एक प्रमुख खेळाडू बनला. सुनीलच्या प्रतिभेने भारताला नेहरू कप, SAFF चॅम्पियनशिप, AFC चॅलेंज कपसह अनेक विजय मिळवून दिले. सातत्याने गोल करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे तो जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय गोल स्कोररपैकी एक ठरला.
सुनील छेत्रीला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये पद्मश्री, अर्जुन पुरस्कार,मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या प्रमुख पुरस्कारांचा समावेश आहे.भारतीय संघासाठी striker म्हणून खेळणारा सुनील हा “कॅप्टन फॅनटॅस्टिक” म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्याने अंतरराष्ट्रीय स्तरावर १५१ सामन्यांत ९४ गोल केले आहेत. जे रोनाल्डो, मेस्सी आणि अली दाई नंतर सावार्धिक आहेत. सुनील छेत्रीने भारतीय फुटबॉलमध्ये अतुलनीय योगदान दिलं आहे. त्याच्या परिश्रमांनी आणि नेतृत्वाने देशातील असंख्य तरुण खेळाडूंना प्रेरणा दिली आहे.
नवी अर्थक्रांती, सुनीलच्या भारतीय फुटबॉलला दिलेल्या योगदानाला salute करते.