युध्दात जमीनदोस्त झालेल्या दुकानाच्या एका कोपऱ्यात कंपनी सुरु करणारे ‘सोनी’चे संस्थापक अकिओ मोरीता
वाचा सोनी या जगप्रसिद्ध कंपनीची प्रेरणादायी कहाणी
कित्येक माणसं फक्त पोटापाण्यापुरतं कमावण्यासाठी काहीतरी उद्योग सुरु करतात, मग पुढे महत्वाकांक्षा वाढत गेल्यावर जगातील एक नावाजलेली कंपनी सुरु करण्याची घोषणा करतात आणि चक्क तसं करूनही दाखवतात, याला नक्की काय म्हणाल? आत्मविश्वास, गर्व की महत्वाकांक्षा? ते काही असले तरी एक गोष्ट यातून नक्की होते की ‘थिंकिंग बिग’. म्हणजेच ‘भले तुम्ही फटीचर असाल, दिसायला गबाळे असाल पण विचार फटीचारासारखा करू नका, नाहीतर कायम फटीचरच राहाल.’ हा असाच मोठ्ठा विचार करणारा अकिओ मोरीता २६ जानेवारी १९२१ रोजी जपानमधील कोसुगया येथे झाला.
अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला तेव्हा अकिओ मोरीता फक्त २४ वर्षांचा होता. १९४६ रोजी त्याने मसारू ईबुकासोबत अणुबॉम्ब स्फोटात बेचिराख झालेल्या एका दुकानाच्या कोपऱ्यात एक कंपनी सुरु केली. हीच भविष्यातील ‘सोनी कॉर्पोरेशन’ची सुरुवात होती. २००० साली या कंपनीची उलाढाल ६३०८ कोटी डॉलर्सची होती तर त्यात १८९७०० माणसे काम करत होती. पण या सर्वांहून गाजला तो म्हणजे अकिओ मोरीताचा वॉकमन. गंमत म्हणजे जेव्हा अकिओ मोरीता आणि ईबुका यांनी तरुण पिढीला आवडेल असा वॉकमन बनवायला घेतला तेव्हा मोरीता साठीला तर ईबुका सत्तरीला टेकला होता. जेव्हा वॉकमन ची कल्पना त्यांनी त्यांच्या कंपनीसमोर मांडली तेव्हा कंपनीतील सर्वांनी विरोध केला होता, चक्क वेड्यात काढले होते.
बाजारपेठ म्हणजे काय याबद्दल अकिओ मोरीता एक गोष्ट नेहमी सांगायचा. बूट विकणारे दोन विक्रेते होते. त्यांना एका आफ्रिकेतील एका खेडयात पाठवले. तिकडे जाऊन एकाने लगेच तार पाठवली. ‘इथे एकही माणूस बूट घालत नाही, त्यामुळे इथे बूट विकण्यात काहीच अर्थ नाहीये.’ तर दुसऱ्याने केलेली तार अशी होती,’इथे कोणीच बूट घालत नाही, त्यामुळे आपले बूट इथे लगेच संपतील, सगळा माल पाठवून द्या.’ यात एकाच गोष्टीकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन दिसतात, नसलेली बाजारपेठ निर्माण करण्याची धडपड यात आहे.
या दोघांतील ईबुका हा तंत्रज्ञानात बाप माणूस होता तर मोरीता ग्रेट सेल्समन होता. IBM च्या सेल्समनबद्दल असं म्हटलं जायचं की हे लोक एस्कीमो लोकांनाही फ्रिज विकून दाखवतील. अकिओ तितकाच सामर्थ्यवान विक्रेता होता. सुरुवातीला त्यांनी सुरु केलेल्या कंपनीचं नाव होतं ‘टोकियो त्सुशीन कोग्यो काबुशिकी काईशा‘ म्हणजे ‘टोकियो टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग कंपनी’. पुढे याचीच ‘सोनी कॉर्पोरेशन’ बनली. जेव्हा कंपनी सुरु केली तेव्हा फक्त एका छोट्याशा खोलीत अनेक लोक काम करत असत. सामान ठेवायलाही जागा नसे. सगळी मंडळी रात्री कंपनीचा मुख्य दरवाजा बंद केल्यावर फायर एक्झिटच्या दरवाजाने ये-जा करत, त्यामुळे त्यांना कित्येक वेळा पोलीस चोर समजून पकडत.
सुरुवातीला त्यांना कामाच्या मोबदल्यात तांदूळ मिळे, कारण त्यावेळी दुसर्या महायुध्दातील पराभवामुळे जपान संपुर्णपणे उध्वस्त झालेल्या अवस्थेत होता. युद्धानंतर तांदूळ खूपच दुर्मिळ आणि महाग झाला होता. पुढे कंपनी वाढल्यावर तिचं वेगळं नाव ठेवायचं ठरवलं, तेव्हा आख्खी डिक्शनरी चाळून त्यांच्या लक्षात आलं की लॅटिनमध्ये सोनस म्हणजे ध्वनी,आणि अमेरिकेत ‘सॉनी’ हा शब्द तरुण हुशार मुलांसाठी वापरला जाई. मग या दोन्हीचा वापर करून ‘सोनी’ या शब्दाचा उगम झाला आणि ‘सोनी कॉर्पोरेशन’चा जन्म झाला. फक्त टोकीयो पुरते त्यांचे अस्तित्व जरी असले तरी त्यांची स्वप्नं फार मोठी होती.त्यांच्या महत्त्वाकांक्षा सात समुद्रापलीकडच्या होत्या. आता सोनीने टेप, रेडिओ अगदी लहान आकाराचे म्हणजे खिशात मावतील असे रेडिओ बनवण्यास सुरुवात केली, पण गंमत म्हणजे त्यांची उपकरणे खिशात बसेनात म्हणून चक्क मोठे खिसे असलेले शर्टही बनवून विकायला सुरु केले होते.
सोनीचे मालाच्या दर्जावर खूपच बारीक लक्ष असे. पण त्याकाळी जपानी मालाच्या दर्जाची चेष्टा सुरु असल्याने मोरीता त्यांच्या मालावर ‘मेड इन जपान’ असं बारीक अक्षरात लिहित. कारण त्यादरम्यान ‘Made in Japan’ चा अर्थ असा होता की ‘स्वस्त व तकलादू उत्पादने’ परंतु अकियो मोरिता आणि मसुरु इबुकाचे ‘भव्य ध्येय’ होते की ‘जगातील जपानची प्रतिमा बदलणे.’ सोनीला जापनीज उत्पादनं निकृष्ट दर्जाची असतात ही जगातील प्रतिमा बदलुन ‘जापनीज उत्पादने म्हणजे उत्कृष्ट दर्जा’ अशी करायची होती. एकदा अमेरिकेतील बोलावा नावाच्या कंपनीने सोनीकडून १ लाख ट्रांझीस्टर बनवण्याची ऑर्डर दिली. ही ऑर्डर म्हणजे त्याकाळच्या दहा वर्षांच्या ऑर्डरइतकी मोठी होती. त्यांची एकच अट होती की सोनीने त्यावर सोनीचे नाव न टाकता बोलावाचे टाकावे. अकिओला इतका प्रचंड पैसा दिसत असूनही त्या मिटिंगमधून चक्क निघून गेला. पण नंतर ‘सोनी’ ही कंपनी बोलावाच्या ३० पटीने मोठी कंपनी झाली. आज कॅसेट्स, सीडीज, टीव्ही,टेप, डिस्कमन, वॉकमन, फ्लॉपी डिस्क, व्हिडिओ कॅमेरा,हँडीकॅम, सोनी एंटरटेनमेन्ट असा वाढलेला पसारा म्हणजे अकिओ मोरीता आणि ईबुकाचे प्रयत्न होय. त्यांचं भव्य ध्येय त्यांना जागतीक पातळीवर आपली विशेष छाप पाडण्यासाठी कारणीभूत ठरलं. प्रचंड शिस्त, सतत नाविन्यपुर्ण नवनिर्मिती, आणि बिनधास्तपणे जोखिम घेत ‘सोनी’ने प्रगती केली आहे.
तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि हो अजून कोणत्या विषयाची माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.
साभार :- अच्युत गोडबोले