सोशल मीडिया फॉर बिझनेस ग्रोथ
डिजिटल मार्केटिंगच्या विश्वात
स्पर्धेच्या युगात जागच्या जागी टिकून राहण्यासाठी प्रचंड वेगाने धावायची गरज आहे. आहे तिथे टिकून राहण्यासाठी प्रत्येकाला अतिशय वेगाने धावणे अपरिहार्य बनले आहे. कारण प्रत्येकाची स्पर्धा जगातील प्रत्येकाबरोबर आहे. अशा वेळी व्यवसायात उतरणाऱ्या प्रत्येक बिझनेसमनला स्मार्ट पध्दतीने जगाच्या पटलावर वावरावे लागत आहे.
सोशल मीडिया, वेबसाईट, डिजिटल प्रोग्रॅमिंग हे रोजच्या जीवनाचे भाग बनले आहेत. अशा काळात प्रत्येक उद्योजकाच्या पोटात भीतीचा गोळा आणणारी गोष्ट म्हणजे ज्याला डिजीटल जगाशी जोडता येणार नाही त्या उद्योजकाचा व्यवसाय कालबाह्य ठरणार आहे. पानपट्टी, टॅक्सी, रिक्षा, किराणा दुकाने सुध्दा ऑनलाईन व्हायला लागली आहेत.
डिजीटल उपकरणांमुळे जग एकदम जवळ आले. त्यात प्रचंड बदल झाले. या आभासी जगाशी आपल्याला जुळवून घेण्यासाठी तयार राहणे गरजेचे आहे. या नव्या डिजीटल जगात हौस – नवसे – गवसे यांची संख्या सुध्दा प्रचंड प्रमाणात वाढली आहे. म्हणून आपला व्यवसाय डिजीटल करण्याआधी आपल्याला डिजीटल मार्केटिंगची पायाभूत माहिती असणे गरजेचे आहे. आपण जर या क्षेत्राशी संपूर्णपणे अनभिज्ञ असू तर भरल्या बाजारात आपल्याला ठगवणाऱ्यांची संख्या कमी नाही. तेव्हा जाणकार बनण्यासाठी आपल्याला डिजीटल मार्केटिंग कळणे, त्याच्या सेवा कुणाकडून घ्यायच्या कोणावर विश्वास ठेवायचा हे शिकणे सुध्दा गरजेचे आहे.
काही महिन्यापूर्वी एका नवीन उद्योजकाने ई-कॉमर्स वेबसाईट बनवायला दिली. त्या कंपनीने त्या वेबसाईटवर काम करण्याचे ४० हजार रुपये प्रतिमहिना द्यावे लागतील असे सांगितले. आता हा उद्योजक नवीन होता. त्याला या वेबसाईट किंवा आयटी क्षेत्रातील काहीच माहिती नव्हती. तो कबूल झाला. साडेतीन महिन्यानंतर त्याचे बील १ लाख ४० रुपये झाले तरी सुध्दा त्या वेबसाईट १० टक्के काम सुध्दा झाले नव्हते. आता तो इतर सगळीकडे त्याच्या वेबसाईटची जाहिरात करुन बसला होता. आणि ती कंपनी केवळ डोमेनचे १ लाख चाळीस हजार मागत होती. अशा दुःखद कथा ऐकायला मिळतात. तेव्हा मन सुन्न होते. अजून कुणी या गर्तेत फसू नये म्हणून या पुस्तकाचा घाट घातला आहे.
गेल्या पाच वर्षात जेवढे बदल आपण पाहिलेले आहेत. तेवढे बदल संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात घडून आलेले नाहीत. गेल्या काही वर्षात आपल्याला वस्तू खरेदी करण्यासाठी किराणा दुकान, सुपर मार्केट व मॉलमध्ये जाणे भाग होते. आता मात्र घरबसल्या फ्लिककार्ट, स्नॅपडील सारख्या कंपन्यांना हव्या त्या वस्तूची ऑर्डर द्या. दुसऱ्या दिवशी ती वस्तू आपल्या दारात येऊन उभी असते. त्याचे पैसेसुध्दा वस्तू हातात मिळाल्यावरच द्यायचे आहेत. पैशासाठी नोटा किंवा रोख रक्कमेचे निम्याहून अधिक व्यवहार इतिहासजमा झाले आहेत. मोबाईलचा रिचार्ज करणारी दुकाने बंद व्हायला लागली आहेत. कारण प्रत्येकजण आपल्या मोबाईल मधून रिचार्ज करु लागला आहे.
सायबर कॅफेत बसण्यासाठी तरुणाई रांग लागलेली असायची त्या ठिकाणी आता सायबर कॅफे औषधाला सुध्दा सापडणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. डाटा सेवेवर पैसे कमावणाऱ्या टेलिकॉम कंपन्यामध्ये जास्तीत जास्त डाटा व इंटरनेट स्पीड देण्याची जणू काही स्पर्धाच चालू झालेली आहे. प्रत्येकाच्या हातात डिजीटल उपकरणे आलेली आहेत. ती कमालीची स्वस्त व खिशाला परवडणाऱ्या दरात तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. बातम्या वाचण्यासाठी वर्तमान पत्र किंवा टीव्ही वर अवलंबवून राहावे लागत नाही.
अशा परिस्थितीत जगाची विभागणी एका न दिसणाऱ्या रेषेने दोन भागात झाली आहे. त्यातील पहिल्या भागाला वास्तव जग (Real World) म्हणतात. तर दुसऱ्या भागाला आभासी जग (Virtual World) म्हणतात. खऱ्याखुऱ्या जगात जगण्यासाठी या आभासी जगाचा आधार घेणे अपरिहार्य आहे. म्हणून या नव्या जगाशी जोडून राहण्यासाठी डिजीटल मार्केटिंगची माहिती व त्याचा वापर करुन आपला व्यवसाय वाढवणे ही प्रत्येक लहान मोठ्या उद्योजकाची गरज बनली आहे. तेव्हा आपण या डिजीटल दुनियेत प्रवेश करण्यासाठी तयार होऊया.
तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर लाइक आणि subscribe जरूर करा आणि हो अजून कोणत्या विषयाची माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.