लेखउद्योजकताबिझनेस महारथी

Referrush Success Story: लकवा झाला… पण आज कमवतो रोज दीड लाख रुपये!

Referrush Success Story: लकवा झाला… पण आज कमवतो रोज दीड लाख रुपये!

यशाचा मार्ग कधीच सोपा नसतो. त्यात मेहनत, संघर्ष आणि जिद्द असते. प्रत्येकजण या मार्गावर यशस्वी होतोच असं नाही, पण काही जण अपयशाला न जुमानता पुढे जातात आणि स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात. विक्रम पै हे या गोष्टीचं उत्तम उदाहरण आहे.

बंगळुरूमधील हा तरुण उद्योजक आज ReferRush या प्रसिद्ध ई-कॉमर्स रेफरल सेल्स प्लॅटफॉर्मचा संस्थापक आणि सीईओ आहे. पण त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. गेल्या सहा वर्षांत त्याने पाच व्यवसाय सुरू केले, पण त्यातला एकही यशस्वी झाला नाही. त्यामुळे त्याला तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावं लागलं. तरीही त्याने हार मानली नाही. प्रत्येक अपयशातून शिकत, जिद्दीने पुढे जात अखेर ReferRush हा यशस्वी व्यवसाय उभारला. आज तो केवळ एक यशस्वी उद्योजक नाही, तर चिकाटी आणि मेहनतीचं उत्तम उदाहरण आहे. या लेखात आपण त्याच्या संघर्षमय प्रवासावर एक नजर टाकूया.  

सुरुवातीचा संघर्ष आणि सलग अपयश

बंगळुरूमध्ये जन्मलेल्या विक्रमने शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोठ्या आत्मविश्वासाने आणि उत्साहाने उद्योजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्याची स्वप्नं मोठी होती, यशस्वी होण्याची जिद्दही होती. मात्र, व्यवसायाच्या वाटचालीत अनेक अडथळे आले. अनुभव आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्याने सुरू केलेले एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच व्यवसाय अपयशी ठरले. सततच्या अपयशामुळे मोठं आर्थिक संकट कोसळलं. त्याला जवळपास दोन कोटी रुपयांचं नुकसान झालं. परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत गेली. मित्रांनी दुरावा निर्माण केला, नातेवाईक टीका करू लागले आणि आईचाही त्याच्यावरचा विश्वास कमी झाला. एका क्षणाला परिस्थिती अशी आली की, खिशात फक्त ४,००० रुपये उरले. कर्मचाऱ्यांना पगार देणेही शक्य नव्हते. काही जणांनी त्याची थट्टा केली. “एलन मस्क बनायचा प्रयत्न करतोय का?” असे टोमणे मारले.

सततच्या तणावाचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर झाला. मानसिक तणावामुळे शरीर साथ सोडू लागलं. अखेर त्याला लकवा झाला आणि त्याचे चालणे, बोलणेही कठीण झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यासारखी वाटू लागली. तो खचला, रडला, पण हार मानली नाही. डोळ्यांतले स्वप्न जिवंत ठेवत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. या कठीण काळात स्वतःशीच लढण्याचा निर्धार केला आणि नव्या उर्जेने पुन्हा उभं राहण्याचा निश्चय केला.

ReferRush ची स्थापना आणि पहिलं यश

अनेक अपयशांनंतरही विक्रमने हार मानली नाही. नव्या उमेदीनं त्याने ReferRush या रेफरल मार्केटिंग प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. सुरुवातीला हा व्यवसायही अपयशी ठरेल, असं अनेकांना वाटत होतं. पण यावेळी विक्रम मागे हटणार नव्हता. ReferRush व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांच्या माध्यमातून नवीन ग्राहक मिळवण्यासाठी मदत करतं. ग्राहक कंपनीच्या उत्पादनांची माहिती इतरांना सांगतात आणि त्याबदल्यात त्यांना कमिशन मिळतं. त्यामुळे कंपन्यांना विश्वासार्ह ग्राहक मिळतात, तर ग्राहकांनाही घरबसल्या कमाईचा पर्याय उपलब्ध होतो. हळूहळू हा व्यवसाय स्थिरावत गेला आणि ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला.

सुरुवातीला पहिल्या एक लाख रुपयांसाठी तब्बल चार महिने लागले. पण विक्रमने मेहनत आणि जिद्द कायम ठेवली. त्याच्या प्रयत्नांचा परिणाम दिसू लागला आणि आज ReferRush दररोज १.५ लाख रुपये कमवतो. अपयशाच्या काळात खचून न जाता ज्या चिकाटीने विक्रमने प्रयत्न सुरू ठेवले, त्याच जिद्दीमुळे त्याला यशाचा हा टप्पा गाठता आला.

निखील कामतकडून ReferRush ला फंडिंग – यशाच्या नव्या पर्वाची सुरुवात

विक्रमच्या अथक मेहनतीला अखेर मोठं यश मिळालं. त्याच्या ReferRush या रेफरल मार्केटिंग स्टार्टअपने उद्योगविश्वात ठसा उमटवायला सुरुवात केली होती. याच प्रवासात, भारतातील नामवंत उद्योजक निखील कामत यांच्या कंपनीने ReferRush ला इनिशिएटिव्ह फंडिंगसाठी निवडलं. तब्बल २,४०० कंपन्यांमधून ReferRush ची निवड होणं हे विक्रमसाठी एका मोठ्या यशाचं प्रतीक होतं. यामुळे केवळ आर्थिक पाठबळच नाही, तर या प्लॅटफॉर्मच्या भविष्यासाठीही एक मजबूत दिशा मिळाली. आता त्याला ठाम विश्वास आहे की, लवकरच प्रत्येक ई-कॉमर्स ब्रँड आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी ReferRush चा वापर करेल.

2

विक्रमच्या मते, त्याचा संपूर्ण प्रवास हा शिकण्याचा होता. सुरुवातीची पाच वर्षं त्याने प्रयोग आणि चुका यातून शिकण्यात घालवली. अपयश आलं तरीही आत्मविश्वास कधीही गमावला नाही. व्यवसायात संकटं आली, आर्थिक तोटा सहन करावा लागला, शारीरिक आणि मानसिक त्रासही सोसावा लागला. पण तरीही तो जिद्दीने लढत राहिला. त्याच्या मते, “जर तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण होत असतील, तर तुम्ही तुमचं स्वप्न नक्कीच साकार करू शकता.”

आज विक्रमच्या संघर्षाची कहाणी हजारो तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अपयशाला घाबरून थांबण्यापेक्षा त्यातून शिकून पुढे जाणं हेच यशाचं खरं रहस्य आहे. विक्रमने ते करून दाखवलं. 

आणखी वाचा:

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button