Microsoft ते Lenskart:पियुष बन्सल यांचा प्रेरणादायी प्रवास

प्रत्येक मोठ्या स्वप्नामागे धैर्य, मेहनत आणि जिद्द दडलेली असते. अशीच सुरुवात आहे एका तरुणाच्या प्रवासाची. त्या तरुणाचं नाव आहे Lenskart चे संस्थापक पियुष बन्सल. जगभरात करिअरचे असंख्य दालने उघडी असताना आणि आरामदायी आयुष्याच्या अनंत शक्यता समोर असताना, पियुष यांनी मात्र अमेरिकेतील उच्च पगाराची, सुरक्षित नोकरी मागे सोडून भारतात परतण्याचं धाडस केलं. स्वतःच्या देशात काहीतरी अर्थपूर्ण उभारण्याच्या स्वप्नावर, जोखीम घेण्याच्या धैर्यावर आणि प्रबळ इच्छाशक्तीवर त्यांनी आपल्या स्वप्नांची बीजं पेरली आणि त्यातूनच जन्म झाला पुढे “Lenskart” या तब्बल ७२,000 कोटींच्या सामर्थ्यशाली कंपनीचा.
सामान्य माणसाला कमी किमतीत उत्तम दर्जाची दृष्टी सेवा मिळावी हा उद्देश घेऊन सुरू झालेला हा प्रवास भारतीय उद्योजकतेला नवी दिशा देणारा ठरला आहे. २०२५ हे वर्ष त्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरलं असून Lenskart ने आपला IPO लाँच केला आहे. ‘शार्क टँक इंडिया’मधील शार्क म्हणून पियुष बन्सल यांचं व्यक्तिमत्त्व आज लाखो युवकांसाठी प्रेरणेचं प्रतीक बनलं आहे. संघर्ष, चिकाटी, अपयशांवर मात आणि पुन्हा उभं राहण्याची क्षमता,या सर्वांचा मिलाफ म्हणजे पियुष बन्सल यांचा आतापर्यंतचा जीवनप्रवास. या लेखातून त्यांच्या या प्रेरणादायी वाटचालीवर एक नजर टाकूया…
सुरुवातीचं आयुष्य
पियुष बन्सल यांचा जन्म २६ एप्रिल १९८५ रोजी बलकिशन आणि किरण बन्सल यांच्या कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांच्यात नवीन काहीतरी शिकण्याची आणि स्वतःला सतत घडवत राहण्याची वृत्ती होती. इतर मुलं खेळण्यात रमली असताना, पियुष कॉल सेंटरमध्ये काम करू लागले. तिथे ते ग्राहकांच्या तक्रारी ऐकत आणि त्यांच्या समस्या समजून घेत. या अनुभवातून त्यांना ग्राहकांचा स्वभाव आणि त्यांची गरज ओळखणं किती महत्त्वाचं आहे, हे समजलं.
त्यांच्या प्रामाणिकपणा आणि जिद्दीने प्रभावित होऊन एका वरिष्ठ व्यक्तीने त्यांना कोडिंग शिकण्याची संधी दिली. हीच ती वेळ होती ज्या क्षणापासून त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली. कोडिंगने त्यांच्यासमोर नव्या शक्यता उघडल्या आणि त्यांनी आपल्या पुढच्या प्रवासाची सुरुवात केली.
उच्च शिक्षण आणि Microsoft मधील भूमिका
पियुष बन्सल यांनी आपले उच्च शिक्षण कॅनडाच्या मॉन्ट्रियल येथील McGill University मधून इंजिनीअरिंगमध्ये पूर्ण केलं. शिक्षणानंतर त्यांना अमेरिकेत Microsoft मध्ये नोकरी मिळाली, जिथे २००७ मध्ये ते प्रोग्राम मॅनेजर झाले,असं पद, ज्याचं स्वप्न हजारो तरुण पाहतात. या पदामुळे त्यांना मोठ्या कंपनीत काम करण्याचा अनुभव, स्थिर भविष्य आणि परदेशातील आयुष्य जगण्याची संधी मिळाली. अनेक लोकांसाठी हे यशाचं प्रतीक असतं, पण पियुषच्या मनात काहीतरी कमी असल्याची जाणीव सतत होत होती.
मोठं पद, सुरक्षित भविष्य असूनही त्यांना जाणवत होतं की त्यांच्यात स्वतःचं काहीतरी निर्माण करण्याची ओढ आहे. हीच ओढ आणि आत्मविश्वास त्यांना परत भारताकडे घेऊन आले, इथे त्यांनी स्वतःचं मार्ग तयार करून नव्या संधी शोधायला सुरुवात केली.
पहिला प्रयत्न अपयशी
भारत परतल्यावर २००७ मध्ये पियुष बन्सल यांनी SearchMyCampus.com नावाचे स्टार्टअप सुरू केलं. हे प्लॅटफॉर्म मुख्यतः विद्यार्थ्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलं गेलं होतं. सुरुवातीला १५,००० विद्यार्थी जोडले गेले, टीम वाढली आणि अनेक संधी दिसू लागल्या. विद्यार्थ्यांना उपयुक्त असलेला हा उपक्रम त्यांना खूप उत्साही बनवत होता, पण व्यवसायाची वाढ अपेक्षेनुसार होत नव्हती.

दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर, या स्टार्टअपला बंद करावं लागलं. हे अपयश पियुषसाठी धक्का देणारं होतं, पण त्यांनी हार मानली नाही. उलट, या अनुभवाने त्यांना अधिक सजग आणि समजूतदार बनवले. अपयशातून शिकण्याची संधी त्याला मिळाली आणि पुढील प्रवासासाठी तो अधिक ठाम आणि तयार झाला.
Flyrr ते Lenskart पर्यंत
२००९ मध्ये पियुष बन्सल यांनी Flyrr नावाचा ऑनलाइन आयवेअर व्यवसाय सुरू केला. काही काळ हा उपक्रम चालला, पण नंतर तो बंद करावा लागला. या अनुभवात त्यांना एक महत्त्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे भारतामध्ये चष्म्याची विक्री अजूनही व्यवस्थितरित्या होत नव्हती. देशात ५ कोटींहून अधिक लोकांना चष्म्याची गरज होती, पण व्यवस्थापनाचा अभाव, महाग किंमती आणि कमी दर्जाची सेवा यामुळे त्यांची ही गरज पूर्ण होत नव्हती.
त्याचबरोबर जवळपास १८ कोटी लोक चष्मा न वापरता राहत होते. या समस्येवर बघताना पियुषने ही संधी म्हणून पाहण्यास सुरुवात केली. त्यांना जाणवले की ही फक्त समस्या नाही, तर भारतातील आयवेअर उद्योगात एक मोठी आणि भव्य संधी आहे, जिथे चांगली सेवा आणि दर्जेदार उत्पादन देऊन लाखो लोकांच्या गरजा पूर्ण करता येऊ शकतात.
Lenskart च्या क्रांतीचा उदय
डिसेंबर २०१० मध्ये पियुष बन्सल, अमित चौधरी आणि २०११ मध्ये सुमीत कापाही यांनी एकत्र येऊन Valyoo Technologies अंर्गत Lenskart ची स्थापना केली. सुरुवातीच्या काही महिन्यांत अनेक अडचणी आल्या, जवळपास २०% प्रोडक्ट्स परत येणे, ग्राहकांना योग्य नंबर न मिळणे, फिटिंगमध्ये त्रुटी, आणि डिलिव्हरी नुकसान होणे. या काळात पियुष एकाचवेळी WatchKart, JewelsKart, BagsKart हे तीन उपक्रमही सांभाळत होते, पण त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे ,सगळं थांबवून फक्त Lenskart वर लक्ष देण्यास सुरुवात केली. या निर्णयानंतरच Lenskart चा खरा प्रवास सुरू झाला.
२०१३ मध्ये Lenskart ने भारतीयांसाठी एक क्रांतिकारी सेवा सुरू केली, फ्री होम आय चेकअप. या सेवेत प्रशिक्षित तंत्रज्ञ थेट घरपोच येऊन काही मिनिटांतच नंबर तपासणी करायचे, ज्यामुळे लाखो लोकांपर्यंत सहज पद्धतीने सेवा पोहोचली. ही सेवा ग्राहकांसाठी नव्या अनुभवाची सुरुवात ठरली आणि त्यांना घरबसल्या चष्मे मिळण्याची सुविधा मिळाली.
फक्त एका वर्षातच Lenskart ने मोठ्या गतीने प्रगती केली. १०,००० हून अधिक घरभेटी, दररोज १,००० ऑर्डर्स, आणि व्यवसाय १०० कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचला. या नव्या मॉडेलमुळे भारतीय eyewear बाजारात Lenskart ची ओळख क्रांतिकारी बनली आणि पियुष यांच्या धाडसी निर्णयाचे फळ दिसू लागले.
यशाच्या शिखरावर
Lenskart ने भारतात पहिल्यांदाच ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मार्गांनी चष्मा खरेदीचा अनोखा फॉर्म्युला आणला. त्यांनी 3D Try-On तंत्रज्ञान, ४८ तासांत डिलिव्हरी, अत्याधुनिक उत्पादन सुविधा, तसेच ऑफलाइन स्टोअर्स आणि ऑनलाइन ऑर्डर या संकल्पनेतून ग्राहकांचा अनुभवच बदलला. २०१७ पर्यंत रोज ३०,००० पेक्षा जास्त लेन्सेस तयार होत होत्या आणि २०१८ मध्ये रेव्हेन्यू ४६० कोटींवर पोहोचला.
२०१९ मध्ये SoftBank Vision Fund ने Lenskart मध्ये $275 million अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली आणि कंपनी एका झटक्यात युनिकॉर्न बनली. भारतभर २,२०० स्टोअर्स उघडल्या, त्यातील निम्मी स्टोअर्स फक्त ७ महिन्यांत प्रॉफिटेबल ठरल्या. २०२४ पर्यंत रेव्हेन्यू ५,४२८ कोटींवर पोहोचला. हे आकडे Lenskart च्या अद्भुत आणि प्रभावी वाढीचं स्पष्ट उदाहरण आहेत.
२०२५ वर्ष ऐतिहासिक
२०२५ वर्ष Lenskart साठी ऐतिहासिक ठरलं. ४ नोव्हेंबरला त्यांनी IPO लाँच केला, ज्याची रक्कम ७,२७८.०२ कोटी होती आणि त्याला २८.२६ पट ओव्हरसब्स्क्रिप्शन मिळालं, हे आकडे खरंच थक्क करणारे होते. त्यानंतर १० नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग झाली आणि कंपनीचे मूल्यांकन थेट ७२,००० कोटी वर पोहोचले. १२ वर्षांच्या अथक संघर्षाचं हे Lenskart साठी सुवर्णफळ ठरलं.
मित्रांनो, स्वप्न जर मनापासून असेल आणि त्याला पूर्ण करण्याची इच्छाशक्ती आपल्यात असेल, तर वाट आपोआप उजळत जाते. Lenskart फक्त एक ब्रँड नाही, तर तो भारतीयांना त्यांच्या दृष्टिकोनाशी जोडणारा एक दुवा आहे, आणि पियुष बन्सल हे त्या दृष्टिकोनाला तेज देणारे दीपस्तंभ आहेत.
- अंध असूनही वयाच्या २३व्या वर्षी उभी केली ५०० कोटींची कंपनी
- आठवी नापास ते हजारो कोटींचा मालक. सीबीआय, रिलायन्स चालतात याच्या इशाऱ्यावर- त्रिशनित अरोरा
- शार्क टॅंकमधील नमिता थापर, भारतातील एकमेव Phar’Maa’ चा असा आहे प्रवास…




