आधुनिक शेतीशेती

आधुनिक शेती – Modern Agriculture

Modern Agriculture – मित्रांनो, आपल्या रोजच्या जगण्यात सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत जवळपास सगळ्याच पदार्थांमध्ये कांदा असतो. भारतीयांच्या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. संपूर्ण भारतात कांदा पिकविणाऱ्या राज्‍यात, क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत, महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे एक लाख हेक्‍टरवर कांद्याची लागवड केली जाते. यामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्‍हे हेक्‍टरी कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत. तसेच मराठवाडा, विदर्भ व कोकणात सुध्‍दा काही जिल्‍हयांमध्‍ये कांद्याची लागवड केली जाते.

नाशिक जिल्‍हा हा महाराष्‍ट्रात नव्‍हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्‍यात प्रसिध्‍द आहे. एकूण उत्‍पादनापैकी महाराष्‍ट्रातील 37 टक्‍के तर भारतातील 10 टक्‍के कांद्याचे उत्‍पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात घेतले जाते. साहजिकच येथे कांद्याचे उत्पादन घेताना पेरणी, काढणी आणि कापणी अशा प्रक्रियांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज भासते. सध्याच्या काळात मजुरांची वाढती मजुरी बघता नक्की त्यांना काम द्यावं का? अशी समस्या सर्व शेतकरी बांधवांसमोर उभी राहिली आहे. शेतकऱ्यांच्या याच समस्येला दूर करण्यसाठी म्हणून की काय नाशिक जिल्हाच्या चांदवड तालुक्यातील तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या मुलांनी कांदा काढणी व पात कापणी यंत्राचा यशस्वी प्रयोग केला आहे. श्रम, वेळ आणि खर्च या तीनही गोष्टी कमी करण्यासाठी या यंत्राचा चांगलाच वापर होणार आहे. 

कांदा काढणीच्या वेळेस अनेकदा विळा लागून इजा होण्याचा धोका असतो. या गोष्टींचा विचार करून या विद्यार्थ्यांनी उन्हाळी कांद्यासाठी उपयोगी ठरेल असे नावीन्यपूर्ण व स्वयंचलित कांदा काढणी व पात कापणी यंत्र विकसित केले आहे. सागर ऐशी, पंकज पवार, दुर्गेश भामरे व लोकेश देवरे हे चौघे विद्यार्थी कळवण, सटाणा व देवळा तालुक्यांतील आहेत. जन्मच शेतकरी कुटुंबातला असल्याने लहानपणापासूनच त्यांना शेतीतील समस्या जवळून माहित होत्या. यंत्रनिर्मितीसाठी हा महत्त्वाचा घटक होता. तांत्रिक ज्ञानासह त्यांनी विविध शोधनिबंधांचा अभ्यास केला. कांदा पात यंत्र तयार झाले, पण त्यात काही त्रुटी होत्या. मग योग्य अंतरावर कापणी, पात व कांदा विलगीकरण यात काही बदल करून शेवटी बुद्धी कौशल्य, संशोधकवृत्ती अथक प्रयत्नांतून स्वयंचलित पद्धतीचे कांदा पात कापणी (ओनियन लीफ कटर) यंत्र विकसित करण्यात त्यांना यश आले.

यंत्राची रचना आणि काढणी-कापणी प्रक्रिया

– दोन मिलिमीटर जाडी व ३ X १.५ इंच आकाराच्या एमएस पाइपवर आधारित आर्क वेल्डिंगच्या साह्याने सांगाडा निर्मिती केली गेली.

– सांगाडा वाहतुकीसाठी मागील बाजूस १४ इंच आकार परिघाच्या दोन चाकांना जोडून पुढील भागात आधारासाठी बोल्टच्या आधारे स्टँड लावण्यात आलं.

– शेतातून पातीसहित काढणी केलेले कांदे यंत्राच्या मागील भागात वरील बाजूस हॉपरमध्ये टाकले जातात. हे हॉपर एक मिमी शीट मेटलद्वारे तयार करण्यात आलंय. तसेच यात एकावेळी क्रेटभर पातीसहित कांदे टाकता येतात.

– हे कांदे यंत्राद्वारे पुढे जाण्यासाठी कन्व्हेअर सिस्टीम आहे. त्यासाठी जीआय शीटचा वापर केला गेलाय.

– या यंत्रणेतून पुढे आलेले कांदे, कापणीसाठी पातीसहित जाण्यासाठी वर्तुळाकार स्लॉटेड रोटर रचना केली आहे. त्यात एकूण २८ ओळी आणि प्रत्येक ओळीत ९ स्लॉट्‍स आहेत. असे एकूण २५२ चौकोनी स्लॉट्‍स यात आहेत.

– या यंत्रणेद्वारे कांदा स्लॉटमध्ये तर पात वर उभी असते. रोटर फिरल्यानंतर पात कटरच्या संपर्कात येऊन योग्य अंतरावर कांद्याच्या मानेजवळ कापली जाते. व्यवस्थित कापणी व्हावी म्हणून हार्ड मेटल स्टीलचा कटर वापरला आहे.

– एकदा कांद्यापासून पात बाजूला झाली तर कापला गेलेला कांदा एका भांड्यात जाऊन पडतो.

– कन्व्हेअर आणि रोटरच्या गतीवर नियंत्रण व सुसंगतता ठेवण्यासाठी गिअर बॉक्स व वेगवेगळ्या आकाराच्या पुलीचा वापरसुद्धा यात केला गेला आहे.

– या यंत्राच्या वापरासाठी सिंगल फेज वीजपुरवठा आवश्यक आहे.

– हे यंत्र तसं ६२ हजार रुपयांत तयार झालंय, पण त्याचा एकूण निर्मिती खर्च धरल्यास ही किंमत ९० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते.

यंत्राचे फायदे

– तासाला १० क्विंटल कांदा प्रक्रिया करण्याची यंत्राची क्षमता असल्याने वेळ, मजुरी आणि खर्चात बचत होते.

– या यंत्राला चाके असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणंसुद्धा शक्य आहे.

–  या यंत्राची हाताळणी ही प्रत्येक शेतकऱ्याच्या दृष्टीने सुलभ व सुरक्षित करण्यात आलेली आहे.

– तसेच हे यंत्र पर्यावरणपूरक व प्रदूषण विरहित आहे.

आता हे यंत्र बाजारात कधी येतंय आणि ते सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहचतंय हे पाहणं औस्तुक्याचं ठरेल.

अशा या आधुनिक शेती – Modern Agriculture ची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. हा लेख जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि नवी अर्थक्रांतीच्या यू ट्यूब चॅनलला आत्ताच subscribe करा.


आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button