उद्योजकताबिझनेस महारथी

या माणसामुळे आपल्या घरापर्यंत वीज पोहचली- निकोला टेस्ला

पावसाळ्याचे दिवस होते. आकाशात वीजा कडाडत होत्या. सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. ऑस्ट्रिया-हंगेरी सीमेवरच्या लिका नावाच्या भागातील स्मिजन गावातील एका गर्भवती आईला गरोदारपणाच्या कळा सहन होत नव्हत्या. प्रसूतीची वेळ झाली होती. अखेरीस दाईच्या सहाय्याने आईने बाळाला जन्म दिला. बाळ जन्मल्यावर दाई म्हणाली की “एवढ्या घनघोर अंधारात जन्मेलेल्या या बाळाच्या आयुष्यात पण अंधार असेल का?” त्यावर आईने उत्तर दिले, “नाही हे बाळ संपूर्ण जगाला प्रकाशमान करेल.” १० जुलै १८५६ या दिवशी त्या वेळच्या ऑस्ट्रियामध्ये म्हणजे आजच्या क्रोएशियात जन्मलेल्या त्या बाळाचे नाव होते निकोला टेस्ला.

लहानपणी त्याची तब्येत अतिशय नाजूक असे. लहान असताना त्याला प्रकाश तसेच वेगवेगळ्या आकृत्यांचे भास व्हायचे. त्यामुळं त्याला बऱ्याच वेळा हे कळत नसे की आपण जे पाहतो आहे, ते खरं आहे की खोटं! कुठलीही गोष्ट एकदा पहिली की त्याच्या डोक्यात फिट्ट बसायची. त्याला जेव्हा एखादी आकृती दिसायची, तेव्हा ती त्याच्या पूर्णपणे स्मरणात रहायची. ती आकृती कागदावर काढायची सुद्धा त्याला कधी गरज पडली नाही. शिक्षकांनी दिलेली गणितं मुलं उतरवून घेईपर्यंत निकोलाने ती मनातच सोडवूनसुद्धा टाकलेली असायची! वयाच्या नवव्या वर्षी टेस्लानं उडणाऱ्या माश्यांच्या हालचालींमधून मिळणाऱ्या ऊर्जेच्या जोरावर चालणारी विजेची मोटार बनवली.

त्याचे वडील हे चर्चमध्ये धर्मगुरू होते आणि आपल्या मुलानेसुद्धा आपल्यासारखेच काम करावे असं त्यांना वाटायचं. पण मुलाचा विज्ञान आणि गणिताकडे असलेला कल पाहून त्यांनी निकोलाला इलेक्ट्रीकल Engineering ला प्रवेश घेण्यासाठी संमती दिली. गणित आणि विज्ञानात अत्यंत हुशार असलेल्या निकोलाने १८७५ मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेऊन ९ परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. कॉलेजमध्ये असताना टेस्ला फाटे ३ वाजता अभ्यासाला बसायचा आणि रात्री ११ वाजेपर्यंत त्याचा अभ्यास अखंड सुरु असायचा. झोपेत वेळ वाया जाऊ नये म्हणून तो फक्त ४ तास झोपायचा.

 १८७५ला पॉलिटेक्नीकच्या द्वितीय वर्षाला असताना, अतिहुशारपणामुळे एका शिक्षकांसोबत त्याचे मतभेद झाले आणि त्या वर्षी तो नापास झाला. त्यातच त्याला जुगार खेळायची सवय लागली. अभ्यास झाला नाही आणि तो फायनल परीक्षेत नापास झाला. त्यामुळे तो त्यांचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण करू शकल नाही. एवढंच नाही तर त्यांने त्यांच्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी असलेले संपर्क पूर्णपणे तोडले. १८८१ मध्ये टेलिग्राफ कंपनीमध्ये काम करून अनेक संप्रेषणात सुधारणा केली. टेलीफोन इम्प्लिफायरची नव्याने रचना केली, मात्र त्यावर स्वतःचे पेटंट घेतले नाही.

घडल्या प्रसंगातून स्वतःला सावरत, इकडे-तिकडे काम केल्यानंतर, त्याला एडिसन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. एडिसन यांनी त्याला त्यांनी बनविलेला डायरेक्ट करंट जनरेटर (DC Generator) जास्त प्रभावी करून द्यायचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी त्याला सांगितले की, “जर तो या कामात यशस्वी झाला, तर त्याला ५० हजार डॉलर बक्षीस म्हणून मिळतील.” मिळणारे बक्षीस ही त्याच्यासाठी खूप मोठी रक्कम होती, म्हणून त्याने ते आव्हान स्वीकारले आणि तो कामाला लागला. दिवस रात्र एक करून, १८-१८ तास काम करून त्याने डायरेक्ट करंट जनरेटर अधिक प्रभावी करून दाखविला. एडिसन यांना हवे तसे बदल त्याने करून दाखवले. परंतु एडिसन यांनी आपला शब्द पाळला नाही. आणि पैसे द्यायला नकार दिला. झालेल्या अपमानामुळे त्याने एडिसनची कंपनी सोडली. त्यानंतर मग त्या दोघांमधील कलह संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरला. 

त्यानंतर टेस्ला यांचा काही काळ खूप खडतर गेला. पैसे नसल्याने त्यांनी काही दिवस खड्डे खणण्याचे काम केले. त्यात त्यांना दिवसाला २ डॉलर्स मिळायचे. पण काही दिवसांनंतर त्यांचे नशीब पुन्हा उजळणार होते, कारण १८८७ मध्ये टेस्ला यांनी Induction Motor चा शोध लावला, जी AC म्हणजेच Alternating Current System वर काम करायची. ही मोटर इतकी शक्तिशाली होती की Electric मार्केटमध्ये आघाडीवर असलेले उद्योगपती जॉर्ज वेस्टिंगहाऊस यांचं लक्ष त्याकडे गेलं. टेस्ला यांनी जॉर्ज वेस्टिंगहाऊस यांच्यासोबत Alternating Current सिस्टीमवर चालणारी ही मोटर जगासमोर ठेवली. मात्र त्याही वेळी एडिसन यांनी त्याचा विरोध केला, कारण त्यावेळी संपूर्ण अमेरिकेत एडिसन यांची DC म्हणजेच Direct Current System कार्यरत होती. एडिसन टेस्ला वाद इतक्या विकोपाला गेला होता, की जेव्हा रेडियोच्या शोधामुळे मार्कोनी आणि टेस्ला यांच्यात भयंकर वाद निर्माण झाले त्यावेळी एडिसनने मार्कोनीला पाठिंबा दिला.

शेवटी वयाच्या ८६व्या वर्षी आर्थिकदृष्ट्या पूर्ण बेजार झालेले निकोला टेस्ला न्यूयॉर्कच्या एका हॉटेलात 7 जानेवारी 1943 च्या रात्री झोपेतच कधी जग सोडून गेले हे सकाळपर्यंत कुणाला समजलं सुद्धा नाही! एडिसन, फॅरडे, मार्कोनी, आईनस्टाईन यांना जिवंतपणी जी प्रसिद्धी, जो मानसन्मान मिळाला तो टेस्ला यांना दुर्दैवाने मिळू शकला नाही. नाही म्हणायला या अवलियाच्या कामाची पोचपावती म्हणून, त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्ताने टाइम मासिकाने त्यांना front page वर स्थान दिले. यावेळी त्यांना ७० हून अधिक वैज्ञानिकांकडून कौतुकास्पद पत्रं आली. त्यावेळी त्यात आईनस्टाईन यांचेही पत्र होते. पण आज त्यांचा सन्मान म्हणून अमेरिकेमध्ये १० जुलै हा टेस्ला दिन म्हणून साजरा केला जातो. क्रोएशियातील १३०हून अधिक रस्त्यांना निकोला टेस्ला हे नाव दिले आहे. चंद्रावरील एका २६ किलोमीटर व्यासाच्या विवराला टेस्ला नाव देण्यात आले आहे. टेस्ला या इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीचं नाव सुद्धा त्यांच्या नावावरुनच ठेवलं आहे. मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये निर्माण झालेल्या एक लघुग्रहाचे नाव 2244 टेस्ला ठेवण्यात आले आहे आणि सर्बियाच्या १०० दिनारच्या नोटेवर टेस्ला यांचे चित्र आहे.

हा लेख विडीयो मध्ये पहा

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button