लॉजिक की इमोशन्स ? – फ्रँचायझी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी हे पाहा!
तुम्हाला एका यशस्वी व सुप्रसिध्द ब्रँडच्या फ्रँचायझीचे मालक म्हणून करियर घडवायचे आहे का? स्वत:च्या फ्रँचायझी व्यवसायाचे मालक असण्याचे फायदे आपण समजून घेतले आहेत. परंतु योग्य फ्रँचायझी निवडण्यापूर्वी एखादी फ्रँचायझी संधी आपल्यासाठी परिपूर्ण आहे याबाबत तुमचे हदय व मेंदू पूर्णत: तयार आहे का? अर्थातच हा निर्णय तुमच्या भावनेवर नव्हे तर तर्कवादावर आधारित असावा.
आपले डोके वापरा, मन आपोआपच साथ देईल.
आपल्यासाठी कोणती फ्रँचायझी सुयोग्य व परिपूर्ण आहे, हे ठरवण्यापूर्वी आपल्याकडे कोणती कौशल्ये आहेत व आपली उद्दिष्टे काय आहेत याचा विचार करण्यासाठी स्वत:ला थोडा वेळ द्या. त्यासाठी आपली उद्दिष्टे, स्वप्ने व इच्छित जीवनशैली याबाबत स्वत:ला प्रश्न विचारा.
एका माणसाला क्रिकेटचे फार वेड होते. क्रिकेटविषयी तो फारच भावनिक होता. याचे तीव्र भावनेतून त्याने खेळाच्या साहित्याचे दुकान सुरू केले. परंतु लवकरच त्याची फसगत झाली. क्रिकेटची तीव्र आवड असूनही त्याचे दुकान काही महिन्यांत बंद झाले. कारण त्यांच्याकडे एक दुकानदार म्हणून, एक व्यापारी म्हणून आवश्यक असलेली कौशल्ये व हुशारी नव्हती. फ्रँचायझी क्षेत्राबद्दल पॅशनेट असलेल्यांसाठी हा एक धडा आहे. तुमच्या निर्णय प्रक्रियेत तुमची वैयक्तिक आवड किंवा छंद यांना प्राथमिकता देऊ नका. व्यवसायिक निर्णय घेताना ते भावनात्मक नसावेत, ते तर्कशुध्द असावेत. एका विशिष्ट फ्रँचायझीच्या यशासाठी तुमचे कौशल्य व तुमच्यातील उपजत बुध्दीमत्ता हे दोन घटक महत्वपूर्ण भूमिका बजावतात. या व्यवसायात तीव्र पॅशनसोबतच लीडरशीप कौशल्ये आत्मसात करणे अत्यंत आवश्यक असते. फ्रँचायझी सिस्टीमच्या एकूण उद्दीष्टांबद्दल तुम्ही नेहमीच पॅशनेट व उत्साहित असले पाहिजे.
परंतु आपण योग्य निर्णय घेत असल्याचे कसे सुनिश्चित करू शकता? तुम्ही योग्य लोकांशी सल्ला मसलत केले पाहिजे त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. एका संशोधनानुसार अनेक व्यवसायिक केवळ प्रॉडक्टची जाहिरात आवडल्याने फ्रँचायझी विकत घेतात व व्यवसाय सुरू करतात. ही भावना नैसर्गिक असली तरी केवळ भावनात्मक निर्णय घेऊन व्यवसाय सुरू करणे हा तर्कसंगत मार्ग नाही. यामुळे आपण अडचणीत येऊ शकता. एखादी फ्रँचायझी संधीसाठी आपल्या भावना तीव्र असतील किंवा एखाद्या फ्रँचायझी संधीने आपणास भावनिक अपील केले असेल तर ते तुमचे अंतिम लक्ष्य साध्य करण्यास तुमची मदत करेल याची खात्री करा किंवा तुम्हाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास योग्य आहे का, हे तपासून पहा. बरेच व्यवसायिक तर्कशुध्द विचार न करता भावनेच्या आहारी जाऊन फ्रँचायझी विकत घेतात व नंतर अपयशी होतात.
काही व्यवसायिक अजून एक चूक करतात. केवळ एखादे उत्पादन किंवा सेवा उदा. पिझ्झा, केकची आवड आहे म्हणून पिझ्झा स्टोअर किंवा केक शॉपची फ्रँचायझी घेतात. या लॉजिक मध्ये गुणवत्तेला व कौशल्यांचे मूल्य शून्य असते. कारण या फ्रँचायझी निवडीमध्ये केवळ आपली आवड हा एकमेव आधार असतो आणि तो नसावा. तुम्ही या व्यवसायात स्वत:ला कसे गुंतवू इच्छिता. एक फ्रँचायझी ऑपरेटर/मालक म्हणून की एक अबसेन्टी ओनर म्हणून? तसेच फ्रँचायझी सपोर्ट सिस्टीम, कॉर्पोरेट स्टाफ आणि गुंतवणूक याबाबत सखोल माहिती असणे आवश्यक आहे. केवळ भावनिक निर्णय घेऊन बिझनेस सुरू केल्यास एक सक्षम लीडर म्हणून पुढील वाटचालही आव्हानात्मक असते. ही आव्हाने योग्य रीतीने न हाताळता आल्यास अपयश पदरी पडते.
वरील सर्व गोष्टी पडताळून तसेच तर्क शुध्द विचार करून आपले उद्दिष्टे आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी परिपूर्ण फ्रँचायझी कोणती आहे याबाबत निर्णय घेतल्या नंतरच तुमच्या संकल्पना वास्तवात उतरतील. एका नामवंत व यशस्वी ब्रँडच्या फ्रँचायझीचे मालक होणे ही स्वप्नवत व रोमांचक गोष्ट आहे. परंतु भावनांवर नियंत्रण ठेवून तर्कशुध्द पध्दतीने विचारपूर्वक व्यवसाय चालवला तर तुम्ही आत्मविश्वासाने यश प्राप्त करू शकता. कारण फक्त तीव्र भावनांनी यश संपादन करता येत नसते, त्यासाठी ज्ञान, कौशल्ये, स्थिर लक्ष्य व तर्कशुध्द विचारशक्ती आवश्यक असते.