लेख

Bhaurao Patil – एका सहावी पास माणसाची जगातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था उभारण्याची गोष्ट

शिक्षण कोणत्याही राष्ट्राचा कणा असतो. शिक्षितांना शिक्षणाचे महत्त्व सांगण्याची गरज नाही, पण तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटला आहात जे स्वतः अशिक्षित असूनही शिक्षणाचे महत्त्व ओळखत असे आणि हजारो वंचित मुलांच्या शिक्षणाचे कारण बनला असे? आम्ही बोलत आहोत कर्मवीर भाऊराव पाटील (Bhaurao Patil) यांच्याबद्दल. त्यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

कर्मवीर भाऊराव पाटील हे एक प्रख्यात शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी सातारा येथे ‘रयत शिक्षण संस्था’ची स्थापना केली. ग्रामीण भागात कोणतेही मुल अशिक्षित राहू नये या विचारधारेने त्यांनी ही संस्था उभी केली. ‘कमवा आणि शिका’ या आपल्या क्रांतिकारी तत्त्वज्ञानाद्वारे त्यांनी मुलांना काम करत शिक्षण घेण्यास प्रेरित केले. त्यांनी केलेल्या अशाच अनेक कार्याची माहिती आजच्या या लेखात जाणून घेऊया.

प्रारंभिक जीवन 

भाऊराव पाटील (Bhaurao Patil) यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी कुंभोज येथे झाला, परंतु त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील आयतवाडे बुद्रुक होते. त्यांच्या आईचे नाव गंगाबाई आणि वडिलांचे नाव पायगोंडा देवगोंडा पाटील होते. मराठी जैन शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भाऊरावांना लहानपणी भाऊ असे संबोधत असत. मोठे झाल्यावर त्यांना आदराने भाऊराव म्हणत असत.

Bhaurao Patil

त्यांचे दोन पूर्वज नेमागोंडा आणि शांतनगोंडा हे नंदणी येथील जैन मठाचे पीठाचार्य आणि दिगंबरपंथी जैन मुनी होते. त्यामुळे भाऊरावांमध्येही लहानपणापासूनच तपस्वी वृत्ती आणि अन्यायाविरुद्ध बंडखोर वृत्ती होती. भाऊरावांचे शिक्षण दहीवाडी आणि विटे येथे झाले. १९०२ साली भाऊरावांना इंग्रजी शिक्षणासाठी कोल्हापूरच्या अजरा तालुक्यातील विटे येथे पाठवण्यात आले. त्यांनी राजाराम मिडल हायस्कूलमध्ये पहिलीपासून तिसरी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर राजाराम हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. शाहू महाराजांच्या राजवाड्यात असताना भाऊराव सहाव्या वर्गातील गणित विषयात नापास झाले. ही गोष्ट शाहू महाराजांना सांगितल्यावर महाराजांनी गणिताचे शिक्षक श्री. भार्गवराम कुलकर्णी यांना भाऊरावाला गणितात पास करून वरच्या वर्गात ढकलण्यास सांगितले.

पण श्री. भार्गवराम हे अतिशय प्रामाणिक होते. त्यांनी शाहू महाराजांना म्हटले, “ज्या बाकावर भाऊ बसतो तो बाक पुढच्या वर्गात ढकलू शकतो, परंतु भाऊ नाही. शिवाय दोनशे गुणांपैकी सात गुण मिळवणाऱ्या मुलाला जास्ती गुण देऊन पास करणे माझ्या बुद्धीला मान्य नाही. आपली इच्छा असेल तर माझी बडतर्फी करा.” कुलकर्णी गुरुजींचे ते शब्द भाऊरावांना आयुष्यभर आठवत राहिले. नंतर भाऊरावांनी वसतिगृहातील मुलांना ही घटना सांगून त्यांना अभ्यासात मेहनत करायला लावली. सहावीत नापास झाल्यानंतर भाऊरावांच्या वडिलांनी त्यांना कोरेगावला परत बोलावले. हे भाऊरावांचे अपयश नव्हे तर  शाहू महाराजांच्या सहवासातील ही शेवटची वर्षे भाऊरावांच्या जीवनात एक वळण ठरली. महाराजांच्या उपस्थितीत त्यांना भावी समाजसुधारक म्हणून समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळाली.

त्यांचा असा विश्वास होता की शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे आणि जात, पंथ किंवा सामाजिक स्थितीची पर्वा न करता ते सर्वांसाठी सुलभ असले पाहिजे. तसेच शिक्षण हे व्यावहारिक आणि समाजाच्या गरजांशी संबंधित असले पाहिजे आणि त्याद्वारे लोकांना स्वावलंबी आणि स्वतंत्र होण्याची शक्ती मिळली पाहिजे. त्यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समग्र आणि बहुविषयक होता. त्यांचा असा विश्वास होता की शिक्षणाने केवळ शैक्षणिक ज्ञान दिले पाहिजे असे नाही, तर जीवन कौशल्ये, मूल्ये आणि नैतिकताही शिकवली पाहिजे.

रयत शिक्षण संस्था – एक आघाडीची शैक्षणिक संस्था

१९१८ मध्ये भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. ही एक आघाडीची शैक्षणिक संस्था होती,आणि ‘स्वावलंबी शिक्षण, हेच आमचे ब्रीद’ या तत्वावर कार्यरत होती.संस्थेची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातील काले गावातील फक्त एका शाळेपासून झाली.पण लवकरच या संस्थेचा विस्तार महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये झाला. विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार मिळावा आणि त्यांनी आर्थिक स्वावलंबी व्हावे म्हणून संस्थेने अनेक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली.

सध्या रयत शिक्षण संस्थेच्या एकूण ७७२ शाखा आहेत, ज्यामध्ये ४२ महाविद्यालये, ४४७ माध्यमिक शाळा, ७ प्रशिक्षण महाविद्यालये, ६२ प्राथमिक शाळा (२८ इंग्रजी माध्यम), ४७ पूर्व-प्राथमिक शाळा (२९ इंग्रजी माध्यम), ९१ वसतिगृहे (३५ मुलींसाठी), ७ प्रशासकीय कार्यालये, ८ आश्रम शाळा, ३ औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि ५७ इतर शाखांचा समावेश आहे.

भाऊरावांनी भारतातील पहिले “कमवा आणि शिका” (Earn and Learn) वसतिगृह योजना सुरू केली. ‘स्वयंसेवेद्वारे शिक्षण’ हे कर्मवीर भाऊरावांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचे मूलभूत तत्त्व होते. या क्रांतिकारी योजनेअंतर्गत विद्यार्थी काम करत, एकत्र स्वयंपाक करत आणि समता व श्रमाचे महत्त्व शिकत असत. विविध पंथ आणि जातीचे विद्यार्थी एकत्र राहत असत, ज्यामुळे सामाजिक भेदभाव दूर होत असे. ही योजना मुख्यतः ग्रामीण भागातील, आर्थिकदृष्ट्या मागास, हुशार आणि गरजू पण उच्च शिक्षण घेण्यास असमर्थ विद्यार्थ्यांसाठी होती. या योजनेमुळे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण सुलभ आणि उपलब्ध होते.

भाऊरावांची त्याग व समर्पण वृत्ती आपल्याला माहित आहेच पण त्यांच्या संपूर्ण कुटुंबानेच जणू समाजसेवेचा वसा घेतला. वसतिगृहाचा खर्च भागवण्यासाठी त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी आपला मंगळसूत्रही विकला होता. वंचित आणि पारंपरिक पार्श्वभूमीतून आल्या तरी त्यांनी वेगवेगळ्या जातींच्या मुलांची जणू स्वतःच्या मुलांसारखी काळजी घेतली.

कर्मवीर भाऊराव पाटील हे एक दूरदर्शी शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होते, ज्यांच्या कार्याने भारताच्या इतिहासावर कधीही पुसली न जाणारी छाप सोडली आहे. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रात शिक्षणाची व्यापक क्रांती घडली आणि हजारो कुटुंबांचे जीवन बदलले. आजही त्यांची शिकवण आणि आदर्श शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारकांना प्रेरणा देत आहेत. त्यांच्या अतुलनीय कार्यास नमन !

आणखी वाचा :

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button