श्रद्धा ढवण: “परंपरेला तडा देत यशाचा नवा अध्याय लिहिणारी कृषीकन्या”
आजच्या तरुणाईला वारंवार शेती किंवा संबंधित व्यवसायांकडे वळण्याची गरज आहे, असं सांगितलं जातं. मात्र, प्रत्यक्षात या क्षेत्रात आधुनिक प्रयोग, नवं तंत्रज्ञान आणि नवनवीन संधी शोधणाऱ्या तरुणांची संख्या अतिशय अल्प आहे यातच, जेव्हा पुरुषी वर्चस्व असलेल्या व्यवसायात एखादी महिला उतरते, तेव्हा तिला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. बायकांनी फक्त बायकांची कामं करावी, असा पारंपरिक दृष्टिकोन आजही प्रचलित आहे. त्यामुळे, महिला अशा व्यवसायात उतरली की, तिला हिणवलं जातं, आणि कधी कधी तिला “तू नाही करू शकणार” असं म्हणून मानसिक खच्चीकरण केलं जातं.
मात्र त्यांना जर योग्य वेळी योग्य संधी मिळाल्या, तर त्या कोणतंही काम करु शकतात. मग ते खेळ असो, राजकारण असो, सैन्य असो किंवा व्यवसाय असो, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली प्रतिभा आणि यश सिद्ध केलं आहे. आज आपण अशाच एका २४ वर्षीय कृषीकन्या बद्दल चर्चा करणार आहोत जिने आपल्या प्रचंड मेहनतीच्या बळावर वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी दुमजली गोठा उभारून यशस्वी दुग्धव्यवसाय उभारून तरुणाईसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
ती तरुणी आहे अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील पारनेर तालक्यातील निघोज या गावाची रहिवासी श्रद्धा ढवण. श्रद्धाने आपले जीवन संघर्षाच्या बळावर यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेलं आहे. भौतिकशास्त्रात एम. एस. सी. शिक्षण घेतलेल्या श्रद्धा तायक्वांडो खेळाडू म्हणूनही प्रसिद्ध आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रद्धाची लहानपणापासूनच म्हशींच्या व्यापारात घेतलेली मेहनत आणि त्याचा परिणाम तिच्या भविष्यावर झाला.
व्यवसायाची सुरुवात
शेतकरी कुटुंबातील श्रद्धाच्या वडिलांचा म्हशी खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्यामुळे घरी म्हशी आणल्या जायच्या. कधी चार-पाच म्हशी घरी असायच्या तर कधी एकही नसायची. घरची परिस्थितीही हलाखीची होती. वडील अपंग, भावंडं लहान म्हणून घरात जबाबदार व्यक्ती श्रद्धाच होती.
लहानपणापासूनच या वातावरणात वाढलेली श्रद्धा जसजशी मोठी होत गेली तसतसे आपल्या वडिलांकडून आता काम नाही, त्यांना आर्थिक हातभार लावला पाहिजे, या जाणिवेतून वयाच्या अकराव्या वर्षापासून तीही हे काम शिकू लागली. मुळातच अतिशय बुद्धिमान आणि मेहनती असलेल्या श्रद्धाने पुढे कॉलेज ला गेल्यापासून आपल्या भावाच्या मदतीने मोठ्या धडाडीने दोन म्हशी घेऊन पशुपालन आणि दुग्धव्यवसायाचा श्रीगणेशा केला.
प्रगती आणि विस्तार:
सुरुवातीला दोन म्हशींनी सुरूवात केली खरी, मात्र खरा प्रवास तर आता सुरु झाला होता. घर सांभाळण्यासाठी किंवा शिक्षणासाठी ती घर सोडून शहरात गेली नाही, तर गावातच बीएससी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. ती स्वतःच्या हाताने म्हशींचं दूध काढायची आणि मोटार सायकलवर बसून स्वतः दूध विकायला जायची. हा व्यवसाय श्रद्धाने नियोजनपूर्वक सांभाळला. व्यवसायात नफा मिळायला लागल्यावर तेच पैसे गुंतवून तिने व्यवसाय वाढण्यावर भर दिला. प्रसंगी कर्ज काढून तिनं उत्पादन कसं वाढेल, दुधाची गुणवत्ता कशी सुधारेल याकडे लक्ष दिलं. त्यासाठी म्हशींना कोणतं खाद्य दिलं गेलं पाहिजे याचा तिने नीट अभ्यास केला. शेण काढण्यापासून ते दूध काढणं, दूध घालणं, गोठा साफ करणं ही सगळी कामं तिने स्वतः केली. मात्र, जसजशी म्हशींची संख्या वाढत गेली, तसतसं कामगार ठेवण्याची गरज भासू लागली. आजच्या घडीला, श्रद्धाकडे तब्बल ८० म्हशी आणि तेवढी क्षमता असणारा दोन मजली गोठा आहे.
जोडव्यवसायाचा श्रीगणेशा
व्यवसाय करत असताना, काही वर्षांनंतर श्रद्धाने गोठ्यावर विविध प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली. गोठ्यातील मलमूत्र, शेण, आणि वाया जाणारे पाणी यांचा सखोल अभ्यास करून तिने शून्य कचरा व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केला. यासाठी तिने तज्ज्ञांच्या मदतीने बायोगॅस प्रकल्प उभारला, ज्यामध्ये शेण आणि मलमूत्राचा वापर केला गेला. या प्रकल्पातून पुढे बायोगॅसचे रूपांतरण करून वीज निर्मितीही केली गेली.
घरातील स्वयंपाकाचा गॅस, गोठ्यातील वीज आणि बोअरवेल, विहिरी, तसेच बायोगॅससाठी लागणाऱ्या दोन मोटारींसाठी लागणाऱ्या संपूर्ण वीजेचा खर्च, म्हणजेच जवळपास ८ ते १० हजार रुपये या प्रकल्पामुळे वाचले. याशिवाय, बायोगॅसच्या प्रक्रियेमुळे शेणातून निघणारा मिथेन गॅस जाळला जातो, जो पर्यावरणासाठी हानिकारक असतो. परिणामी, पर्यावरणावर होणारे दुष्परिणामही कमी झाले.
बायोगॅस प्रकल्पातून बाहेर पडणारी स्लरी शेतकऱ्यांनी वापरण्यास सुरुवात केली आहे. स्लरीमध्ये नायट्रोजनचे प्रमाण अधिक असल्यामुळे ती सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीसाठी उपयुक्त आहे. ऑरगॅनिक कार्बन वाढविण्यासाठीही स्लरीचा वापर केला जातो. साधारणपणे ५ ते १० रुपये प्रति लिटरने ही स्लरी विकली जाते, ज्यामुळे या प्रकल्पातूनही उत्पन्न मिळू लागले आहे.
याशिवाय, श्रद्धाने ‘गांडूळ खत प्रकल्प’ आणि जिवाणू जैविक खत प्रकल्प’ही सुरू केले आहेत. बायोगॅस प्रकल्पासाठी वापरात येणाऱ्या शेणाव्यतिरिक्त उरलेले शेण या प्रकल्पांत कुजवले जाते आणि त्याचा योग्य वापर केला जातो. या उपक्रमांमुळे श्रद्धाने गोठ्यावर शाश्वत आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापन पद्धती निर्माण केली आहे.
तरुणांसाठी ‘श्रद्धा फार्म’ प्रशिक्षण केंद्राची उभारणी
आपल्या अनुभवाच्या बळावर मिळवलेले ज्ञान श्रद्धाने स्वतःपर्यंत मर्यादित न ठेवता पशुपालन आणि दुग्धव्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली. खरंतर श्रद्धाचे व्यवसायातील यश पाहून अनेकांना प्रेरणा मिळू शकते. तिच्या यशाचा अनुभव पाहून एखाद्याला म्हशीपालन व्यवसाय, दुग्धव्यवसाय सुरू करण्याची इच्छा होऊ शकते किंवा ‘जर एक मुलगी हे करू शकते, तर मी का नाही?’ असा विचार करायला लावू शकतो. पण या यशामागील खडतर प्रवास, सुरुवातीच्या अडचणी आणि संघर्ष यांचे महत्व समजून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच श्रद्धाच्या प्रशिक्षण केंद्रात तरुणांना अधिक प्राधान्य दिले जाते, ज्यामुळे त्यांना या प्रवासाची खरी जाणीव होऊ शकेल.
शून्य कचरा व्यवस्थापन पद्धतीसह, श्रद्धाच्या प्रशिक्षण केंद्रात बायोगॅसनिर्मिती, बायोवीजनिर्मिती, मुरघास, जीवाणू जैविक खत, गांडूळ खत, आणि गोमूत्रापासून बनविण्यात येणारी स्लरी यांसारख्या विविध प्रकल्पांचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षणार्थी ‘श्रद्धा फार्म’मधील कामकाजाची पद्धत समजून घेतात आणि त्यांना या प्रकल्पांद्वारे कशा प्रकारे शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने उत्पन्न मिळवू शकतो याची जाणीव होते. या विश्वासाने प्रशिक्षणार्थी केंद्रातून बाहेर पडतात आणि त्यांच्या यशाचा पाया घट्ट होत जातो.
एका म्ह्शीपासून सुरु झालेला हा व्यवसाय आता प्रचंड वाढला आहे. श्रद्धा त्या हजारो लाखो तरुणींसाठी प्रेरणास्त्रोत आहे. सोबतच कृषी क्षेत्रात “श्रद्धा फार्म” सध्याच्या घडीला खूप गाजलेलं नाव आहे. एक दोन म्हशींपासून सुरु झालेला हा व्यवसाय महिन्याला ७ ते ८ लाख श्रद्धाला मिळवून देतो.
शेती आणि पशुपालन हे क्षेत्र प्रचंड शारीरिक श्रम आणि कष्टांची मागणी करणारं क्षेत्र आहे, म्हणूनच अनेकजण या व्यवसायाकडे वळायला कचरतात. याचाच परिणाम म्हणून, शेतीला तरुणाईकडून कमी महत्त्व दिले जाते आणि काही लोकांना वाटते की, हा व्यवसाय फायदेशीर नाही. पण हा एक गैरसमज आहे. सध्याच्या काळात, तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती अधिक सुलभ आणि परिणामकारक होऊ शकते. मात्र, शेतीतून उत्पन्नाची शाश्वतता कमी असल्याने शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायांचाही विचार व्यावसायिक दृष्टिकोनातून करायला हवा.
पशुपालन हा एक दीर्घकालीन चालणारा व्यवसाय आहे. शेतकऱ्यांवर कितीही संकटे आली, तरी पशुपालन आणि शेतीपूरक इतर व्यवसाय शेतकऱ्यांना तारून नेऊ शकतात. त्यामुळे स्वतःचं करिअर घडवायचं असेल, स्वतःचा पैसा उभा करायचा असेल, तर केवळ मुलांनीच नव्हे, तर मुलींनीही या क्षेत्रात निसंकोचपणे येण्याची आवश्यकता आहे.
मित्रांनो, श्रद्धासाठी डेअरी फार्मचं काम करणं अगदीच सोपं नव्हतं, कारण तिला आपल्या मित्रमैत्रिणींच्या टोमण्यांना सामोरं जावं लागलं. गावातल्या लोकं श्रद्धाच्या कामावरून वेगवेगळे टोमणे मारत असत, पण श्रद्धाने त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती, त्यामुळे श्रद्धाने डेअरी फार्मला यशस्वी व्यवसाय बनवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली.
तिच्या कार्याची दखल घेत तिला मागील वर्षी ‘एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’ बारामती येथे जागतिक महिला दिनानिमित्त ‘शारदा सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
श्रद्धा त्या हजारो, लाखो तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहे जे स्वतःच्या परिस्थितीला दोष देत काहीतरी करण्याची उमेद हारून बसलेत आणि तिचं कार्य त्या हजारो लोकांना दिलेली चपराक सुद्धा; जे म्हणतात, मुलगी म्हणजे परक्याचं धन, मुलगी म्हणजे काळजाला घोर. पण या विचारांना तडा देत, घरच्या व्यवसायासाठी लहानपणापासूनच झटणारी श्रद्धा आज आपल्या वडिलांचा खंबीर आधार बनली आहे. मुलगी म्हणजे बापाचा अभिमान, मुलगी म्हणजे बापाचा खरा आधार, हे तिने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवलं आहे.
आणखी वाचा
- “रंकाचा राजा’’ संघर्षातून उभारले यशस्वी साम्राज्य, लॅरी एलिसन यांचा प्रेरणादायी प्रवास
- भारताला अंतराळात घेऊन जाणारे शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. विक्रम साराभाई…
- कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती: