दिनविशेषप्रेरणादायी

भारताचा इलोन मस्क: भाविश अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास | Bhavish Aggarwal: The Inspiring Story of Ola Founder

भाविश अग्रवाल यांचा जन्म 28 ऑगस्ट 1985 रोजी पंजाबमधील लुधियाना येथे झाला. बालपणापासूनच ते अतिशय बुद्धिमान आणि मेहनती होते. त्यांचे आई वडील हे दोघेही पेशाने डॉक्टर आहेत. वडील हे ऑर्थोपेडिक सर्जन तर आई ह्या पॅथोलॉजिस्ट आहेत. आयआयटी मुंबई येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी. टेक. पूर्ण केल्यानंतर भाविश यांनी  2007 मध्ये मायक्रोसॉफ्ट रिसर्च इंडिया येथे रिसर्च इंटर्न म्हणून आपल्या कॉर्पोरेट प्रवासाची सुरुवात केली. येथे त्यांनी टेक्नॉलॉजीवर आधारित विविध प्रकल्पांमध्ये काम केले. 

मायक्रोसॉफ्ट रिसर्चमध्ये ते विविध टेक्नॉलॉजीवर संशोधन करत होते आणि या शोधाच्या प्रक्रियेतच त्यांना दोन पेटंट्स मिळाले, परंतु 9 ते 5 च्या सुरक्षित नोकरीत त्यांना समाधान मिळत नव्हतं. त्यांच्या मनात स्वतःच्या व्यवसायाची तळमळ निर्माण झाली होती. उद्योजक होण्याची त्यांची तीव्र इच्छा होती, पण सुरक्षित नोकरीमुळे ते अडकले होते. 

त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे 2008 मध्ये मायक्रोसॉफ्टने त्यांना सहाय्यक संशोधक म्हणून नियुक्त केले. दोन वर्षांहून अधिक काळ मायक्रोसॉफ्टमध्ये काम करताना भाविशला एक उद्योजक म्हणून काहीतरी नवीन करण्याची ओढ लागली होती.

मनात कसा आला ‘ओला’ सुरु करण्याचा विचार?

भाविश अग्रवाल  सांगतात की ओला (Ola) ची सुरुवात त्यांच्या एका प्रवासाच्या वैयक्तिक वाईट अनुभवातून झाली. एकदा त्यांनी बेंगळुरूहून बंदीपूरला जाण्यासाठी एक कार बुक केली होती. मात्र, त्या प्रवासाचा अनुभव खूपच निराशाजनक होता. प्रवासाच्या दरम्यान अर्ध्या रस्त्यातच ड्रायव्हरने अतिरिक्त पैसे मागायला सुरुवात केली, शिवाय त्याचं वागणं आणि बोलणं अत्यंत उद्धट होतं. या गैरवर्तणुकीमुळे त्रासून भाविश यांना रस्त्यातच गाडी सोडावी लागली आणि उर्वरित प्रवास बसने करावा लागला.

बसमधून प्रवास करताना भाविश यांच्या मनात वारंवार विचार येत होता की, अशा वाईट सेवेमुळे प्रवाशांचे  किती हाल होत असतील. त्यांना जाणवलं की त्यांच्या सारखे अनेक लोक असतील, ज्यांना दर्जेदार कॅब सेवा मिळत नाहीये. आणि त्याच वेळी त्यांच्या मनात एक कल्पना आली की, एक आपण अशी सेवा सुरू करावी जी लोकांना गुणवत्तापूर्ण, विश्वासार्ह आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा देईल.

ओलाची सुरुवात आणि सुरुवातीचा संघर्ष

कल्पकता आणि कौशल्य यांचा व्यवस्थित समन्वय साधला, तर नवनिर्मितीचा चमत्कार घडतोच! भाविश अग्रवाल यांनी हेच सिद्ध करून दाखवलं आहे. त्यांनी आपल्या दूरदृष्टी आणि धडपडीच्या जोरावर ओला कॅब्सची कल्पना प्रत्यक्षात आणली. व्यवसायात येणाऱ्या अडथळ्यांना त्यांनी संधीमध्ये बदललं आणि आपल्या जिद्दीने एक नवीन यशस्वी प्रवासाला सुरुवात केली.

कॅब सेवा क्षेत्रातील सर्व कमतरता समजून घेतल्यानंतर, भाविश यांनी उत्तम ग्राहकांना उत्तम अनुभव आणि परवडणाऱ्या किमतींसह एक कॅब एग्रीगेटर कंपनी सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी जोधपूरमधील आणखी एक आयआयटीयन मित्र अंकित भाटी यांना सोबत घेतले. 3 डिसेंबर 2010 रोजी मुंबईत त्यांनी एकत्रितपणे ‘ओलाट्रिप्स डॉट कॉम’ वेबसाइट लॉन्च केली, ज्यामध्ये ग्राहक बाह्य प्रवासासाठी कार बुक करू शकत होते.

सुरुवातीला, भाविश आणि अंकित यांच्याकडे या कल्पनेत गुंतवणूक करण्यासाठी फारशी आर्थिक क्षमता नव्हती आणि कोणत्याही गुंतवणूकदाराकडून आधारही मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या बचतीमधूनच ऑनलाइन ऍप्लिकेशन विकसित करण्यास सुरुवात केली. जून 2012 मध्ये, Olacabs ने एक मोबाईल ॲप लाँच केले. ओला ऍप लाँच झाल्यानंतर त्यांना ‘टायगर ग्लोबल मॅनेजमेंट’ कडून 5 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक मिळाली, तसेच अनुपम मित्तल आणि स्नॅपडीलचे कुणाल बहल यांच्याकडूनही निधी उभारला. सुरुवातीच्या वर्षांत, कॅब बुकिंग फर्मचे वापरकर्ते फोन कॉलद्वारे कॅब बुक करत होते. नंतर ॲप आल्यानंतर त्याचा वापर वाढण्यास सुरुवात झाली.

पण प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता, भाविश अग्रवाल यांना भारतीय बाजारपेठेत ओला सादर करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एकदा नाही, तर प्रत्येक वेळी जेव्हा त्यांनी काहीतरी नवीन आणले किंवा नवीन बाजारपेठेकडे पाऊल टाकले, तेव्हा त्यांना संघर्ष करावा लागला.

प्रारंभीच्या काळात, रेडिओ ट्रॅफिक सर्व्हिसेस आणि फास्टट्रॅकसारख्या स्थानिक मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणे ओलासाठी अवघड होते, परंतु यामुळे भाविश थांबले नाहीत. या अडचणींनी त्यांना वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास आणि अनोख्या, पण समस्येचे निराकरण करणाऱ्या उपायांकडे पाहण्यास प्रवृत्त केले. याच वेळी ओलाने ऑल इंडिया परमिट असलेल्या ड्रायव्हर्सना कामावर घेण्यास सुरुवात केली आणि इंटरसिटी प्रवास सुविधा सुरू केली.

ओलाचा यशस्वी प्रवास

भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वात ओला आज भारतातील एक अग्रगण्य स्टार्टअप म्हणून उभी राहिली आहे. त्यांनी स्वतः नवीन कार विकत न घेता ड्रायव्हर्सना जोडण्यावर भर दिला, ज्यामुळे अनेक ड्रायव्हर्सना रोजगार मिळाला. त्यांनी ओला सेवेला एका अ‍ॅपद्वारे इंटरनेटशी जोडले, ज्यामुळे लोकांना राईड बुकिंगची सुविधा मिळाली. भाविश यांनी काही प्रसंगी स्वतः ओला ड्रायव्हर बनूनही सेवा दिली आहे.

ओला कॅब सर्व्हिसची खासियत म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. हे अ‍ॅप लोकांना त्यांच्या राईडसाठी सर्व आवश्यक माहिती देते, ज्यात रेटिंग्स, रिव्ह्यूज आणि क्वालिटी चेकिंगसाठी सुविधा आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवरूनच सर्व काही नियंत्रित करता येते.

भाविश यांची दूरदृष्टी आणि सेवा गुणवत्ता यामुळे ओलाचा व्यवसाय झपाट्याने वाढला. त्यांनी कमी दरात उत्कृष्ट सेवा देण्याचा विचार केला आणि 2013-14 मध्ये ओलाचा टर्नओव्हर सुमारे 418.25 कोटी रुपयांचा होता. आज, 75 हून अधिक शहरांमध्ये 1.75 लाखांपेक्षा अधिक लोक रोज ओला वापरतात. भाविश यांच्याकडे ओलामध्ये 6.7% हिस्सेदारी आहे, ज्यामुळे त्यांची नेट वर्थ महत्त्वाची ठरते. ओलाचे सध्याचे मूल्यांकन $4.8 बिलियन डॉलर्सपेक्षा (40000 कोटी रुपये) जास्त आहे, जे तिच्या यशाची साक्ष देते.

2017 मध्ये, भाविश यांनी ओला इलेक्ट्रिकची स्थापना केली, जी इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि बाईक्स तयार करते. या व्यवसायाची वाढही लक्षणीय आहे.

ऑक्टोबर 2023 मध्ये, ओला इलेक्ट्रिकने टेमासेक आणि भारतीय स्टेट बँकेकडून 3,200 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली. यामुळे त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील विस्ताराला गती मिळाली. भाविश अग्रवाल यांनी दोन कंपन्या उभारल्या, ज्यांचे मूल्यांकन 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे आणि यामुळे त्यांच्या दूरदृष्टीची आणि नेतृत्वाच्या कौशल्याची झलक दिसते.

भारतातील पहिले स्वदेशी  AI-प्लॅटफॉर्मकृत्रिम’ केलं लॉन्च 

भाविश अग्रवाल यांनी 15 डिसेंबर 2023 रोजी भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) प्लॅटफॉर्म ‘कृत्रिम’ लाँच केले. हे प्लॅटफॉर्म सुमारे 22 भारतीय भाषा समजू शकते आणि सध्या ओपन एआयच्या चॅट जीपीटी तसेच गुगलच्या जेमिनीशी स्पर्धा करत आहे .

लाँचिंग कार्यक्रमादरम्यान, अग्रवाल यांनी AI चॅटबॉटचे प्रात्यक्षिक दाखवले, जो चॅट जीपीटी आणि जेमिनीसारखचं प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम आहे. हा चॅटबॉट कवितांपासून कथांपर्यंत विविध प्रकारची सामग्री तयार करू शकतो. ‘कृत्रिम’ हे प्लॅटफॉर्म 22 भारतीय भाषा समजू शकते आणि 10 भाषांमध्ये मजकूर तयार करण्याची क्षमता ठेवते. कंपनीच्या मते, हे भारताचे पहिले पूर्ण-स्टॅक AI आहे, जे स्थानिक भारतीय ज्ञान, भाषा आणि डेटावर आधारित आहे. अग्रवाल यांनी हे साधन सर्वांसाठी उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.

मानसन्मान आणि पुरस्कार  

भाविश हे भारतातील सर्वात तरुण आणि श्रीमंत उद्योजकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. कठोर कॉर्पोरेट जीवनशैलीच्या पलीकडे, त्यांना सायकलिंग, स्क्वॅश खेळणे, आणि फोटोग्राफीची आवड आहे. ते एक लोकप्रिय फोटोब्लॉग देखील चालवतात, जिथे ते त्यांच्या छायाचित्रांद्वारे स्वतःचे विचार मांडतात.

2013 मध्ये भाविश आणि Ola ला दक्षिण आशियाच्या mBillionth पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हा पुरुस्कार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्कृष्टता दर्शवणाऱ्या स्टार्टअप्सना दिला जातो, त्याच वर्षी, Internet and Mobile Association of India (IAMAI) द्वारे Ola ला वर्षातील सर्वोत्कृष्ट स्टार्टअप म्हणून गौरवण्यात आले. 2017 मध्ये, द इकॉनॉमिक टाइम्सने भाविश अग्रवाल यांना त्यांच्या नेतृत्वाच्या कौशल्यासाठी ET सर्वोत्कृष्ट आणि तेजस्वी पुरस्काराने सन्मानित केले.

या व्यतिरिक्त भाविश उत्तम गुंतवणूकदार, व्याख्याते आणि उत्तम छायाचित्रकार सुद्धा आहेत. ते नवीन उद्योजकांना नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यांनी बऱ्याच नवीन स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. ज्यात ओव्हा, कार्किनोस ऑफ बिझनेस, सुपरसूट, टॉर्क मोटर्स, हॅशलर्न अशी काही उदाहरणं देता येतील. उद्योगात  आणि समाजसेवेतील त्यांच्या यशाव्यतिरिक्त, भाविश एक वक्ते आणि लेखक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी अनेक मंचांवर आपल्या विचारांचे आदानप्रदान केले आहे आणि उद्योजकतेबद्दल अगणित लेख लिहिले आहेत.

आज, भाविश आपल्या नवीन उपक्रमाच्या दिशेने लक्ष केंद्रित करत आहेत. आपल्या साहसी मनासह, त्यांनी अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान बदल आणि वाढत्या ऊर्जेच्या गरजा या जगासमोरील सर्वांत महत्त्वाच्या आव्हानांपैकी आहेत आणि भाविश या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय विकसित करण्याबद्दल वचनबद्ध आहेत. भाविश म्हणतात, “मला विश्वास आहे की अक्षयऊर्जा ही भविष्याची गरज आहे आणि या क्षेत्रात भरीव योगदान देणे हे माझे ध्येय आहे. 

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button