बाजी पलटली! हो बाजी पलटतच आहे. खरंतर सर्व भारतीयांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. बातमी अशी आहे की आता भारतीय देत आहेत अमेरिकेतील लोकांना रोजगार. जवळपास ४. २५ लाख अमेरिकन लोकांना, अमेरिकेतील भारतीय कंपन्यांनी रोजगार दिला. आता तुम्ही म्हणाल भारताला याचा काय फायदा? पण जरा निरखून पाहिलं, तर लक्षात येईल भारतातून होणारी निर्यात, आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत भारताचे वाढणारे प्राबल्य आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा वाढत जाणारा दबदबा.
असे म्हंटले जाते २१ वे शतक हे भारताचे आहे. भारताने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात घेतलेली झेप, स्वदेशीचा मोठ्या प्रमाणात केलेला स्वीकार आणि नवउद्योजकांना भारताने दिलेली चालना या सर्व धोरणांमुळे भारतात आणि भारताबाहेर, भारतीयांची झेप वाढलेली आहे. आजपर्यंत अनेक कारणांसाठी अनेक देशांवर अवलंबून असलेल्या भारताने आता मात्र धाडसी निर्णय घ्यायला सुरवात केली आहे.
सध्या भारतीय कंपन्या वेगवेगळ्या देशांमध्ये आपली गुंतवणूक वाढवताना आपल्याला दिसत आहेत आणि भारत सरकार त्यांना शक्य ते सर्व सहकार्य करत आहेत. इतकेच नाही नुकतेच भारतात सुरु झालेले ॲपलचे स्टोअर. याआधीच ॲपलने प्रयत्न सुरु केले होते पण भारताच्या बदललेल्या पॉलिसीज ज्यामध्ये भारता बाहेरून भारतात येणाऱ्या कंपन्यांना त्याचे प्रॉडक्टची काही प्रमाणात निर्मिती भारतात करणे बंधनकारक आहे. या पॉलिसीमळे भारतात औद्योगिकरण वेगाने वाढत आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते आहे. भारतीय व्यावसायिकांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे.
सध्या जगभर अनेक कंपन्या नोकर कपात करताना दिसत आहेत. अशातच अमेरिकेतील भारतीय कंपन्या मात्र मोठ्या प्रमाणात नोकर भरती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत जवळपास ४० अब्ज डॉलर्स इतकी मोठी गुंतवणूकही केली आहे. यामध्ये सर्वाधिक गुंतवणुक ही टेक्सास प्रातांत झाली आहे जवळपास ९.८ अरब डॉलर्सची गुंतवणूक टेक्सास या राज्यात केली आहे. या खालोखाल जॉर्जिया, न्यूजर्सी, मॅसेच्युएटस्, केंटकी, कॅलिफोर्निया, मेरीलँड, फ्लोरिडा आणि इंडियाना या राज्यांचा क्रमांक लागतो. ८५% कंपन्या येत्या काळात अमेरिकेत आणखी गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत. ८३%कंपन्या अमेरिकेत कर्मचाऱ्यांची संख्या आणखी वाढवणार आहेत. या सगळ्यामुळे भविष्यात अमेरिकन बाजारपेठेत भारतीय कंपन्यांचे अधिकार वाढू शकतात. अमेरिकन बाजारपेठांचा लगाम भारतीयांच्या हातात येऊ शकतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भारतीयांना आणि अमेरिकास्थित भारतीयांना याचा खूप फायदा होऊ शकतो.
भारतातून एक्स्पोर्ट होणाऱ्या वस्तू आणि पदार्थांना आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जास्त प्राधान्य मिळेल. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रांमध्ये वाढती मागणी पाहून इतर लहान राष्ट्रांमध्ये भारतीय वस्तूंची मागणी अजून वाढू शकते. भारतात तयार होणाऱ्या कच्च्या मालाचे उत्त्पन्न नक्कीच वाढू शकते. त्यासोबतच तंत्रज्ञानाची देवाणघेवाणही मोठ्या प्रमाणात होऊ शकते.
एका अहवालानुसार १६३ मोठ्या कंपन्यांनी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत या कंपन्यांनी सीएसआरवर १८.५ कोटी डॉलर्स खर्च केले आहेत. अमेरिकेतील विविध संशोधन आणि विकास प्रकल्पांवरही कंपन्यांनी १ अब्ज डॉलरचा निधी दिला आहे. या सगळ्यामुळे अमेरिकेशी भारताचे संबंध अजून जास्त दृढ होणार आहेत. अनेक भारतीय नागरिक अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात IT क्षेत्रात काम करत आहेत त्यांसाठी आंतरराष्ट्रीय संबंध अजून मजबूत होणे फायद्याचे ठरणार आहेत.
एका आकडेवारीनुसार टेक्सास २०,९०६, न्यूयॉर्क १९,१६२, न्यूजर्सी १७,७१३, वॉशिंग्टन १४,५२५, फ्लोरिडा १४,४१८, कॅलिफोर्निया १४,३३४, जॉर्जिया १३,९४५, ओहायो १२,१८८, मोंटाना ९,६०३, इलिनॉएस ८,४५४ इतक्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती झालेली आढळते. अमेरिकेतील भारतीय राजदूत तरनजित सिंह संधू यांनी वॉशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमात या अहवालाचे प्रकाशन केले. ज्याला भारतीय कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारताचे हे बदलते चित्र अंतर्गत भारतीय व्यापारासाठी प्रत्यक्षपणे प्रभाव टाकणारे नसले तरी अप्रत्यक्षपणे भारतीय व्यापाराला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बळ देणारे नक्कीच आहे. भारताचा विकसीत राष्ट्राच्या यादीत समावेश होण्याच्या प्रवासाला यामुळे चालना नक्कीच मिळणार आहे. म्हणूनच सध्याच्या या वातावरणात हे आवर्जून म्हणावेसे वाटते बाजी पलटतीये.