बिझनेस मध्ये दिखावा नको, तर प्लानिंग हवी
काही दिवसांपूर्वी आमच्या ऑफीसमध्ये व्यवसाय मार्गदर्शन घेण्यासाठी दोन शेतकरी आले होते, एक म्हणजे अनिलराव ते एक मोठे शेतकरी आहेत. तसेच त्यांच्याकडे मळणीयंत्र ट्रॅक्टर व अर्थमुव्हिंग वाहने म्हणजे जेसीबी आहेत. त्यांचे वय अंदाजे ५२ वर्ष आहे आणि गेली ३० वर्षे ते शेती व्यवसाय करतात. परंतु आज त्यांच्या खात्यावर एक रुपयाची सुध्दा बचत होत नाही. उलट त्यांच्या अंगावर जवळजवळ १० ते १२ लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याबाबत विश्लेषण केल्यावर मला असा निष्कर्ष मिळाला की, ते एकप्रकारे पांढरा हत्ती पाळताहेत. म्हणजे त्यांच्याकडील मोठी शेतजमीन, साधने, उपकरणे, यंत्रसामुग्री, वाहने अनेक आहेत परंतु त्यातून त्यांचा फायदाच निघत नाही, फक्त तोटेच होत आहेत. म्हणजे जे काही आहे ते सर्व दाखवण्यापुरतेच आहे.
तर दुसरा कॉल नितीन नावाच्या शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याचा होता. त्यांचे वय ४४ वर्ष आहे. त्यांच्याजवळ केवळ ३ एकरच शेतजमीन आहे, परंतु त्यांच्याजवळ स्वतःची कार आहे, तसेच मुलगा विदेशात चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. गेली १० वर्षे ते व्यवसाय करीत आहेत. यादोन्ही उदाहरणांचे निरीक्षण केल्यावर मला आश्चर्य वाटले. एकीकडे ज्याच्याजवळ मोठी शेतजमीन, अद्ययावत उपकरणे व यंत्रसामुग्री, वाहने आहेत तरीसुध्दा एक रुपयाही नफा नाही, उलट १०-१२ लाखांचे कर्ज आहे. तर दुसरीकडे ३-४ एकरांचीच शेतजमीन असलेला शेतकरी आहे, जो शेती व शेतीपूरक व्यवसाय करतो, परंतु त्यांच्याकडे चांगले उत्पन्न, संपत्ती, वैभव आहे आणि ते ही डोक्यावर एका रुपयाचेही कर्ज नसताना. या दोन्ही उदाहरणांमध्ये प्रचंड विरोधाभास दिसून येतो.
उत्पादकतेचे अर्थशास्त्र :
तुमचे शोरूम, दुकान, व्यवसाय, कारखाना किंवा शेतजमीन कितीही मोठी असली तरीही त्यातून तुम्हाला किती फायदा नफा मिळतो याला खरा अर्थ असतो. यालाच म्हणतात उत्पादकतेचे अर्थशास्त्र. तुमचे कुटुंब परिवार किती मोठा आहे हे महत्वाचे नाही, तर त्यातील किती लोक उत्पादनक्षम आहेत ते महत्वाचे आहे. तुमच्याकडे किती एकर जमीन आहे हे महत्वाचे नाही, तर त्यापैकी किती जमीन तुम्हाला उत्पन्न मिळवून देते याला महत्व आहे. म्हणजे तुमच्याकडे कितीही संसाधने म्हणजे मोठी जमीन, भांडवल आणि मनुष्यबळ इत्यादी गोष्टी असतील, तर त्या उत्पन्न देणाऱ्या असाव्यात. नाहीतर पांढऱ्या हत्तीसारख्या केवळ शोभेसाठी असतील तर तुम्ही कंगाल झाल्यातच जमा असे समजा.
उत्पादकता लेखापरीक्षण (Productivity Audit) :
ज्या ऑडिटमध्ये, मोजमापात्मक व तुलनात्मक मानके/मापदंड आणि वास्तविक घटकांची कार्यक्षमता यांची छाननी आणि मूल्यांकन केले जाते त्यास उत्पादकता लेखापरीक्षण (Productivity Audit) म्हणतात. म्हणजे आपल्या शेतीत किंवा व्यवसायात आपल्याकडील मनुष्यबळ, भांडवल, साहित्य, संसाधने, यंत्रसामुग्री, इ. मधून किती उत्पन्न मिळाले याचे मूल्यांकन आणि विश्लेषणात्मक अभ्यास म्हणजे उत्पादकता लेखापरीक्षण. यासाठी अनेक निकष पडताळून पाहावे लागतात.
i) Personal Audit:
शेती म्हणा किंवा इतर व्यवसाय. त्यांचे लीडर म्हणून तुम्ही स्वतःचे मूल्यांकन केले पाहिजे. तुम्ही शेतात किंवा व्यवसायात किती काम करता व शेती/उद्योगातील उत्पादनक्षमतेत किती आणि कसे योगदान देता हे पाहणे म्हणजेच स्वतःच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. समजा तुमच्याकडे ३० एकर जमीन आहे, पण खरंच तुम्ही रोज ३० एकर जमिनीकडे जातीने लक्ष देता किंवा काम करता का? की मजुरांवर शेताचे काम सोपवून गावात पुढारीपण करता? एखाद्याने नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला असेल, तर ज्याप्रमाणे नोकरी करताना १२-१२ तास काम करत होता, तसेच स्वतःच्या व्यवसायातही काम करता का ?
ii) Family Member Audit:
तुमचे सर्व कुटुंबीय तुमच्या शेतीत/व्यवसायात काय योगदान देतात? ते कोणते काम किंवा कोणती जबाबदारी हाताळतात याचे मूल्यांकन करावे. नाहीतर असे व्हायला नको की, तुमचा वेळ पोकळ मोठेपणा/पुढारपण गाजवण्यात जातोय; पोरगं तासनतास मोबाईलमध्ये डोकं घालून नाहीतर कुठल्यातरी पक्षाचा युवानेता बनून फिरतोय, बायको महिलामंडळाची अध्यक्ष म्हणून गजाली मारण्यात आणि चुगल्या करण्यात वेळ वाया घालवतेय आणि शेतात गुडघाभर तण आहे. तुमचा व्यवसाय असो वा शेती घरातल्या प्रत्येकाने त्यासाठी काम केले पाहिजे, आपापले ठळक योगदान दिले पाहिजे. काम न करणाऱ्या पोरांना कंबरड्यात लाथ घालून हाकलून दिले पाहिजे.
iii) Management Audit:
मॅनेजमेंट ऑडिट म्हणजे तुमच्या व्यवसायात अंतर्भूत व्यवस्थापनाच्या पद्धती आणि धोरणे, संसाधनांचा वापर, कामाचे नियोजन, कर्मचारी आणि संस्थात्मक सुधारणा यांचे मूल्यांकन. मानव संसाधनांचा अधिक चांगल्या उपयोग आणि उपलब्ध भौतिक सुविधांची खात्री करुन घेणे, उद्दिष्ट्ये, धोरण, कार्यपद्धती आणि नियोजनातील कमतरता पडताळणे, कार्यपद्धतीची सुधारित पद्धती सुचविणे. उदा. तुमचा जेसीबी ड्रायव्हर असेल, तर तो जेसीबी किती चांगल्या प्रकारे हॅण्डल करतो याची तपासणी करा. तुमची कार्यपद्धती व त्यांचे काम प्रभावी असायला हवे.
iv) Employee Audit:
आपले कर्मचारी, मजूर आपल्या व्यवसायात/शेतात किती काम करतात आणि ते किती उत्पादनक्षम आहेत हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नाहीतर मालक गावभर फिरतोय आणि मजूर शेतावर टाईमपास करतायत अशी अवस्था नको. असेच चालत राहिले तर कर्ज होणार नाहीतर काय होणार? कोण काम करतो व कोण चुना लावतो याचा तपास करा.
v) Product Audit:
आपली उत्पादने/सेवा किती गुणवत्तापूर्ण आहेत, त्यांना बाजारात किती मागणी आहे आणि त्यांच्या खरेदीसाठी ग्राहक किती उत्सुक आहेत तसेच त्याचे मार्केटिंग कशा प्रकारे केले जात आहेत हे पाहणे महत्त्वपूर्ण आहे. नाहीतर तुम्ही आणि तुमचे कर्मचारी खूप मेहनत घेऊन उत्पादन घेत असाल, परंतु ते दर्जेदार नसेल तर काय फायदा? काय पिकतं यापेक्षा काय विकतं याचा तपास घ्या.
vi) Real Asset Audit:
तुमची जितकी संपत्ती आणि संसाधने आहेत त्याच्या देखभालीसाठी, ती सांभाळण्यासाठी किती खर्च येतो आणि त्यापासून उत्पादन किती मिळते याला रिअल अॅसेट ऑडिट म्हणतात. म्हणजे तुमची १० एकराची जिरायती शेती आहे, ती सांभाळण्यासाठी ५ लाख रुपये खर्च येत असेल आणि त्यांतून १ लाखाचेही उत्पन्न मिळत नसेल तर काय फायदा? यामध्ये अधिक उप्पन्न देणारी, मध्यम उत्पन्न देणारी आणि उत्पन्न न देणारी शेतजमीन, असे तीन गट पडले पाहिजेत.
vii) Machinery Audit:
आपल्या व्यवसायात किंवा शेतीसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री आणि वाहने यांच्या खरेदीवर आणि त्यांच्या देखभालीवर (maintenance) एकूण किती खर्च येतो आणि एकूण किती उत्पन्न मिळते याचे ऑडिट केले पाहिजे.
viii) Working Capital Audit:
शेतकरी किंवा व्यावसायिक भांडवल उभारणीसाठी कर्ज घेतात. बँक त्या कर्जाचे हफ्ते व्याजासहित वसूल करते. शेतकरी त्याच्या शेतीसाठी लागणारी यंत्रसामुग्री, वगैरे विकत घेण्यासाठी कर्ज काढतो, व्यावसायिक त्याच्या व्यवसायात भांडवल उभारणीसाठी कर्ज काढतो. आपण आपले भांडवल कशा प्रकारे वापरतो आणि त्या खेळत्या भांडवलातून आपल्याला कितपत फायदा होतो याचेही ऑडिट केले पाहिजे.
आपण काय करावे?:
वरील प्रत्येक लेखापरीक्षणाच्या विश्लेषणानंतर आपल्या व्यवसायाची/शेतीची उत्पादनक्षमता तपासून घ्यावी. तुम्ही शेती करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर त्यांचे अर्थशास्त्रीय विश्लेषण करा. तुमच्या एकूण शेतीपैकी किती जमीन नफा मिळवून देते किंवा व्यवसायाच्या कोणत्या घटकांमधून उत्पन्न मिळते यांचे विश्लेषण करा. नाहीतर पांढरा हत्ती पाळल्यासारखे करू नका. जे फक्त दिखाव्याप्रमाणे, बिनकामाचे ठरते.
जसा पांढऱ्या हत्तीचा उपयोग युध्द, खेळ, भारवहनासाठी करता येत नसतो. तो केवळ दिखाव्यासाठीच बाळगला जातो आणि हत्ती पाळल्याचा बडेजाव करता येतो, परंतु नुसता दिखावा करून उपयोग नाही. तोट्यातली जर्सी गाय पाळण्यापेक्षा, फायद्यातली शेळी कधीची चांगलीच.
आणखी वाचा
- कंजूषपणामुळे व्यवसायात होतं मोठं नुकसान
- जीभेवर साखर, डोक्यावर बर्फ, मेंदूत आयडिया, हातात काम
- जे तराजू चालवतील, तेच संपत्ती कमवतील
- व्यावसायिकांनी कर्ज कसे हाताळावे
- व्यावसायिकांनी ब्रॅंडिंगचे तंत्र समजून घ्यावे