29 ऑगस्ट – राष्ट्रीय क्रीडा दिन
आपल्या भारत देशाला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा लाभलाय. भारतीय क्रीडा विश्वातील एक प्रेरणादायी आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचं नाव आजही तितक्याच आदराने घेतलं जातं.
देशातीलच नव्हे तर जगातील महान हॉकीपटूंच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 मध्ये उत्तर प्रदेशमधील प्रयागराज म्हणजे आधीच्या इलाहाबाद येथे झाला. मेजर ध्यानचंद यांचे खरे नाव ध्यानसिंग असे होते. मात्र, ते नेहमी रात्री चंद्र प्रकाशात सराव करत असत. त्यामुळे कालांतराने त्यांच्या जवळच्या मित्रांनी ध्यानसिंग यांच्या नावापुढे ‘चंद’ हा शब्द जोडला. तेव्हापासून ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले.
आज 29 ऑगस्ट म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिन. हॉकीचे सार्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा गौरव म्हणून त्यांचा जन्मदिवस दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून संबंध देशभर आजही साजरा केला जातो. या क्रीडा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपतींच्या हस्ते या दिवशी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्काराचे वितरण करण्यात येते. याशिवाय खेळातील आजीवन कामगिरीसाठी ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 2002 पासून देण्यात येतो.
हॉकीच्या मैदानात ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केली आहे. मेजर ध्यानचंद यांचा हॉकी खेळ म्हणजे चेंडू आणि स्टीक यांचा सुंदर मिलाप होता. त्यांच्या कारकीर्दीत भारताने ऑलम्पिक स्पर्धेत सलग तीन वेळा सुवर्ण कामगिरी अनुक्रमे 1928, 1932 आणि 1936 झाली नोंदविली आहे. 1956 साली सरकारने ध्यानचंद यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवित केले.
ध्यानचंद यांनी 1926 ते 1948 दरम्यान 400 हून अधिक सामने खेळले आहेत. यात त्यांनी जवळपास 1000 गोल करण्याचा पराक्रम केला आहे. त्यांनी आपला शेवटचा आंतराष्ट्रीय सामना 1948 साली खेळला. हॉकीच्या मैदानात त्यांनी केलेल्या अभूतपूर्व कामगिरीसाठी त्यांना सन्मानित करण्यासाठी 2012 पासून भारत सरकारने त्यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय क्रीडा विश्वाच्या या महान जादूगाराला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.