बिझनेस प्लॅन कसा तयार करावा?
बिझनेस प्लॅन हा प्रत्येक व्यवसायाचा आत्मा आहे आणि Finance is the blood of organization म्हणजेच पैसा/भांडवल हे संस्थेचे रक्त आहे असे म्हणतात. जसे शरीरात रक्त नसले किंवा त्याचे प्रमाण कमी झाले तर शरीर काम करण्यास असमर्थ ठरते. त्याचप्रमाणे भांडवल/पैसा नसणाऱ्या संस्था सुध्दा कार्य करण्यास असमर्थ ठरतात. म्हणून या पैसारुपी रक्ताचा मुबलक प्रमाणात पुरवठा करण्यासाठी बिझनेस प्लॅन हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे.
बिझनेस प्लॅन हे दोन असतात. एक म्हणजे डीपीआर आणि दुसरा म्हणजे बी.पी. यापैकी जो स्वतःला मार्गदर्शन करणारा भाग असतो, त्याला संपूर्ण प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR (Detailed Project Report) म्हणतात. जो इतर कोणालाही सांगायचा नसतो. ते आपल्या व्यवसायाचे रहस्य असते. त्यातून आपला व्यवसाय चालवण्याची पूर्ण व इत्थंभूत माहिती आपल्याला मिळत असते. हे एक प्रकारचे व्यवसाय मार्गदर्शक असते. त्यानुसार आपल्या व्यवसायातील प्रत्येक पाऊल ठरत असते.
बिझनेस प्लॅन हा स्वतःच बनवला पाहिजे, कारण आपल्या स्वतःइतका तो व्यवसाय कोणीही जाणत नसतो. या बनवलेल्या बिझनेस प्लॅनमध्ये मग सीए, व्यवसाय व्यवस्थापक, आर्थिक सल्लागार यांच्याकडून सुधारणा करुन योग्य ते बदल करावेत. बिझनेस प्लॅन हा व्यवसायाच्या सुरुवातीला बनवला जातो व त्यात वारंवार बदल केले जातात. उदाहरणाद्वारे समजून घ्यायचे असल्यास व्यवसाय हा एक क्रिकेटचा सामना आहे. त्याची वेळ ठरलेली आहे. मात्र सामना चालू झाला की आपण त्याचे धावते समालोचन (Live Commentary) करत/बघत असतो. धावफलक (Score Board) सतत बदलत असतो. हे सर्व बदल सामना चालू असताना त्या त्या वेळीच करायचे असतात. त्याचा आधी फक्त अंदाज लावला जातो व सामना पूर्ण झाल्यावर विश्लेषण (Analysis) केले जाऊ शकते. चालू सामन्यात त्या बदलाची दखल घेणे गरजेचे ठरते. व्यवसायाच्या सुरुवातीला ज्या उद्योजकांनी हा बिझनेस प्लॅन बनवलेला नसतो, त्यांनी आत्ता याक्षणी तो बनवला पाहिजे.
यातील दुसरा भाग म्हणजेच बी.पी. अर्थात आपला बिझनेस प्लॅन, जो आपण आपल्या गुंतवणूकदारांना, भांडवल पुरवठादार व बँकांना सुरवातीच्या टप्प्यात देत असतो व भांडवल मिळण्याची खात्री देण्यासाठी पहिल्या भागातून म्हणजेच संपूर्ण प्रकल्प अहवालामधून सविस्तर महत्त्व पटवून देत असतो. बिझनेस प्लॅनमधून व्यवसायाची गरज, अपेक्षित ग्राहक, व्यवसायात मिळणारा नफा, होणारा खर्च, विक्री व विपणन (Sales & Marketing), काम करणारी यंत्रणा व मनुष्यबळ, या व्यवसायाशी संबंधित सर्वच बाबींचे चित्र स्पष्ट होत असते. आता प्रत्यक्ष बिझनेस प्लॅन बनवण्याची प्रक्रिया पाहू या.
बिझनेस प्लॅनमधील पहिला व दुसरा भाग यापैकी आपल्या सोयीनुसार कोणताही भाग आधी बनवायचा. पण शक्यतो दुसरा भाग आधी बनवल्यास पहिला भाग म्हणजे दुसऱ्या भागातील प्रत्येक मुद्द्याचे सविस्तर वर्णन व अंमलबजावणीचे उपाय लिहले जातात किंवा पहिला भाग आधी बनवला तर दुसरा भाग म्हणजे पहिल्या भागाचा सारांश होय. बिझनेस प्लॅनचे टप्पे –
१. व्यवसायाचे नाव, घोषवाक्य (tagline), संकेतचिन्ह (logo) याचा समावेश व व्यवसायाला साजेशे असे एक चित्र असावे. यामुळे आपल्या व्यवसायाची एक Image/प्रतिमा बिझनेस प्लॅन वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर उभी राहते. त्यामुळे हे बिझनेस प्लॅनचे जसे आपण फर्स्ट इम्प्रेशन म्हणतो तसेच हे सुरुवातीचे दर्शन आहे. यापुढील प्रत्येक टप्प्यात कमीत कमी २ मुद्दे व जास्तीत जास्त ४ मुद्दे लिहावेत.
२. समस्या – कोणताही व्यवसाय म्हणजे वेळ, श्रम आणि पैसा या तीन गोष्टींची बचत आणि एखाद्या समस्येचे उत्तर यातूनच जन्माला येतो. जर समस्या नसतील तर व्यवसाय निर्माण होत नाही. उदा. चेहरा कोरडा/काळा असणे ही समस्या, तर त्यावर लावण्याचे मलम (cream) हा त्यावरचा उपाय झाला. म्हणजे एखाद्या समस्येचे उत्तर देणाऱ्या प्रक्रियेला व्यवसाय म्हणतात.
३. उपाय – समस्या ही जोपर्यंत समस्या आहे, तोपर्यंत तिचे व्यवसायात रुपांतर होत नाही. याउलट समस्येवरचा उपाय शोधून काढणे म्हणजे व्यवसाय होय. त्या समस्येचे कोणते उपाय आपल्या व्यवसायामुळे शोधले जातात. यावर दोन–चार मुद्दे यात समाविष्ट करावेत.
४. अपेक्षित ग्राहकवर्ग – प्रत्येक व्यवसायात (B2B किंवा B2C) ग्राहक असला तरच तो व्यवसाय चालतो. म्हणून आपल्याला आपला ग्राहक ओळखता आला पाहिजे. आपल्या कार्यक्षेत्रानुसार, ग्राहकाच्या खरेदीक्षमतेनुसार व आपल्या विक्री किंमतीनुसार आपला ग्राहक व त्यातून होणारी वर्षभराची अपेक्षित उलाढाल याचे गणित या टप्प्यावर केले जाते. महिलांसाठी सौंदर्यप्रसाधने बनवणाऱ्या उद्योगाचा अपेक्षित ग्राहक वर्ग हा ११-४५ वयाच्या महिला हा असतो.
यात परत दोन उपप्रकार पडतात. आपण ज्या प्रकारची उत्पादने उत्पादित करत असतो, त्या सर्व उत्पादनासाठी उपलब्ध असलेल्या बाजारपेठेतील ग्राहकवर्ग हा पहिला अपेक्षित ग्राहकवर्ग आहे. मात्र हा एकूण मार्केटचा ग्राहकवर्ग असतो. त्या संपूर्ण मार्केटमधील आपल्या स्वतःच्या उत्पादनाचा ग्राहक वर्ग किती? त्यातून मिळणारा आपला मार्केटशेअर (बाजारातील वाटा) किती? व आपला नफा किती? आपली उलाढाल किती? हे यात दर्शविता आले पाहिजे. हे वेगवेगळ्या आलेखाच्या साहाय्याने दाखवता येते.
उरलेल्या मुद्द्याविषयी उद्याच्या लेखात पाहू. काही बिझनेस प्लॅनचे नमुने सुध्दा उदाहरणादाखल देण्यात येतील. तो पर्यंत या मुद्द्यांचा अभ्यास करुन अंमलबजावणी सुरु करता येईल.
- अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती