शेअर बाजारातील करिअर आणि व्यवसाय संधी
भारतामध्ये शेअर बाजार ही संकल्पना युरोपमधून आयात केलेली आहे. इ.स. १८७५ मध्ये याची मुहूर्तमेढ भारताची आर्थिक राजधानी ‘मुंबई’ने रोवली. मुंबई शेअर बाजाराची भव्य इमारत पाहून विश्वास बसणार नाही की, या बाजाराची सुरुवात याच ठिकाणी एका झाडाखाली झाली. जणू एका छोटय़ा रोपाचा हा फोफावलेला वटवृक्ष आहे. झाडाजवळ एक सभागृह बांधण्यात आले. तेथे ‘नेटिव्ह शेअर अॅण्ड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन’ या नावाने ही संस्था नावारूपाला आली. त्यानंतर तब्बल एकशेतीस वर्षांनी मुंबई शेअर बाजाराचे ‘मुंबई शेअर बाजार लिमिटेड’मध्ये रूपांतर झाले. सुरुवातीच्या काळात हे काम फक्त दुपारी बारा ते दोन या वेळात चालत असे. सकाळच्या वेळात खरेदी-विक्रीच्या नोंदी होत असत.
भारत सरकारने १९८९ मध्ये सेबीची स्थापना केली. शेअर बाजाराच्या कार्यपद्धतीवर अंकुश ठेवण्यासाठी १९९२च्या कायद्यान्वये सेबीला अधिकार प्राप्त झाले. भांडवल बाजारात हर्षद मेहतासारखे जे घोटाळे होत होते ते होऊ नयेत म्हणून केंद्रीय अर्थ मंत्रालयाने १९९४ मध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराच्या कामकाजास प्रारंभ केला. यामुळे मुंबई शेअर बाजाराची मक्तेदारी संपुष्टात आली.
१९९५ पासून संगणक या माध्यमातून बोल्ट (बी. एस. ई. ऑन लाईन ट्रेडिंग) या पद्धतीद्वारे सौदे होण्यास सुरुवात झाली. राष्ट्रीय शेअर बाजारातील सौदे नीट (एन. ई. ए. टी.) या पद्धतीद्वारे करण्यास सुरुवात झाली. ४ जानेवारी १९९९ पासून एन. एस. डी. एल. व १५ जुलै १९९९ पासून सी. डी. एस. एल.मध्ये सर्टिफिकेटच्या स्वरूपातील शेअर्सचे डीमॅटमध्ये रूपांतर होण्यास सुरुवात झाली. पूर्वी समभागांची खरेदी-विक्री झाल्यानंतर सर्टिफिकेट रूपात ताबा मिळायला सुमारे तीन महिने लागत असत. याउलट आजच्या संगणक युगात व्यवहार झाल्यावर तिसऱ्या दिवशी समभागांचा ताबा मिळतो. यामुळे घोटाळे होण्यास पायबंद बसलेला आहे. शेअर बाजाराच्या पारंपरिक कार्यपद्धतीला छेद देऊन आजची नवीन कार्यपद्धती अस्तित्वात आलेली आहे. यामध्ये संगणकाचे स्थान लक्षवेधी आहे. कार्यालयात बसून सौदे होऊ लागले. आता तर जणू काही गुंतवणूकदाराने शेअर बाजाराला घरातील पडद्यावर आणले आहे. तंत्रज्ञानातील या क्रांतीमुळे शेअर बाजारातील उलाढालींचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले.
पूर्वी शेअर्स सर्टिफिकेट रूपात असत; परंतु आता इलेक्ट्रॉनिक रूपात केवळ नोंद केली जाते. त्यामुळे याला आता पेपरलेस ट्रेडिंग म्हटले जाते. या पद्धतीला डीमॅट पद्धती असे म्हणतात. नव्या उद्योगाची उभारणी करताना किंवा जुन्या उद्योगाचा विस्तार करताना मोठय़ा भांडवलाची आवश्यकता असते. हे भांडवल प्रायमरी मार्केटद्वारे उभारले जाते. शेअर बाजार म्हणजे सेकंडरी मार्केट. सेकंडरी मार्केट प्रायमरी मार्केटवर अलंबून असते.
शेअर बाजाराचे कामकाज सकाळी ९.५५ ते दुपारी ३.४५ पर्यंत चालू असते. कार्यालयीन कामकाजाची पूर्वतयारी सामान्यत: सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होते. सर्वप्रथम बोल्टला पासवर्डच्या सहाय्याने शेअर बाजाराच्या केंद्रस्थानाला जोडून घेतले जाते. शासनाच्या उद्योगधंदेविषयक बदलणाऱ्या धोरणांचा शेअर बाजाराच्या वधघटीवर परिणाम होतो. याशिवाय विशिष्ट कंपनीच्या व्यवस्थापनातील बदल, त्यांचे कंपनीसंबंधीचे विविध निर्णय शेअरच्या भावांवर परिणाम करतात. शेअर बाजाराची दृष्टी नेहमी पुढे गेलेली असते. सतत भविष्याचा वेध घेताना मागे वळून पाहायला कुणालाही फुरसत नसते. समभागांचा हा बाजार अत्यंत संवेदनाक्षम असतो. येथील व्यावसायिकाला चोवीस तास जागे राहावे लागते. नजर चौफेर ठेवावी लागते. राजकारण, उद्योगधंदे यावर त्याचे बारीक लक्ष असते.
निर्देशांक हा शब्द आपण नेहमीच ऐकतो. शेअर बाजारात जास्तीत जास्त उलाढाल करणाऱ्या प्रमुख कंपन्यांवर शेअर बाजाराचा निर्देशांक आधारित असतो. निर्देशांक हे राष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीचे मोजमाप आहे. प्रसारमाध्यमांद्वारे नेहमी शेअर बाजाराचे माहितीपूर्ण चित्र रंगविलेले असते. अशा वेळी व्यक्ती व संस्थांना तज्ज्ञांची मदत घेणे उचित ठरते. या परिस्थितीने शेअर बाजारातील अनेक करिअरना जन्म दिलेला आहे.
अविकसित भारत आता विकसनशील देश आहे. त्यामुळे अनेक विदेशी गुंतवणूकदार विविध भारतीय उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक करण्यात रस घेत आहेत. हे प्रमाण सतत वाढते आहे. आता त्यांना आठ टक्क्यांपासून साठ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्यास मुभा मिळालेली आहे. या अत्याधुनिक उद्योग जगतात उगवती पिढी काम करण्यास अधिक योग्य ठरते. उगवत्या पिढीला ही उत्तम संधी आहे. शेअर बाजाराच्या उद्योगांना उज्ज्वल भवितव्याची खात्री आहे.
आता आपण शेअर बाजारामध्ये येणाऱ्या घटकांची थोडक्यात ओळख करून घेऊया.
१) दलाल : शेअर बाजारात दलाल म्हणून काम करणे हा एक स्वतंत्र व्यवसाय आहे. मुंबई शेअर बाजार लिमिटेडमध्ये दलाल होण्यासाठी किमान बारावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे. त्यासाठी वय एकवीस वर्षे पूर्ण असणे जरुरीचे आहे. राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये दलाल होण्यासाठी किमान पदवीधर असणे ही शैक्षणिक पात्रता आहे.
२) उपदलाल : कोणतीही गुंतवणूक न करता उपदलाल हा व्यवसाय सुरू करता येतो. यासाठी बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. यासाठी किमान वय २१ असावे लागते. मुंबई शेअर बाजारात सबब्रोकरशिप न स्वीकारता रेमिशनरी म्हणूनदेखील काम करता येते. त्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी असून स्वतंत्र व्यावसायिक असण्यास उपदलाल व रेमिशनरी यांना मनाई आहे.
३) पोर्टफोलिओ मॅनेजर : Port- Folio चा अर्थ खाते विभाग आहे. गुंतवणुकीत खूप विभाग असून प्रत्येक विभागाचे उपविभाग आहेत. गुंतवणूक कुठे, कशी, कितपत व केव्हा करावी, असे बरेच प्रश्न गुंतवणूकदारांना भेडसावत असतात. प्रत्येक गुंतवणूकदार हा गुंतवणूक बाजाराचा एक्सपर्ट असतो, असे नाही. त्यामुळे त्याला एक्सपर्टीजची जरुरी असते. पोर्टफोलिओ मॅनेजर होण्यासाठी सेबीकडे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असते. हा स्वतंत्र व्यवसाय असून काही आर्थिक संस्थांमध्ये नोकरीचे पददेखील आहे. यातून मिळणारे कमिशन हे आकर्षक असते. वार्षिक वेतन किमान आठ लाख रुपये असते.
४) गुंतवणूक सल्लागार : इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट होण्यासाठी रजिस्ट्रेशनची आवश्यकता नसते. इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटला करविषयक ज्ञान असल्यास त्याचे काम दर्जेदार होते. थोडक्यात, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट गुंतवणूकदाराला माहिती पुरविण्याचे काम करतो.
५) अकाऊंटंट : अकाऊंटंटला अकाऊंट्स रिलेटेड सॉफ्टवेअरचे ज्ञान असणे अगत्याचे असते. कॉमर्समधील पदवीधर व सी.ए.ना इथे प्राधान्य असते. अकाऊंटंटला एक लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत वार्षिक वेतन मिळते.
६) मुख्य कारकून : मुख्य कारकुनाला बाजाराची परिभाषा, बाजाराविषयी ज्ञान, किमान एक वर्षांचा अनुभव असल्यास सोयीचे होते. याला परीक्षा किंवा वयाचे बंधन नसते. अनुभव व बाजाराचे ज्ञान हे महत्त्वाचे आहे. दलालाच्या कामाच्या पसाऱ्याप्रमाणे त्याचे वार्षिक वेतन शहाण्णव हजार ते चार लाख रुपयांपर्यंत असते.
७) फंडामेंटल अॅनालिस्ट : रिसर्च कंपनीत म्युच्युअल फंड कंपनीज, प्रायव्हेट बँकिंग फंड मॅनेजमेंट कंपनीज या सर्व ठिकाणी सिक्युरिटी अॅनालिस्टला काम करण्याची संधी असते. एम.बी.ए. (फायनान्स), एम.बी.ए. (अकाऊंटसी) सी.ए. यांना प्राधान्य असते. शिवाय बी.टी.आय.चा फंडामेंटल अॅनालिसिसचा कोर्स करणे उपयुक्त ठरते.
८) टेक्निकल अॅनालिस्ट : दलाल डे ट्रेडर्स, ऑपरेटर्स, हाय नेटवर्दी इंडिव्हिजवल्स टेक्निकल अॅनालिसिसचा उपयोग करतात. यासाठी पदवीधर असणे पुरेसे आहे. शिवाय बी.टी.आय.चा टेक्निकल अॅनालिस्टचा स्पेशल कोर्स आहे.
९) फंड मॅनेजर : सुरुवातीला तीन वर्षे अनुभव घेण्यासाठी फंड मॅनेजरचा सहाय्यक म्हणून काम करावे लागते. त्यानंतर फंड मॅनेजर म्हणून काम मिळते. एम.बी.ए. (फायनान्स), सी.ए. अर्थतज्ज्ञ यांना प्राधान्य दिले आहे. फंड मॅनेजरला किमान वार्षिक वेतन दहा लाख रुपये असते.
१०) अॅसेट मॅनेजर : एम.बी.ए. (फायनान्स), अर्थतज्ज्ञ, सी.ए., शेअर बाजारातील अनुभवसंपन्न व्यक्ती, शेअर तज्ज्ञ यांची अॅसेट मॅनेजरच्या पदासाठी निवड केली जाते. शिवाय या कामासाठी बी.टी.आय.मधील विविध कोर्स उपयुक्त ठरतात.
११) आर्थिक गुन्हे अन्वेषक : या करिअरसाठी प्राधान्याने सी.ए., आय.एस.ए. यांना संधी असते. आयकर हिशेबाची साधने व तंत्रे माहीत असणाऱ्यास संगणकाच्या जाळ्याविषयी ज्ञान असणाऱ्यांना देखील संधी असते. कायद्याच्या चौकटीच्या आधारे योग्य मार्ग सुचविण्याएवढी क्षमता असणे आवश्यक आहे. नोकरीच्या पदांना वार्षिक वेतन किमान बारा लाख रुपये असते.
शेअर बाजाराच्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था :
अ) बी.एस.ई. ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लि. मुंबई, १८ व १९ वा मजला, पी. जे. टॉवर्स, दलाल पथ, फोर्ट, मुंबई- ४००००१, दूरध्वनी- २२७२१२३३/३४, २२७२११२६/२७. web site:http://www.bseindia.com
ब) नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लि. बांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१. दूरध्वनी- २६५९८१००, २६५९८२५२/१६ web site:www.nseindia.com
क) इंडियन इन्स्टिय़ूट ऑफ कॅपिटल मार्केट, प्लॉट क्र. ८२, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई- ४००७०५ इंडिया,web site:www.utiicm.com
दूरध्वनी- ९१-२२-२७८९२८१५/१६.
ड) सेंटर फॉर फायनान्शियस मॅनेजमेंट बंगलोर, १ ला ए क्रॉस, १७ वा ए मेन, जे. पी. नगर, फेज क्र. २, बंगलोर- ५६००७८.
इ) दी इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट ऑफ इंडिया, खोली क्र. ३, बंजारा हिल, हैदराबाद- ५०००३४.
ई) इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फायनान्स, अशोक विहार, २, दिल्ली- ११००५२, इंडिया.
- पुष्कर मुंडले
आणखी वाचा
- दहा अशा गोष्टी, ज्यामुळे तुम्ही तिसाव्या वर्षी करोडपती बनू शकता
- अजूनही वेळ गेली नाही! यशाची चव चाखायची असेल, तर वॉरेन बफेंचे ‘हे’ 5 नियम कधीच विसरू नका
- भविष्यात आर्थिक टेन्शन नको असेल, तर ‘या’ 5 सवयी पाळा