व्यावसायिकांनी कर्ज कसे हाताळावे
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; व्यावसायिकांनी कर्ज कसे हाताळावे? करायची का सुरुवात?
कर्ज, आजार व शत्रू याकडे तुम्ही लक्ष नाही दिले व वेळीच उपाय नाही केला, तर तुमचे आयुष्य उध्वस्त करते. आज व्यवसाय, उद्योग करत असताना व सर्वसामान्य जीवन जगत असताना कर्ज हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. जास्तीत जास्त कर्ज घेऊन जो अत्यंत चांगल्या पध्दतीने हाताळतो तो प्रगती साधतो. बऱ्याच वेळा व्यवसाय करत असताना मार्केट कंडिशनमुळे किंवा स्वतःच्या चुकीमुळे नुकसान होते. चढउतार येत असतात व कर्जाचा कमी अधिक डोंगर उभा राहतो. तेव्हा कर्ज हाताळण्याची काही सूत्रं स्वतःला घालून घेतली पाहिजेत.
पहिले सूत्र म्हणजे; ज्या कारणासाठी जितके लागणार आहे, तितकेच कर्ज काढा. व्यवसायासाठी ३ लाखाचे फर्निचर, पाच लाखांची गाडी किंवा १० लाखांचे दुकान लागणार असेल तर तेवढेच कर्ज काढा. उगाच मिळते म्हणून महागड्या गाड्या, लॅव्हिश दुकान, फर्निचर घेऊ नका. ऑप्टिमम युटीलायझेशन ऑफ मनी खूप महत्वाचे आहे. काही जण तीन खोल्यांच्या घराची गरज असताना कर्ज मिळते, म्हणून मोठा ५ ते ६ खोल्यांचा बंगला बांधतात. शेवटी कर्जाचे हफ्ते व व्यवसायातील फायदा यांचा मेळ बसत नाही, त्यामुळे व्यवसाय आणि घर दोन्ही गोत्यात येते.
दुसरे सूत्र म्हणजे; कर्ज काढण्यापूर्वी व्याजदराचे पर्याय शोधा. केव्हाही बँका किंवा अर्थसंस्थांकडून कर्ज घ्या. खाजगी व्यक्तीकडून कर्ज केव्हाही घेऊ नका. मित्र, नातेवाईकांकडून कर्ज घेणे टाळा. तुमचा उद्योग ही पूर्णतः वेगळी एन्टीटी आहे. तिचा कोणताही मित्र, नातेवाईक व इतर खाजगी व्यक्तीच्या व्यवहारात संबंध येऊ देऊ नका. खाजगी जीवन हे खाजगीच ठेवा व व्यावसायिक जीवन हे व्यावसायिकच ठेवा. कोणतेही आर्थिक संबंध नसल्यावरच मैत्री व नातेवाईकांचे नाते व प्रेम टिकून राहते.
तिसरे सूत्र म्हणजे; काढलेले कर्ज हे नेहमी व शक्य तितक्या खेळत्या भांडवलासाठी वापरा व त्याद्वारे व्यवसायाची जास्तीतजास्त उलाढाल करा. कर्ज नेहमी उत्पादक बाबींसाठीच वापरा. परतावा न देणाऱ्या कोणत्याही बाबीसाठी कर्ज वापरू नये. बहुसंख्य व्यावसायिक ह्याच कारणामुळे गोत्यात येतात. कर्ज काढले की काही भाग लग्नासाठी वापरतात, घराचे इंटेरिअर करणे, गाडी घेणे इत्यादीसाठी पैसे खर्चून बसतात.
चौथे सूत्र म्हणजे; कर्ज घेतल्यावर रिलॅक्स होऊ नका. ते तुम्हाला व्याजासहित परत फेडायचे आहे लक्षात ठेवा. ३ वर्षांनी, ५ वर्षांनी फेडायचे आहे म्हणून निवांत राहू नका. फेडण्यासाठी लागणारा भाग प्रत्येक महिन्याला बाजूला ठेवा.
पाचवे सूत्र म्हणजे; कर्जाचा डोंगर उभा राहिला व फिटण्याचा कोणताच मार्ग शिल्लक राहत नाही असे वाटत असेल, तर पटकन प्रॉपर्टीचा भाग विकून, कर्ज फेडून योग्य वेळी मोकळे व्हा. समाज व लोक काय म्हणतील म्हणून लाजेपोटी गप्प राहू नका. योग्य वेळी व पटापट निर्णय घेतल्यास व्याज व दंडही कमी बसेल आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या मोकळे होऊन व्यवसायातील पुढील निर्णय घेऊ शकाल.
तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी कर्ज घेतलं आहे का? आणि घेतलं असेल तर ते कसं हाताळता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा.