लेखमालिकाव्यवसायाच्या वाटेवर चालताना

कार्यक्षेत्र कसे ठरवावे? – व्यवसाय लोकल ठेवायचा कि ग्लोबल करायचा हे कसं ठरवावं.

आपला व्यवसाय वस्तूवर आधारित असल्यास कार्यक्षेत्र ठरविण्याची पध्दत आपण पाहूया. उत्पादित केलेल्या वस्तूची टिकवणक्षमता म्हणजेच तिचा कार्यकाल पूर्ण होण्याच्या आत अंतिम ग्राहकाला त्या वस्तूचा वापर करण्यासाठी वेळ मिळावा याची दक्षता घेणे अत्यंत जरुरीचे असते किंवा त्या वस्तूंची टिकवणक्षमता वाढवण्याचे उपाय शोधून काढल्यास कराव्या लागणाऱ्या प्रक्रिया करणे गरजेचे ठरते. उदाहरण द्यायचे झाल्यास कच्चे दूध हे जास्तीत जास्त २४ तासाच्या आत ग्राहकापर्यंत पोहोचणे गरजेचे असते तरच ते वापरात आणता येते. याउलट या दूधाचे पाश्चरित दूधात रूपांतर केल्यास हा कालावधी १८० दिवसांपर्यत वाढवता येतो. या वाढलेल्या टिकवण क्षमतेमुळे ते अधिकाधिक दूरवरच्या ठिकाणांपर्यंत पोहोचवणे शक्य होते.

वाहतूक व्यवस्थेच्या उपलब्धतेवरही वस्तूचे कार्यक्षेत्र ठरवले जाते. दूरवर ग्रामीण भागात वाहतूक व्यवस्था म्हणावी तेवढी सुलभ नसते किंवा परदेशात वस्तू पाठवण्यासाठी वाहतुकीवर होणारा खर्च हा प्रचंड असतो. अशावेळी आपल्या वस्तूंची वाहतुकीवर आधारित कार्यक्षेत्रे निवडणे आवश्यक आहे. वाहतुकीत उत्पादने खराब होण्याच्या प्रमाणावरुनही याचा अभ्यास केला जाऊ शकतो. वेगवेगळ्या प्रदेशातील ग्राहकांच्या अभिरुचीवरुनही कार्यक्षेत्रात बदल करणे आवश्यक असते. उदा. तलम कपडे तयार करणाऱ्या व्यवसायाची गरज उष्ण कटिबंधीय प्रदेशात, तर उबदार कपडे हे थंड प्रदेशात विकले जाऊ शकतात. कार्यक्षेत्र हे ऋतुमानानुसारही बदलते. सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असणारे मनुष्यबळ (Working force) हेही कार्यक्षेत्र ठरवताना लक्षात घेणे गरजेचे आहे.

सेवा (services) साठी कार्यक्षेत्र हे फार व्यापक असू शकते. आयटी उद्योगातील सेवा जगातील सर्वठिकाणी घरबसल्या पोहोचवता येतात व त्याचे मूल्यही घरबसल्या मिळवता येते. तर कुरिअर सेवेसाठी वाहतूक व्यवस्थेशी असणारी आपली समरसता ही महत्त्वाची ठरते. हॉटेल उद्योगासारख्या सेवांसाठी जागेची गरज लागते म्हणून या सेवांचे कार्यक्षेत्र मर्यादित असते. यावर मात करण्यासाठी त्याच्या अनेकानेक शाखा उघडणे हे फायदेशीर ठरते. टेलिमार्केटिंग सारख्या सेवांवर अंतराचा काही परिणाम होत नाही.

आपल्या उत्पादनानुसार (वस्तू/सेवा) टिकवणक्षमता, प्रक्रिया, वाहतूक, वाहतुकीदरम्यान होणरी नासाडी, ग्राहकांची अभिरुची, ऋतुमान, आपल्याकडे असणारे मनुष्यबळ व आपली उत्पादनक्षमता या गोष्टींचा सारासार विचार करुन गल्ली, प्रभाग, गाव-खेडे, शहर, तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, देश, खंड किंवा अगदी जगभरात सर्वत्र असे कार्यक्षेत्र ठरवणे आवश्यक असते. प्रत्येक उद्योजक हे कार्यक्षेत्र ठरवतो. माल उत्पादित करतो, ग्राहकांपर्यंत वेळेत पोहोचवतो व नफा मिळवतो. सुरुवातीच्या टप्प्यावर जे आपले कार्यक्षेत्र असते त्यापेक्षा ते वाढवत नेणे हे त्या उद्योगाच्या वाढीसाठी लागणारे इंधन आहे.

  • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button