लेखमालिकाव्यवसायाच्या वाटेवर चालताना

व्यवसाय कोणता ?- व्यवसाय करायचा म्हणजे स्वतःची फॅक्टरी पाहिजे, दुकान पाहिजे या कल्पना आता मागे पडत चालल्या आहेत.

आपला अनुभव, आपल्या आवडी, आपले ज्ञान व कसब, उपलब्ध असणारी मानवी संसाधने, कच्चा माल व आपली काम करण्याची क्षमता व इतर बाबींचा विचार करुन कोणता व्यवसाय करावा? यासाठी पुढे दिलेल्या माहितीचा उपयोग आपल्याला होईल.

तर सेवा पुरवण्यासाठी त्या त्या सेवेनुसार अनेक घटकांची गरज असते. समजा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वेबसाईट तयार करण्याचा व्यवसाय करायचा असेल, तर फार घटकांची आवश्यकता नाही. याउलट एखादा पर्यटनविषयक व्यवसाय करायचा असेल तर गाड्या, मार्गदर्शक, राहण्याची व्यवस्था अशा सर्व सोयींची गरज पडेल. त्यासाठी त्या सर्व गोष्टी स्वतःच्या असणे आवश्यक नाही, त्या तुम्ही आउटसोर्स करु शकता. तसे तुमचे नेटवर्क असणे अत्यावश्यक आहे. वेगवेगळ्या सेवानुंसार लागणाऱ्या गोष्टींची माहिती घेणे उपयुक्त ठरते.

उबर या जगातील सर्वात मोठ्या टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडे स्वतःची एकही टॅक्सी नाही. फेसबुक या जगातील सर्वात मोठ्या व लोकप्रिय सोशल मिडीया कंपनीकडे स्वतःचे एक अक्षरही लेखन नाही. अलिबाबा या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीकडे एक खिळासुध्दा स्टॉकमध्ये नाही. एअरबीएनबी (Airbnb) या जगातल्या सगळ्यात मोठ्या भाड्याची घरे पुरवणाऱ्या कंपनीकडे स्वतःचे एकही घर नाही.

ॲपल या जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन व टॅबलेट बनवणाऱ्या कंपनीची स्वतःची फॅक्टरी नाही. व्हॉट्सॲप या दिवसातून कोट्यावधी संदेशांची देवाणघेवाण करणाऱ्या कंपनीकडे स्वतःचा सर्व्हर सुध्दा नाही. नाइकी या जगातील आघाडीच्या पादत्राणे बनवणाऱ्या कंपनीचा स्वतःची कोणताही कारखाना नाही.

वरील सर्व उदाहरणांवरून असे लक्षात येते की, एकदा कोणता व्यवसाय करायचा हे ठरवल्यानंतर सर्व गोष्टी स्वतःच्या असणे गरजेचे नाही. त्या स्वतःच्या असतील तर उत्तमच पण नसतील तर काळजी नसावी. उद्योजक हा नेहमी सर्व उपलब्ध वस्तूंचा योग्य ताळमेळ घालून उत्तम वस्तू व सेवा निर्माण करणारा एक तरबेज माणूस असतो. कारण व्यवसाय करायचा म्हणजे स्वतःची फॅक्टरी पाहिजे, दुकान पाहिजे, भांडवल या कल्पना आता मागे पडत चालल्या आहेत.

लोकांची गरज ओळखा, ती पुरवणारी संकल्पना किंवा वस्तू शोधून काढा. Outsourcing व Out sharing सारख्या तंत्राचा उपयोग करुन, निरनिराळ्या एजन्सींना आपल्यासोबत घ्या. मार्केटिंगवर जास्तीत जास्त भर देणे. ग्राहकांना उत्तम सेवा देणे. प्रामाणिक व पारदर्शी व्यवहार ठेवणे, आपल्याबरोबरच, आपल्याबरोबर काम करणाऱ्या संस्थांचा विकास करणे, आंतरराष्ट्रीय बाजारात शिरकाव करणे हे नवीन व्यवसायाचे मंत्र आहेत. कल्पना तुमची, पैसा दुसऱ्याचा हे तत्त्व चालते.

  • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button