कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, नाहीतर पश्चाताप होईल…
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, नाहीतर पश्चाताप होईल…’ करायची सुरवात?
काही व्यक्तींमध्ये रिस्क घ्यायची हिंमत नसते. अशी लोकं नेहमी आरामदायक, सुरक्षित व जोखीमरहित पर्यायांचा अवलंब करीत असतात. वैयक्तिक व प्रोफेशनल जीवनात ‘कम्फर्ट झोन’ ही अशा जागा आहे की त्यात अडकलेला माणूस कधीच आव्हांनाना सामोरे जाण्यास मानसिकदृष्ट्या तयार नसतो. त्यामुळे तो कायमच संभाव्य अडचणीबद्दल गाफील राहत असतो.
कम्फर्ट झोनमध्ये अडकलेल्या व्यक्तींचा विकास हा खुंटलेला असतो. कम्फर्ट झोन त्यांना प्रगतीच्या संधीचा फायदा घेण्यापासून रोखत असतो. सतत कम्फर्ट झोनमध्ये राहिल्याने माणूस नवीन आव्हाने पेलण्यास असमर्थ ठरतो किंवा संभाव्य अडचणींबद्दल त्याच्यात जागरूकता निर्माण होत नाही. एक प्रयोग केला गेला होता. एका काचेच्या बरणीत धान्य भरून ठेवले होते. एक उंदीर त्यात सोडला. जेव्हा बरणी पूर्ण भरलेली होती तेव्हा उंदराला वाटले की, आता शांतपणे धान्य खाईन, काही अडचण नाही. त्यामुळे तो तिथेच राहिला व बरणीतील धान्याचा उपभोग घेऊ लागला. असे करता करता एक दिवस सर्व धान्य संपले. आता उंदीर बरणीत एकदम तळाला होता आणि दुर्भाग्य म्हणजे तो आता त्यातून बाहेरही पडू शकत नव्हता. फक्त बाहेर पाहून रडण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
म्हणूनच तरुण वयात नवनवीन आव्हाने स्वीकारा, त्यातून बरेच काही शिकता येईल, परंतु केवळ आरामदायी सुरक्षित वाटणाऱ्या कम्फर्ट झोनमध्ये अडकू नका, कारण ते एक जाळे असते. त्यात दीर्घकाळ अडकाल, तर तुमच्या विकासाचे सर्व दरवाजे बंद होतील व वेळही निघून गेलेली असेल. जेव्हा तुम्ही मनातील भीती व चिंता बाजूला सारून नवीन आव्हानांचा सामना करता, तेव्हा तुमच्या यशस्वी वाटचालीस सुरुवात झालेली असते. दुर्दैवाने बरेच लोक कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यास मानसिकरित्या तयार नसतात. त्यांना आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असते; परंतु नवीन जोखिमा आणि आव्हानांना पेलण्यास ते घाबरत असतात. त्यांना जे सुरक्षित वाटते, त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात. कम्फर्ट झोन ही स्वतःला घातलेली मर्यादा असते; जिथे माणूस जीवनात पुढे जाण्याबाबत साशंक असतो, बऱ्याचदा नवीन आव्हानांबाबत चिंताग्रस्त व नर्व्हस असतो. उदाहरण घ्यायचे तर आपल्या लोकांचे घ्या. उद्योगात जोखीम घ्यावी लागते. त्यामुळे लोकांना उद्योग क्षेत्र असुरक्षित वाटते, परंतु नोकरी हा उत्पन्नाचा शाश्वत व सुरक्षित मार्ग म्हणून नोकरीसाठीच शिकतात. हा झाला कम्फर्ट झोन… मग सांगा आपल्यामध्ये उद्योजक कसे घडणार?
तुम्ही केलात का कधी असा प्रयत्न तुमचा कम्फर्ट झोन सोडण्याचा? केला असाल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.