स्मार्ट गुंतवणूकदार – मनोगत
जगभरातील प्रत्येक माणसाचे आकर्षण व कुणालाही (अगदी तुरळक लोक वगळून) न समजणारे क्षेत्र म्हणजे शेअर बाजार. गुंतवणूकीतून भरपूर पैसा कमावता येतो. खरेदी विक्रीतून सुध्दा प्रचंड कमाई होते, मात्र या आर्थिक साधनाकडे बघण्याचे दृष्टीकोन प्रत्येक व्यक्तीनुरुप बदलतात. काहीजणांचे समज, काहीजणांचे गैरसमज, काहीजणांची भीती, काहीजणांची हाव, काहीजणांचा अतिउतावळेपणा इत्यादी घटकांवर हे शेअर मार्केट हलत असते.
जगभरातील आर्थिक गणिते कोणत्याही क्षणाला बदलायची ताकद ठेऊन असणारे हे क्षेत्र आहे. हे प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा आहेच, त्यातून पैसे सुध्दा मोठ्या प्रमाणात कमावयचे आहेत; काहीजण कमावत सुध्दा आहेत, मात्र हे शिकावे कुठे? शिकवणारे भेटत नाहीत. यावरचा कोणताही कोर्स (प्रशिक्षण अभ्यासक्रम) नाही. स्वतः शिकायचे तर कोणती पुस्तके वाचायची? डिमॅट अकाउंट काय असते? त्याची गरज काय? ते कसे प्राप्त करावे?
कोणत्या दिवशी शेअरबाजार उसळी मारणार? कोणत्या दिवशी शेअर बाजार ढासळणार? उसळीतच पैसे कमावता येतात की ढासळीत सुध्दा पैसे कमावता येताता? रुपया-डॉलर यांच्या पडझडीवर वरती शेअर बाजार कितपत अवलंबून आहे? सोने-चांदीच्या तेजी-मंदीचा शेअर बाजारावर काही परिणाम होतो का? जागतिक मंदी कशाने उद्भवते? म्युचुअल फंड म्हणजे काय? SIP (एसआयपी) म्हणजे काय? त्यात गुंतवणूक कशी करायची? कोणत्या कंपन्यांचे शेअर घ्यायचे? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायची कुठे? हा प्रश्न सुध्दा अनुत्तरीत राहतो व सगळेच प्रश्न जागच्या जागी तसेच सगळीच माणसे जागच्या जागी राहतात. सुरुवातीलाच बऱ्याच जणांना आलेल्या अपयशयाच्या अनुभवामुळे बाकीचे लोक सुध्दा या क्षेत्राची धास्ती बाळगून असतात. ‘दुधाने तोंड पोळलं की ताक सुध्दा फुंकून पिण्याची सवय’ या माणसाच्या नैसर्गिक स्वभावातून न्यूनगंड व भीती निर्माण होत असतात, त्यामुळे परत त्या गोष्टीच्या वाटेलाच माणूस जात नाही.
शेअर बाजारात गुंतवणूकीला सुरुवात करण्याआधी एक समान गोष्ट सगळ्यांना माहिती असावी आणि शेअर बाजार शिकवणारे बरेच प्रशिक्षक ही गोष्ट प्रत्येकाला सुरवातीला सांगतात. एका गावात दोन माणसे येतात. एक गुरु व दुसरा त्याचा शिष्य. गुरु त्या गावकऱ्यांना सांगतो की, या गावात जेवढी माकडे आहेत, ती माकडे पकडून मला आणून दिली की मी प्रत्येक माकड १०० रुपयांना खरेदी करणार आहे. गावातील लोकांना वाटते चला गावात भरपूर माकडे आहेत. पकडायची आणि गुरुला नेऊन द्यायची. गावातील सगळे लोक माकडे पकडतात व गुरुकडून १०० रुपये प्रतिमाकड अशी रक्कम घेऊन जातात. गुरु ती सगळी माकडे एका मोठ्या पिंजऱ्यात ठेवत असतो. त्यांना खायला घालत असतो. गावातील माकडांची संख्या कमी झाल्यामुळे कमी लोक माकडे पकडतात, मग गुरु माकडांची किंमत वाढवून २०० रुपये प्रतिमाकड अशी करतो. गावातील लोकांचा उत्साह परत वाढीस लागतो. उरलेली जवळजवळ सगळी माकडे पकडली जातात. मग गुरु एके दिवशी दुसऱ्या गावाला निघून जातो. तेव्हा शिष्य गावकऱ्यांना बोलावतो व सांगतो की माकडांची किंमत अजून वाढणार आहे. तेव्हा मी तुम्हाला या पिंजऱ्यातली माकडे ५०० रुपयांना एक याप्रमाणे देतो आणि गुरु गावावरुन परत आल्यावर त्यांना ही माकडे १००० रुपयांना एक याप्रमाणे खरेदी करतील; म्हणजे तुमचा फायदाच फायदा होईल. शिष्य सगळ्या गावकऱ्यांकडून ५०० रुपये प्रतिमाकड अशी रक्कम वसूल करतो व एके रात्री गावातून निघून जातो. गावकरी गावात वाट बघत राहतात. गुरु व शिष्य दोघे परत कधीही दिसले नाहीत. आता माकडे परत गावात मोकळेपणाने फिरतात. गावकरी गावातच आहेत. पैसा गुरु व शिष्य यांना मिळाला आहे व दोघेही गाव सोडून गेले आहेत.
या गोष्टीत शेअर बाजारात प्रवेश हा १०० रुपयांनी होऊ शकतो. त्याचे २०० रुपये, ५०० रुपये सुध्दा होऊ शकतात आणि १००० रुपयांच्या नादात बरेच नुकसान सुध्दा होऊ शकते. म्हणजेच कोणता शेअर कधी खरेदी करावा? तो कधी विकावा? त्यातून बाहेर कधी पडावे? याचा अंदाज आला की माणूस शेअर बाजारात चांगला खेळू शकतो. पैसे कमावू शकतो. हा खेळ चांगल्या रितीने खेळण्यासाठी या खेळाचे नियम चांगल्या पध्दतीने माहिती असल्यास तो जिंकण्याची जास्त शक्यता निर्माण होते. हा खेळ योग्य रितीने खेळण्याचे कानमंत्र या पुस्तकात आहेत.