उद्योजकताबिझनेस महारथी

होंडा कंपनी उभी करणारा मेकॅनिक – सोइचिरो होंडा

एका लोहाराचा मुलगा ते होंडा मोटर्सचा मालक होण्यासाठी केलेला संघर्ष

नमस्कार! नवी अर्थक्रांतीमध्ये आपलं स्वागत आहे… स्टार्टअप आणि उद्योग क्षेत्रातील रंजक आणि उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. तेव्हा चॅनेल आत्ताच सबस्क्राइब करा.

सोइचिरो होंडा यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९०६ मध्ये जपान मधील शिजूओका भागातील कोमयो गावात झाला. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. त्यांचे वडील गिहेई होंडा लोहार होते, तसंच त्यांचं एक सायकल रिपेअरिंगचं दुकान होतं. लहान सोइचिरो आपल्या वडिलांना कामात मदत करायचे. लहान लहान यंत्रांवर प्रेम करणाऱ्या सोइचिरोंचं अभ्यासात काय मन लागेना. त्यांनी आपलं शिक्षण अर्धवट सोडलं आणि टोकियो गाठलं. तिथं ते ‘आर्ट शोकाई’नावाच्या कंपनीत मेकॅनिक म्हणून रुजू झाले, पण ते वयाने सगळ्यात लहान असल्यामुळे त्यांना मेकॅनिकचं काम सोडून इतर छोटीमोठी कामं द्यायचे. यावर सोइचिरोंनी मालकाला विनंती केली आणि मेकॅनिकचं काम द्यायला लावलं. त्यांचं मशीनवरच प्रेम पाहून मालकानं सोइचिरोंना दुसऱ्या शाखेत पाठवलं. त्या शाखेत रेसिंग कार तयार केल्या जात होत्या. सोइचिरो तिथं मन लावून काम करु लागले. शोकाई कंपनीनं जपान कार चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता आणि त्या स्पर्धेत अगदी अनपेक्षितरित्या कंपनीची कार पहिली आली. सोइचिरो त्या पहिल्या आलेल्या कारचे मेकॅनिक होते. यामुळे खुश होऊन कंपनीने एका शाखेची जबाबदारी या २१ वर्षीय पोराच्या खांद्यावर दिली. २० व्या वर्षी होंडा यांना सैन्यदलात नोकरीसाठी बोलावण्यात आलं होतं; परंतु रंगांधळेपणामुळे त्यांना डावलण्यात आलं.

The Story of Soichiro Honda

सोइचिरो रेसिंग स्पर्धेतसुद्धा भाग घ्यायचे. ७ जून १९३६ रोजी एका रेसमध्ये होंडा यांचा अपघात झाला. त्यात ते किरकोळ जखमी झाले; परंतु त्यांचा लहान भाऊ गंभीर जखमी झाला. ऑक्टोबरमध्ये त्यांनी आणखी एका रेसमध्ये भाग घेतला. मात्र, वडील रागावल्याने आणि पत्नी नाराज झाल्यामुळे त्यांनी रेसिंगची आवड सोडली.

काम करत असताना सोइचिरोंच्या लक्षात आलं की गाडीसाठी लागणाऱ्या पिस्टनला खूप मागणी आहे,. पण ते बनवणाऱ्या कंपन्या कमी. त्यांनी आपल्या मालकाला ही गोष्ट बोलून दाखवली आणि सुचवलं ही आपणही पिस्टन बनवू. पण मालकाने त्यांना साफ नकार दिला. यावर आता आपण स्वतःच पिस्टन बनवू म्हणत त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल गाव गाठलं. त्यांनी ‘तोकाई सेकी’ नावाची कंपनी उभी केली. या कंपनीनं पिस्टन रिंग बनवून त्या टोयोटा कंपनीला चाचणीसाठी दिल्या. पण त्यांनी पाठवलेल्या ५० रिंग पैकी फक्त ३ रिंग टोयोटा कंपनीच्या चाचण्या पास करू शकल्या. हे होत त्यांच्या आयुष्यातलं पहिलं अपयश.

दोन वर्षांत त्यांनी आपल्या कामाच्या गुणवत्तेत सुधार करून अधिक उत्कृष्ट पिस्टन रिंग बनवल्या. कंपनी बऱ्यापैकी काम करत होती, तोच दुसरं जागतिक महायुद्ध सुरु झालं आणि यात अमेरिकेने जपानवर टाकलेल्या B२९ बॉम्बमध्ये सोइचिरोंची कंपनी उध्वस्त झाली. हा त्यांना बसलेला दुसरा तडाखा.

युद्ध संपल्यानंतर त्यांनी आपल्या कंपनीचे जळालेले अवशेष साडेचार लाख येनना विकले आणि परत नव्या जोमानं कंपनी उभी केली. तिचंही काम चांगलं चालू होतं. तोच जपानमध्ये मोठा भूकंप झाला आणि त्यांची कंपनी जमीनदोस्त झाली. दैवाने त्यांची तिसऱ्यांदा परीक्षा बघितली. एक वेळ तर अशी होती की, सोइचिरोंकडे फक्त एका दिवसाचं पेट्रोल भरण्याइतकेच पैसे शिल्लक होते.

मित्रहो सामान्य माणूस इतक्या अपयशानंतर खचून जातो. प्रयत्न सोडून देतो, पण हे सोइचिरो होंडा होते. ते अपयशाचं भांडवल करत बसले नाहीत. ‘हे माझ्याच सोबत का झालं’ म्हणून त्याला गोंजारत बसले नाहीत. इतक्यांदा पडून देखील ते पुन्हा उभे राहिले. नव्या जोमाने कामाला लागले. दोन वर्षांनंतर ते चांगल्या गुणवत्तेच्या पिस्टन रिंगचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात आणि ‘टोयोटा’ व ‘नाकाजिमा एअरक्राफ्ट’ सारख्या कंपन्यांना त्यांचा पुरवठा करण्यात यशस्वी झाले.

The Story of Soichiro Honda

हळूहळू जपानची अर्थव्यवस्था सुधारू लागली. तसंच सोइचिरोंनी चारचाकी गाड्या बनवण्याच्या क्षेत्रात देखील पाय ठेवला. सोइचिरो नेहमी आपल्या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत. अशा या प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या अवलियाने ५ ऑगस्ट १९९१ रोजी जगाचा निरोप घेतला. सर्वसामान्यांना परवडेल अशी गाडी तयार करून लाखो मध्यमवर्गीयांची स्वप्न पूर्ण करणारे सोइचिरो होंडा आपल्याला हेच सांगतात की “जब तक न सफल हो, नींद-चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ कर मत भागो तुम। कुछ किये बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।”…

हा लेख विडीयो मध्ये पहा

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button